प्रेषित 21
21
यरुशलेमकडे
1शेवटी आम्ही अतिदुःखाने रडून त्यांचा निरोप घेतल्यावर, जहाजातून प्रवास करीत सरळ कोस येथे गेलो. दुसर्या दिवशी आम्ही रुदा येथे गेलो आणि तिथून पातराला गेलो. 2तिथे आम्हाला फेनिके प्रांताकडे जाणारे जहाज दिसल्यावर, आम्ही त्या जहाजात बसून पुढे प्रवासाला निघालो. 3जाताना आम्हाला सायप्रस बेट दिसले आणि त्याच्या दक्षिणेकडे जाऊन आम्ही पुढे सीरियातील सोर बंदरात उतरलो, कारण तिथे जहाजातील सामान खाली करावयाचे होते. 4तिथे आम्ही शिष्यांना शोधून काढले, मग तिथे त्यांच्याबरोबर आम्ही सात दिवस राहिलो. त्यांनी आत्म्याद्वारे पौलाला यरुशलेमकडे न जाण्याचा आग्रह केला. 5परंतु जेव्हा आम्हाला जाण्याची वेळ आली, तेव्हा तेथील सर्वजण पत्नी आणि लेकरांसोबत आमच्याबरोबर चालत शहराच्या सीमेपर्यंत आले आणि तिथे समुद्रकिनार्यावर आम्ही गुडघे टेकून प्रार्थना केली. 6एकमेकांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही जहाजात चढलो आणि ते घरी परत गेले.
7सोरापासूनचा जलप्रवास आम्ही चालू ठेवला व त्यानंतर आम्ही प्टोलेमाईस येथे उतरलो. तेथील बंधू, भगिनींची आम्ही भेट घेतली आणि एक दिवस त्यांच्याबरोबर राहिलो. 8दुसर्या दिवशी आम्ही निघालो व कैसरीया येथे पोहोचलो आणि सुवार्तिक फिलिप्पाच्या घरी राहिलो, तो सात जणांपैकी एक होता. 9त्याला चार अविवाहित कन्या होत्या, त्या भविष्यवाणी करीत असत.
10आम्ही अनेक दिवस तिथे राहिल्यानंतर, एक अगब नावाचा संदेष्टा यहूदीया येथून तिथे आला. 11आम्हाकडे येऊन त्याने पौलाचा कमरबंद घेतला व स्वतःचे हातपाय बांधून तो म्हणाला, “पवित्र आत्मा म्हणतो, ‘हा कमरबंद ज्या मनुष्याचा आहे त्याला यरुशलेममधील यहूदी पुढारी असेच बांधून गैरयहूदीयांच्या हाती देतील.’ ”
12हे ऐकल्यानंतर आम्ही आणि लोकांनी पौलाला यरुशलेमला न जाण्याची विनंती केली. 13पौल म्हणाला, “तुम्ही रडून माझे हृदय का तोडता? यरुशलेममध्ये केवळ तुरुंगात पडण्याचीच माझी तयारी नाही, तर प्रभू येशूंच्या नावासाठी मरण्यास देखील मी तयार आहे.” 14त्याचे मन वळत नाही हे पाहून आम्ही म्हणालो, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
15यानंतर आम्ही यरुशलेमकडे जाण्यास निघालो. 16कैसरीयातील काही शिष्य आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला जिथे राहणार होतो त्या म्नासोनच्या घरी आणले. हा मनुष्य सायप्रसचा असून प्रारंभीच्या शिष्यांपैकी एक होता.
पौलाचे यरुशलेम येथे आगमन
17आम्ही यरुशलेममध्ये आल्यावर विश्वासणार्यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. 18दुसर्या दिवशी पौल व आम्ही याकोबास भेटण्यास गेलो. तिथे सर्व वडीलजनही उपस्थिती होते. 19क्षेमकुशल विचारल्यानंतर पौलाने आपल्या सेवेद्वारे परमेश्वराने गैरयहूद्यांमध्ये जे कार्य केले होते त्याचा सविस्तर अहवाल दिला.
