YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 26

26
प्रथम फळे आणि दशांश
1जेव्हा तुम्ही याहवेह तुमचे परमेश्वराने वतन दिलेल्या देशात प्रवेश कराल, तो जिंकून त्याचा ताबा घ्याल आणि तिथे वस्ती कराल, 2तेव्हा याहवेह तुमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीतील प्रत्येक पिकाचे प्रथम उत्पन्न एका टोपलीत आणावे. नंतर याहवेह तुमचे परमेश्वर आपल्या नावासाठी जे वसतिस्थान निवडून देतील त्या ठिकाणी तुम्ही जावे 3आणि त्यावेळी सेवा करीत असलेल्या याजकास म्हणा, “याहवेह तुमच्या परमेश्वराला आज मी जाहीर करतो, की आमच्या पूर्वजांना वचन देऊ केलेल्या देशात मी आलो आहे.” 4मग याजक ती टोपली तुमच्या हातून घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वराच्या वेदीपुढे ठेवेल. 5नंतर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर म्हणावेः “आमचे पूर्वज अरामी, हे निर्वासित होऊन आश्रयासाठी इजिप्त देशास गेले. ते संख्येने अगदी थोडे होते, पण इजिप्त देशात ते एक विशाल, बलाढ्य आणि थोर राष्ट्र बनले. 6इजिप्त देशातील लोकांनी आम्हाला वाईट रीतीने वागविले, आमच्यावर जुलूम केला व कठोर परिश्रम लादले 7तेव्हा आम्ही याहवेहचा, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराचा धावा केला आणि याहवेहने आमचे गार्‍हाणे ऐकले, आमच्या अडचणी जाणल्या आणि आमच्यावर होत असलेला जुलूम व अत्याचार त्यांनी पाहिला. 8मग याहवेहने महान चमत्कारांनी, सामर्थ्यशाली बाहुबलाने व पसरलेल्या हातांनी आणि भयावह चिन्ह व चमत्कार करून आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. 9त्यांनी आम्हाला या ठिकाणी आणले आणि दुधामधाचे प्रवाह वाहत असलेला हा देश आम्हाला दिला; 10आता, हे याहवेह परमेश्वरा, तुम्ही जी भूमी आम्हाला दिली आहे, त्यात उगविलेल्या धान्याचे प्रथम उत्पन्न आम्ही आणले आहे.” नंतर ते अर्पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे ठेवावे व त्यांची उपासना करावी. 11त्यानंतर याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या सर्व चांगल्या गोष्टी तुम्हाला दिल्या, त्याबद्दल तुम्ही, लेवी व परदेशी लोक या सर्वांनी मिळून आनंदोत्सव साजरा करावा.
12तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाचा दशांश तिसर्‍या वर्षी, म्हणजे दशांशाच्या वर्षी लेवी वंशजांना, परदेशी लोकांना, अनाथांना आणि विधवांना द्यावा, म्हणजे तुमच्या नगरात ते खाऊन तृप्त होतील. 13मग तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर सांगावे, “मी माझ्या घरातून पवित्र हिस्सा काढला आहे. लेवी वंशजांना, परदेशीयांना, अनाथांना आणि विधवांना तुमच्या आज्ञेप्रमाणे दिला आहे. मी कोणतीही आज्ञा मोडली नाही किंवा तुमचा कोणताही नियम विसरलो नाही. 14मी विलाप करीत असताना त्या पवित्र वाट्यातील काहीही खाल्ले नाही, धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने अशुद्ध असताना ते घराच्या बाहेर नेले नाही किंवा एखाद्या मृत व्यक्तीला अर्पण केले नाही. हे माझ्या याहवेह परमेश्वरा, मी तुमचे आज्ञापालन केले आहे. तुम्ही सांगितलेले सर्वकाही मी केले आहे. 15म्हणून हे परमेश्वरा, स्वर्गातील तुमच्या पवित्र निवासस्थानातून तुम्ही खाली पाहा आणि आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे जो दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा देश तुम्ही आम्हाला दिला आहे त्याला व आम्हा इस्राएली लोकांना आशीर्वादित करा.”
याहवेहच्या नियमाचे पालन
16आज याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला ज्या आज्ञा आणि विधी देत आहेत, त्या आज्ञा व विधी यांचे तुम्ही पूर्ण मनाने व पूर्ण जिवाने पालन करावे; 17कारण ते याहवेह तुमचे परमेश्वर आहेत, असे तुम्ही आज जाहीरपणे मान्य केले आहे; त्यांचे नियम आणि विधी पाळण्याचे आणि ते जे काही सांगतील ते करण्याचे तुम्ही वचन दिले आहे. 18आणि याहवेहनेही वचन दिल्याप्रमाणे स्वतःचे लोक व त्यांचा मोलवान ठेवा म्हणून त्यांनी आज तुमचा स्वीकार केला आहे व तुम्ही त्यांच्या सर्व आज्ञा अवश्य पाळाव्या. 19ते तुम्हाला इतर कोणत्याही राष्ट्रापेक्षा थोर करतील आणि तुम्हाला प्रशंसा, किर्ती व सन्मान प्राप्त होतील आणि त्यांनी वचन दिल्यानुसार तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे पवित्र लोक व्हाल.

Currently Selected:

अनुवाद 26: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in