प्रेषित 10
10
कर्नेल्याचे पेत्रास आमंत्रण
1कैसरीया येथे कर्नेल्य नावाचा एक मनुष्य, जो इटलीच्या पलटणीचा शताधिपती होता. 2तो व त्याचे सारे कुटुंब धार्मिक व परमेश्वराला भिऊन वागणारे होते; तो उदारहस्ते गरजवंतांना दानधर्म करीत असे आणि परमेश्वराची नियमितपणे प्रार्थना करीत असे. 3एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्याला एक दृष्टान्त झाला. त्याने स्पष्टपणे असे पाहिले की, परमेश्वराचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्याला म्हणाला, “कर्नेल्या!”
4कर्नेल्याने त्याच्याकडे टक लावून पाहिले व भयभीत झाला. त्याने विचारले, “काय प्रभूजी?”
देवदूत उत्तरला, “तुझ्या प्रार्थना आणि गरिबांसाठी केलेल्या दानधर्माची परमेश्वराला आठवण आहे. 5आता योप्पा येथे माणसे पाठवून, शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. 6ज्याचे घर समुद्राकाठी आहे, त्या शिमोन चांभाराच्या घरी पाहुणा आहे.”
7जो देवदूत त्याच्याबरोबर बोलला तो गेल्यानंतर, कर्नेल्याने आपल्या दोन नोकरांना आणि धर्मनिष्ठ शिपायास, जो त्याच्या वैयक्तिक सेवकांपैकी एक होता त्याला बोलाविले. 8घडलेली सर्व हकिकत त्याने त्यांना सांगितली आणि त्यांना योप्पाकडे पाठवून दिले.
पेत्राचा दृष्टान्त
9दुसर्या दिवशी दुपारच्या सुमारास ते प्रवास करीत शहराजवळ येत होते आणि इकडे पेत्र प्रार्थना करण्यासाठी घराच्या धाब्यावर गेला. 10त्याला भूक लागली आणि काहीतरी खावे अशी त्याला इच्छा झाली, जेवण तयार होत असताना त्याचे देहभान सुटले. 11त्याने पाहिले आकाश उघडलेले आहे आणि मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून खाली जमिनीकडे सोडले जात आहे. 12तिच्यात पृथ्वीवरील सर्वप्रकारचे चतुष्पाद प्राणी, त्याचप्रमाणे सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे होती. 13मग एक वाणी त्याला म्हणाली, “पेत्रा ऊठ, व मारून खा.”
14“खात्रीने नाही, प्रभू!” पेत्राने उत्तर दिले, “मी अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही खाल्ले नाही.”
15दुसर्या वेळेस त्याला वाणी ऐकू आली, “परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध म्हणू नकोस.”
16असे तीन वेळा झाले, मग लागलीच ती चादर पुन्हा स्वर्गात वर घेतली गेली.
17त्या दृष्टान्ताचा काय अर्थ असावा याविषयी पेत्र विचारात पडला असता, कर्नेल्याने पाठविलेल्या माणसांना शिमोनाचे घर सापडले आणि ती बाहेर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली. 18त्यांनी हाक मारून अशी विचारणा केली, “शिमोन, ज्याला पेत्र असेही म्हणतात, येथेच राहत आहेत काय?”
19इकडे पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करीत असताना, आत्मा त्याला म्हणाला, “शिमोना, तीन माणसे तुला शोधत आहेत. 20म्हणून ऊठ आणि खाली जा. त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको, कारण मीच त्यांना पाठविले आहे.”
21पेत्र खाली गेला आणि त्या माणसांना म्हणाला, “मी तोच आहे ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. तुम्ही कशासाठी आला आहात?”
22त्या माणसांनी उत्तर दिले, “आम्ही कर्नेल्य शताधिपतीकडून आलो आहोत. ते नीतिमान आणि परमेश्वराला भिऊन वागणारे मनुष्य आहेत, सर्व यहूदी लोकांकडून सन्मानित झालेले आहेत. एका पवित्र दूताने त्यांना सांगितले की तुम्ही पेत्राला तुमच्या घरी बोलवावे म्हणजे तुमच्याकडील संदेश त्यांना ऐकता येईल” 23तेव्हा पेत्राने त्या माणसांना पाहुणे म्हणून घरात बोलाविले.
कर्नेल्याच्या घरी पेत्र
दुसर्या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला, योप्पातील काही विश्वासी बंधूही त्याच्याबरोबर गेले. 24दुसर्या दिवशी ते कैसरीयास पोहोचले. कर्नेल्य त्यांची वाटच पाहत होता, त्याने आपले नातेवाईक व जवळचे मित्र यांना एकत्रित बोलाविले होते. 25पेत्राने घरात प्रवेश करताच, कर्नेल्याने त्याची भेट घेतली आणि आदराने त्याच्या पाया पडला. 26परंतु पेत्राने त्याला उभे केले व म्हणाला, “उभे राहा, मी स्वतः तुमच्यासारखाच एक मनुष्य आहे.”
