YouVersion Logo
Search Icon

2 पेत्र 3

3
ख्रिस्ताचे परत येणे
1प्रिय मित्रांनो, आता माझे हे तुम्हाला दुसरे पत्र आहे. या दोन्ही पत्राद्वारे मी तुम्हाला आठवण देऊन तुमच्या विचारांना हितकारक होतील अशा गोष्टींना चालना देत आहे. 2माझी इच्छा आहे की, पवित्र संदेष्ट्यांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची आणि आमचे प्रभू आणि तारणाऱ्याने तुमच्या प्रेषितांद्वारे दिलेल्या आज्ञेची तुम्ही आठवण ठेवावी.
3सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील. 4ते म्हणतील, “त्यांच्या येण्याचे दिलेले ‘येत आहे’ हे वचन आता कुठे आहे? आमचे पूर्वज मरण पावले, तरी सर्वकाही उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे.” 5परंतु ते बुद्धिपुरस्सर हे विसरतात की, फार पूर्वी परमेश्वराच्या शब्दाने आकाशमंडळ अस्तित्वात आले आणि पृथ्वी पाण्यातून व पाण्याद्वारे घडविली गेली. 6याच पाण्यामुळे त्यावेळेच्या जगाचा महाप्रलयाने नाश झाला होता. 7आता अस्तित्वात असलेले आकाश व पृथ्वी ही त्याच परमेश्वराच्या शब्दाने अग्नीत नष्ट करण्यासाठी राखलेली आहेत, अनीतिमान लोकांच्या न्यायाच्या दिवसासाठी आणि नाशासाठी ती राखून ठेवलेली आहेत.
8प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत. 9कित्येक लोक ज्याला संथपणा म्हणतात, तसे प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाहीत, तर ते तुमच्याबरोबर सहनशीलतेने वागतात. कोणाचाही नाश व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही, तर प्रत्येकाने पश्चात्ताप करावा अशी त्यांची इच्छा आहे.
10परंतु चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठ्याने गर्जना करीत नाहीसे होईल, मूलतत्त्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्वगोष्टी उघड्या पडतील.
11ज्याअर्थी सर्वकाही अशा रीतीने नष्ट होणार आहे, त्याअर्थी तुम्ही कशाप्रकारचे लोक असणे आवश्यक आहे? तुम्ही पवित्र आणि सुभक्तीत जीवन जगले पाहिजे. 12तो परमेश्वराचा दिवस लवकर यावा म्हणून तुम्ही त्याकडे लक्ष देत आहात, त्या दिवशी आकाश अग्नीत जळून विलयास जाईल आणि त्यातील मूलतत्वे उष्णतेने वितळतील. 13परंतु परमेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्यामध्ये नीतिमत्त्व वास करते, असे नवे आकाश व नव्या पृथ्वीची आपण वाट पाहत आहोत.
14तर मग प्रिय मित्रांनो, या गोष्टीची वाट पाहत असता तुम्ही त्यांच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे त्यांच्याबरोबर शांतीत असलेले त्यांना आढळून यावे म्हणून प्रत्येक प्रकारे प्रयत्न करा. 15आपल्या प्रभूची सहनशीलता ही तारणाचीच संधी आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौलाला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हाला असेच लिहिले आहे, हे तारणच आहे असे समजा. 16या विषयाचे वर्णन करून तो त्याच्या सर्व पत्रात त्याच प्रकारे लिहितो. त्याच्या पत्रातील काही गोष्टी समजावयास कठीण अशा आहेत. अज्ञानी व अस्थिर माणसे इतर धर्मशास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा या पत्राचाही करतात. अशाने ते स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
17प्रिय मित्रांनो, तुम्हाला आधी इशारा देऊन ठेवला आहे, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या चुकीच्या प्रवाहात सापडून आपल्या सुरक्षित स्थितीतून ढळू नये यासाठी जपून राहा. 18परंतु आपले प्रभू आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या कृपेत आणि ज्ञानात वाढत राहा.
त्यांना गौरव आता आणि सदासर्वकाळ असो! आमेन.

Currently Selected:

2 पेत्र 3: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in