2
सुख-विलास निरर्थक आहेत
1मी स्वतःशी म्हटले, “आता ये, चांगले काय आहे, ते शोधण्यासाठी आनंदाने मी तुझी पारख करतो.” पण ते देखील व्यर्थच असे सिद्ध झाले. 2मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?” 3मी स्वतःला द्राक्षारसाने हर्षित करण्याचा प्रयत्न केला व मूर्खता जवळ करून—तरीही माझे मन मला ज्ञानाने चालवित होते. मनुष्य या पृथ्वीवरील थोडक्या दिवसांमध्ये काय चांगले करू शकतो हे मला हे बघायचे होते.
4मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले. 5मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली. 6त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले. 7मी दास व दासी खरेदी केले आणि माझ्या घरात जन्मलेले इतर दास देखील होते. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये कोणाही कडे नव्हते इतके जास्त कळप आणि गुरे माझ्या मालकीचे होते. 8मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी#2:8 या वाक्यांचा हिब्रू अर्थ अनिश्चित आहे. जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते. 9माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले.
10माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही;
माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही.
माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे,
हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.
11तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे,
आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला,
तर सर्वकाही व्यर्थ, वार्याचा पाठलाग करण्यासारखे होते;
सूर्याखाली काहीच लाभले नाही.
ज्ञान आणि मूर्खपणा निरर्थक आहे
12मग मी सुज्ञान समजून घ्यावे,
आणि वेडेपणा व मूर्खता हे सुद्धा कळावे म्हणून मी माझे विचार त्याकडे वळविले.
जे गतकाळात केलेले आहे त्यापेक्षा अधिक
एखाद्या राजाच्या नंतर येणारा पुरुष#2:12 पुरुष म्हणजे उत्तराधिकारी काय करू शकतो?
13मी पाहिले की सुज्ञान मूर्खतेपेक्षा अधिक चांगले आहे,
जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
14सुज्ञ व्यक्तीच्या मस्तकावर नेत्र आहेत,
तर मूर्ख अंधारात चालत असतो;
परंतु मला समजले की
अंतिम परिणाम त्या दोघांवर मात करतो.
15मग मी स्वतःला म्हणालो,
“जे मूर्खाचे नशीब आहे तेच माझेही असेल”
“तर शहाणपणाने मी काय मिळविणार.”
मी स्वतःला म्हणालो,
“हे सुद्धा सर्व निरर्थक आहे.”
16कारण सुज्ञसुद्धा मूर्खाप्रमाणे जास्त काळापर्यंत स्मरणात ठेवला जाणार नाही;
असे दिवस आले आहेत, जेव्हा दोघांचाही विसर पडेल.
मूर्खाप्रमाणे सुज्ञसुद्धा मरण पावेल!
परिश्रम व्यर्थ आहे
17म्हणून आता मला जीवनाचा वीट आला आहे, कारण सूर्याखाली जे काही केले जात आहे, ते मला दुःख देणारे आहे. ते सर्वकाही व्यर्थ, वार्यामागे धावण्यासारखे आहे. 18या सूर्याखाली मी ज्याच्यासाठी कष्ट केले, त्या सर्वाचा मला द्वेष वाटू लागला, कारण जे लोक माझ्यानंतर येणार त्यांच्यासाठी ते मला सोडून द्यावे लागणार. 19कोणाला माहीत की तो व्यक्ती सुज्ञ असेल वा मूर्ख? तरीही सूर्याखाली ज्यामध्ये मी माझे प्रयत्न आणि कौशल्य ओतले, त्या माझ्या या कष्टाच्या प्रतिफळांचा ताबा त्यांच्याकडे असेल. हे सुद्धा व्यर्थच आहे. 20म्हणून या सूर्याखाली केलेल्या माझ्या सर्व श्रमाबद्दल माझे हृदय निराश होऊ लागले. 21कारण एखादी व्यक्ती सुज्ञान, विद्या आणि कौशल्य यांच्या साहाय्याने कष्ट करते आणि ते अशा व्यक्तीच्या हाती सोडते, की ज्याने त्यासाठी काहीही श्रम केलेले नाहीत. हे सुद्धा निरर्थक आणि मोठ्या दुर्भाग्याचे आहेत. 22सूर्याखाली त्या लोकांचे सर्व कष्ट, ज्यासाठी त्यांनी मनापासून परिश्रम केले त्याचे त्यांना काय मिळणार? 23त्यांच्या सर्व दिवसांत, त्यांचे काम त्यांना दुःख आणि वेदना अशा आहेत; रात्रीच्या वेळीसुध्दा त्यांचे मन विश्रांती घेत नाही. हे सुद्धा व्यर्थच आहे.
24खाणे आणि पिणे करून स्वतःच्या कष्टामधून समाधान मिळविणे यापेक्षा मानव अधिक चांगले काय करू शकतो आणि मी पाहतो की, हे सुद्धा परमेश्वराच्याच हातात आहे, 25कारण परमेश्वराशिवाय कोण उत्तम भोजन करेल व कोणाला आनंदाचा उपभोग घेता येईल? 26जो व्यक्ती परमेश्वराला संतुष्ट करतो, त्याला परमेश्वर ज्ञान, बुद्धी आणि आनंद देतात, परंतु पाप्यांना संपत्ती गोळा करून ती जो व्यक्ती परमेश्वराला प्रसन्न करतो त्याच्या हाती सोपविण्याचे कार्य दिले आहे. हे सुद्धा वार्याचा पाठलाग करण्यासारखे व्यर्थ आहे.