प्रेषित 13
13
1आता अंत्युखिया येथील मंडळीत संदेष्टे व शिक्षक होते: बर्णबा, शिमोन, ज्याला निगेर देखील म्हणत, कुरेनेचा लूक्य, मनायेन ज्याचे संगोपन मांडलिक हेरोद राजाकडून झाले होते आणि शौल. 2हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.” 3तेव्हा उपास आणि प्रार्थना केल्यावर त्यांनी आपले हात त्यांच्यावर ठेवले व त्यांना निरोप दिला.
सायप्रसकडे
4पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले. 5सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.
6त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला. 7सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती. 8परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला. 9मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले, 10“तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय? 11तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.”
तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला. 12राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला.
पिसिदियातील अंत्युखियामध्ये पौल
13आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला. 14ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले. 15नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.”
16पौल उठून उभा राहिला व त्याने हाताने खुणावले आणि म्हणाला: “अहो इस्राएली लोकहो आणि परमेश्वराची उपासना करणारे गैरयहूदी, माझे ऐका! 17या इस्राएली राष्ट्राच्या परमेश्वराने आपल्या पूर्वजांना निवडून घेतले आणि इजिप्तमध्ये राहत असताना त्यांना फलद्रूप केले. परमेश्वराने आपल्या महान बलाने त्यांना त्या देशातून व गुलामगिरीतून बाहेर आणले; 18रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले;#13:18 किंवा त्यांची काळजी घेतली 19त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली. 20हे सर्व घडून येण्यास सुमारे चारशे पन्नास वर्षे लागली.
“त्यानंतर, परमेश्वराने त्यांना शमुवेल संदेष्टा येईपर्यंत न्यायाधीश नेमून दिले. 21यानंतर लोकांनी राजा मागितला आणि परमेश्वराने त्यांना बन्यामीन वंशातील कीशाचा पुत्र शौलाला राजा म्हणून दिले, त्याने चाळीस वर्षे राज्य केले. 22शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्या प्रत्येक गोष्टी तो करेल.’
23“परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे. 24येशू येण्यापूर्वी, योहानाने सर्व इस्राएली लोकांना पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा उपदेश केला. 25योहानाचे कार्य संपत आलेले असताना, योहानाने विचारले: ‘मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? तुम्ही ज्याची वाट पाहता तो मी नाही. परंतु जो माझ्यामागून येत आहे, त्याच्या पादत्राणाचे बंद सोडण्याइतकी सुद्धा माझी योग्यता नाही.’
26“अब्राहामाची संतान, माझ्या प्रिय भावांनो आणि परमेश्वराचे भय धरणार्या गैरयहूदीयांनो, तारणाचा संदेश आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. 27यरुशलेममधील लोकांनी व त्यांच्या शासकांनी येशूंना ओळखले नाही, त्यांना दोषी ठरवून संदेष्ट्यांच्या त्या शब्दांची पूर्तता केली, ज्या शब्दांचे वाचन प्रत्येक शब्बाथ दिवशी त्यांच्यामध्ये केले जात होते. 28त्यांना जिवे मारण्यासाठी एकही योग्य पुरावा त्यांना सापडला नाही, तरी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी पिलाताकडे केली. 29त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरविले व कबरेत ठेवले. 30परंतु परमेश्वराने त्यांना मृतांतून उठविले, 31जे गालीलाहून प्रवास करीत यरुशलेमला त्यांच्याबरोबर आले होते, त्यांना पुष्कळ दिवस ते प्रकट झाले. तेच आता आपल्या लोकांस त्यांचे साक्षीदार आहेत.