20त्यांनी हे ऐकले व परमेश्वराची स्तुती केली. नंतर ते पौलाला म्हणाले: “हे पाहा बंधू, हजारो यहूद्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते सर्वजण नियमशास्त्राच्या बाबतीत उत्साही आहेत. 21तुझ्याविषयी त्यांना असे कळविण्यात आले आहे की, तू गैरयहूदी लोकांमध्ये राहणार्या सर्व यहूदीयांस मोशेपासून फिरा आणि आपल्या मुलांची सुंता करू नका किंवा आपल्या रूढी व प्रथांप्रमाणे राहू नका असे शिकवितोस. 22तर आम्ही आता काय करावे? कारण तू येथे आला आहेस हे ते खात्रीने ऐकतील, 23तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत. 24तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही. 25गैरयहूदी विश्वासणार्यांबद्दल म्हणशील तर आम्ही आमचा निर्णय त्यांना लिहून कळविला आहे की त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्त सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून स्वतःला दूर ठेवावे.”
26दुसर्या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला.
पौलाला अटक
27ते सात दिवस अंदाजे संपत आलेले असताना, आशियातून आलेल्या काही यहूद्यांनी पौलाला मंदिरात पाहिले. तेव्हा त्यांनी सर्व जमावाला चिथविले व त्याला पकडले, 28ते मोठ्याने ओरडत म्हणाले, “अहो इस्राएल लोकहो, आमची मदत करा! हा मनुष्य प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी आपल्या लोकांविरुद्ध, आपल्या नियमांविरुद्ध व या स्थळाबद्दल शिकवण देतो आणि याशिवाय या मनुष्याने गैरयहूदी लोकांना येथे आणून हे पवित्र मंदिर भ्रष्ट केले आहे.” 29या आधी त्यांनी पौलाला इफिस येथील त्रोफिमबरोबर शहरात पाहिले होते आणि पौलाने त्याला मंदिरात आणले असावे असा त्यांचा समज झाला होता.
30तेव्हा सर्व शहर खळबळून गेले आणि सर्व बाजूंनी लोक धावत आले. पौलाला जबरदस्तीने पकडून मंदिरातून ओढून काढण्यात आले आणि तत्काळ दरवाजे बंद करण्यात आले. 31ते त्याला ठार करण्याच्या विचारात होते, एवढ्यात रोमी लष्करी ठाण्याच्या सेनापतीकडे बातमी गेली की सर्व यरुशलेममध्ये गोंधळ माजला आहे. 32तेव्हा तो त्वरित आपल्या सैनिकांना व अधिकार्यांना घेऊन धावत समुदायाकडे गेला. मारणार्यांनी सेनापतीला व फौजेला येताना पाहिल्याबरोबर पौलाला फटके मारण्याचे थांबविले.
33सेनापतीने येऊन त्याला अटक केली आणि दोन साखळ्यांनी त्याला बांधण्यात यावे अशी आज्ञा केली. नंतर त्याने तो कोण होता आणि त्याने काय केले होते याची चौकशी केली. 34तेव्हा समुदायातील काही लोक एक आणि इतर दुसरे काहीतरी म्हणत होते. या गलबल्यामुळे सेनापतीला खरे ते काही कळेना, म्हणून त्याने पौलाला बराकीत नेण्याचा हुकूम दिला. 35पौल पायर्यांपर्यंत पोहोचला, त्यावेळी लोकांची हिंसा एवढी वाढली की होती की सैनिकांना त्याला उचलून न्यावे लागले. 36त्याच्यामागे चालत येणारा लोकसमुदाय सारखा ओरडत होता, “याची विल्हेवाट लावा!”
पौलाचे जमावापुढे भाषण
37पौलाला सैनिक आता बराकीत नेणार, एवढ्यात तो सेनापतीला म्हणाला, “मी आपल्याबरोबर काही बोलू शकतो काय?” त्याने त्याला विचारले.
“तुला ग्रीक भाषा येते काय? 38ज्या इजिप्तच्या मनुष्याने थोड्या दिवसांपूर्वी बंड उठवून चार हजार दहशतवाद्यांस रानात नेले होते, तो तूच आहेस नाही का?”
39पौलाने उत्तर दिले, “मी यहूदी आहे व किलिकियातील तार्सस शहराचा नागरिक असून, माझे शहर सर्वसामान्य नाही. कृपा करून या लोकांबरोबर मला बोलू द्यावे.”
40सेनापतीची परवानगी मिळाल्यावर, पौल पायर्यांवर उभा राहिला आणि लोकांनी शांत राहवे, असे त्याने हाताने खुणावले. ते सर्व शांत झाल्यावर, तो इब्री भाषेत म्हणाला:
Currently Selected:
प्रेषित 21: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.