27त्याच्याशी बोलत असताना, पेत्र आत गेला आणि तिथे त्याला पुष्कळ लोक एकत्र जमलेले आढळले. 28तेव्हा पेत्र त्यांना म्हणाला: “माझ्यासारख्या यहूदी व्यक्तीने गैरयहूदीयाला भेटणे व त्यांच्याशी संबंध ठेवणे हे यहूदी नियमशास्त्राच्या विरुद्ध आहे हे तुम्हाला माहीतच आहे. परंतु परमेश्वराने मला दाखवून दिले आहे की, मी कोणालाही अपवित्र किंवा अशुद्ध लेखू नये. 29म्हणूनच मला बोलाविणे आल्याबरोबर, काहीही हरकत न घेता मी लगेच आलो. आता तुम्ही मला कशासाठी बोलाविले ते सांगा?”
30कर्नेल्याने उत्तर दिले: “तीन दिवसांपूर्वी माझ्या घरी याच वेळेस दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, मी प्रार्थना करीत होतो. तेव्हा तेजस्वी झगा घातलेला एक पुरुष एकाएकी माझ्यासमोर उभा राहिला. 31आणि मला म्हणाला, ‘कर्नेल्या, परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तू गरिबांना केलेल्या दानधर्माची त्यांनी आठवण केली आहे. 32आता योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. ज्याचे घर समुद्राकाठी आहे त्या शिमोन चांभाराच्या घरी तो पाहुणा आहे.’ 33म्हणून मी ताबडतोब तुम्हाला बोलावून घेतले आहे, तुम्ही आला हे बरे झाले. आपण सर्व येथे परमेश्वराच्या समक्षतेत आहोत आणि प्रभूने जे सर्वकाही सांगण्याची आज्ञा देऊन तुम्हाला पाठविले आहे ते सांगा.”
34मग पेत्र बोलू लागला: “मला अगदी स्पष्टपणे कळून आले आहे की परमेश्वर पक्षपात करीत नाहीत, 35परंतु प्रत्येक राष्ट्रांमध्ये जे त्यांचे भय धरतात व योग्य तेच करतात त्या सर्वांना ते स्वीकारतात. 36तुम्हाला माहीत आहे की, परमेश्वराने इस्राएलच्या लोकांसाठी येशू ख्रिस्ताद्वारे जे सर्वांचे प्रभू आहेत, शांतीच्या शुभवार्तेची घोषणा करीत त्यांचा संदेश पाठविला. 37योहानाने बाप्तिस्म्याबद्दल संदेश दिल्यानंतर गालीलापासून सुरुवात होऊन संपूर्ण यहूदीयामध्ये काय घडून आले हे तुम्हाला चांगले माहीत आहे, 38कशाप्रकारे परमेश्वराने नासरेथकर येशूंना पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला आणि ते सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांस बरे करीत फिरत होते, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर होते.
39“त्या यहूदीयांच्या देशामध्ये व यरुशलेममध्ये त्यांनी ज्या सर्वगोष्टी केल्या त्यांचे आम्ही साक्षी आहोत. त्यांनी त्यांना क्रूसावर खिळून मारले, 40परंतु परमेश्वराने तीन दिवसानंतर त्यांना मरणातून पुन्हा जिवंत केले व लोकांसमोर प्रकट केले. 41जरी ते सर्व लोकांसमोर प्रकट झाले नाहीत, परंतु जे ज्यांना परमेश्वराने पूर्वीच निवडून ठेवले होते त्या साक्षीदारांसमक्ष म्हणजे आम्हाला, मरणातून उठल्यानंतर ते प्रकट झाले व त्यांनी आमच्याबरोबर खाणेपिणे केले. 42त्यांनी आम्हाला अशी आज्ञा केली आहे की, लोकांस उपदेश करा व साक्ष द्या, परमेश्वराने नेमलेले जिवंतांचे व मेलेल्यांचे न्यायाधीश हेच आहेत. 43सर्व संदेष्ट्यांनी येशूंबद्दल अशी साक्ष दिली आहे की जो प्रत्येकजण त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला त्यांच्या नावाने पापक्षमा मिळते.”
44पेत्र हे वचन बोलत असतानाच, सर्व संदेश ऐकणार्यांवर पवित्र आत्मा उतरला. 45पेत्राबरोबर आलेले विश्वासणारे, ज्यांची सुंता झाली होती ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी पाहिले की गैरयहूदी लोकांवरसुद्धा पवित्र आत्मा ओतून दिला आहे. 46कारण त्यांनी त्यांना अन्य भाषांमधून बोलताना आणि परमेश्वराची स्तुती करताना ऐकले.
मग पेत्र म्हणाला, 47“त्यांचा पाण्याने बाप्तिस्मा करण्यास निश्चितच कोणीही हरकत घेणार नाही, कारण पवित्र आत्मा जसा आपल्याला मिळाला, तसा त्यांनाही मिळालेला आहे.” 48मग त्याने आज्ञा केली की येशू ख्रिस्ताच्या नावात त्यांचा बाप्तिस्मा करावा. मग पेत्राने त्यांच्याबरोबर काही दिवस राहावे म्हणून त्यांनी त्याला विनंती केली.
Currently Selected:
प्रेषित 10: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.