YouVersion Logo
Search Icon

अनुवाद 8

8
याहवेहचे विस्मरण होऊ देऊ नका
1आज मी तुम्हाला देत असलेल्या आज्ञांचे तुम्ही काळजीपूर्वक पालन करावे. जेणेकरून तुम्ही जिवंत राहाल व बहुगुणित व्हाल आणि याहवेहने तुमच्या पूर्वजांना शपथ दिलेल्या देशात जाऊन तो ताब्यात घ्याल. 2याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला रानात चाळीस वर्षात कसे चालविले, त्यांनी तुम्हाला कसे नम्र केले व तुमची परीक्षा कशी पाहिली, याची तुम्ही आठवण करा. तुमच्या अंतःकरणात काय होते, तुम्ही त्यांच्या आज्ञा पाळणार की नाही, हे पाहण्यासाठी त्यांनी असे केले. 3तुमची उपासमार करून तुम्हाला नम्र केले व नंतर तुम्हाला आणि तुमच्या पूर्वजांनाही पूर्वी कधीही माहिती नसलेला मान्ना खावयास देऊन तुम्हाला शिकविले की, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर याहवेहच्या मुखातून निघणार्‍या प्रत्येक वचनाने जगेल. 4या चाळीस वर्षात तुमचे कपडे कधी जीर्ण झाले नाहीत, की तुमच्या पायांना सूज आली नाही. 5तेव्हा तुम्हाला हे समजावे की, जसा पिता आपल्या पुत्राला शिस्त लावतो तसे याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला शिस्त लावतात.
6याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करा, त्यांच्या आज्ञेत राहा आणि त्यांचा आदर करा. 7कारण याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला उत्तम अशा देशात नेणार आहेत—त्यात नद्या, झरे व ओहोळ हे डोंगरात उगम पावून खोर्‍यांमधून वाहत आहेत; 8गहू व जव, द्राक्षमळे, अंजिरे व डाळिंबे, जैतुनाचे तेल व मध यांचा तो देश आहे; 9या देशात भाकरीची उणीव भासणार नाही आणि कशाचीही कमतरता राहणार नाही; तेथील दगड लोहयुक्त आहेत व डोंगरांमधून तांबे खणून काढता येईल.
10जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम देश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करा. 11परंतु याच वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्या समृद्धीत याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल व त्यांच्या ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुम्हाला आज देत आहे, त्या पाळण्याचे सोडून द्याल. 12कारण जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, जेव्हा सुंदर घरे बांधाल आणि त्यात वस्ती कराल, 13आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल, 14तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल. 15विषारी सापाचा आणि विंचवांचा धोका असलेल्या अफाट व भयानक रानातून व उष्ण आणि कोरड्या भूमीतून त्यांनी तुम्हाला आणले. शुष्क भूमीत खडक फोडून तुम्हाला पाणी दिले. 16त्यांनी तुम्हाला रानात खावयास मान्ना दिला, जो तुमच्या पूर्वजांना कधीच माहीत नव्हता, यासाठी की त्यांनी तुम्हाला नम्र करावे आणि तुमची परीक्षा घ्यावी, जेणेकरून शेवटी तुमचे भले व्हावे. 17तुम्ही आपल्या मनात म्हणाल, “माझ्या शक्तीने व माझ्या हाताच्या बळाने मी हे धन मिळविले आहे.” 18परंतु याहवेह तुमच्या परमेश्वराचे स्मरण ठेवा, कारण संपत्ती निर्माण करण्याचे सामर्थ्य केवळ तेच तुम्हाला पुरवितात, आणि आजच्या प्रमाणेच ते तुमच्या पूर्वजांशी शपथपूर्वक केलेल्या कराराची पुष्टी करतात.
19परंतु जर तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल, त्यांना सोडून इतर दैवतांच्या मागे लागाल आणि त्यांची उपासना कराल व त्यांना नमन कराल, तर आज मी तुमच्याविरुद्ध साक्ष देतो की, तुम्ही खात्रीने नाश पावाल. 20याहवेहने इतर राष्ट्रांचा तुमच्यापुढे जसा नाश केला, तसाच याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुमचाही नाश होईल.

Currently Selected:

अनुवाद 8: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in