32“यासाठी, आम्ही तुम्हाला शुभवार्ता सांगतो की: 33परमेश्वराने ते वचन त्यांनी येशूंना मरणातून उठवून आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या संतानासाठी पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे दुसर्या स्तोत्रसंहितेमध्ये असे लिहिले आहे:
“ ‘तू माझा पुत्र आहे
आज मी तुझा पिता झालो आहे.’#13:33 स्तोत्र 2:7
34त्यांना कुजण्याचा अनुभव कधीही येऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना मरणातून जिवंत केले. परमेश्वर असे म्हणाले,
“ ‘दावीद राजाला पवित्र व निश्चित आशीर्वाद देण्याचे वचन मी दिले होते.’#13:34 यश 55:3
35म्हणून दुसर्या एका ठिकाणीही असे लिहिले आहे,
“ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’#13:35 स्तोत्र 16:10
36“दावीदाने परमेश्वराच्या उद्देशाप्रमाणे आपल्या पिढीची सेवा केल्यानंतर तो मरण पावला; त्याला त्याच्या पूर्वजांबरोबर पुरले आणि त्याचे शरीर कुजले. 37परंतु ज्याला परमेश्वराने मृतातून उठविले आणि त्याचे शरीर कुजले नाही.
38“यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे. 39जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते. 40यास्तव सावध राहा, संदेष्ट्यांनी जे सांगितले ते तुमच्याबाबतीत होऊ नये:
41“ ‘निंदा करणार्यांनो, पाहा,
विस्मित होऊन नष्ट व्हा,
कारण आता मी तुमच्या काळात जे कार्य करणार आहे,
त्याबद्दल तुम्हाला कोणी सांगितले तरी
त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही.’#13:41 हब 1:5”
42पौल व बर्णबा सभागृह सोडून जात होते त्यावेळी पुढील शब्बाथ दिवशी या गोष्टींबद्दल त्यांनी अधिक माहिती द्यावी, अशी लोकांनी त्यांना विनंती केली. 43मग सभा संपल्यावर अनेक यहूदी आणि यहूद्यांच्या संस्कृतीप्रमाणे धर्मांतर करून आलेले भक्त पौल व बर्णबा यांच्यामागे गेले व त्यांच्याबरोबर बोलणे केले. त्यांनी परमेश्वराच्या कृपेमध्ये सतत वाढत राहावे असे पौल आणि बर्णबाने त्यांना उत्तेजन दिले.
44पुढील शब्बाथाच्या दिवशी शहरातील जवळपास सर्वच लोक प्रभूचे वचन ऐकण्यासाठी एकत्रित झाले. 45परंतु यहूद्यांनी समुदाय पाहिला, तेव्हा त्यांना हेवा वाटला आणि पौल जे बोलत होता त्याला विरोध करून त्यांनी त्याची निंदानालस्ती केली.
46मग पौल आणि बर्णबा हे निर्भयपणे बोलले: “हे परमेश्वराचे वचन प्रथम तुम्हाला देण्याचे अगत्य होते. ज्याअर्थी तुम्ही ते नाकारले आहे आणि सार्वकालिक जीवनाकरिता तुम्ही स्वतः योग्य नाहीत असे दाखविले आहे, त्याअर्थी आम्ही गैरयहूदीयांकडे वळतो. 47यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे:
“ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे,
म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”#13:47 यश 49:6
48गैरयहूदीयांनी जेव्हा हे ऐकले, तेव्हा ते आनंदित झाले आणि त्यांनी प्रभूच्या वचनाचा सन्मान केला व आणि ज्यांना सार्वकालिक जीवनासाठी नियुक्त करण्यात आले होते त्या सर्वांनी विश्वास ठेवला.
49प्रभूचे वचन सर्व प्रांतात पसरले. 50परंतु यहूदी पुढार्यांनी शहरातील उच्च वर्गातील धार्मिक स्त्रियांना व प्रमुख व्यक्तींना चिथविले. त्यांनी पौल व बर्णबा यांचा छळ करून त्यांना त्यांच्या प्रांतातून हाकलून दिले. 51तेव्हा त्यांनी इशारा म्हणून त्या शहराची धूळ तिथेच झटकून टाकली आणि ते इकुन्यास गेले. 52आणि शिष्य आनंदाने आणि पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले.
Currently Selected:
प्रेषित 13: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.