YouVersion Logo
Search Icon

उपदेशक 1

1
सर्वकाही व्यर्थ
1यरुशलेम येथील दावीद राजाचा पुत्र, उपदेशकाची#1:1 किंवा सभेचा नायक वचने:
2“व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!”
उपदेशक म्हणतो.
“निव्वळ व्यर्थ!
सर्वकाही व्यर्थ आहे.”
3या सूर्याखाली लोक जे कष्ट करतात,
त्याचा त्यांना काय लाभ?
4पिढ्या येतात आणि पिढ्या जातात,
परंतु पृथ्वी सर्वकाळ अस्तित्वात राहते.
5सूर्य उगवतो आणि अस्त पावतो,
आणि आपल्या उगवतीच्या स्थानाकडे घाईने परत जातो.
6वारा दक्षिणेकडे वाहतो
आणि उत्तरेकडे वळतो;
तो गोल गोल भ्रमण करीत
आपल्या ठिकाणी परत जातो.
7सर्व प्रवाह समुद्रास मिळतात,
तरीही समुद्र कधी भरलेला नाही.
नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात,
जिथून त्यांचा उगम होतो,
8सर्वकाही त्रासाने भरलेले आहे,
जे कोणाला शब्दात सांगता येत नाही.
नेत्र बघून कधी समाधानी होत नाहीत.
कान सुद्धा ऐकून भरत नाहीत.
9जे घडले ते पुन्हा एकदा होणार,
जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल;
सूर्याखाली नवे असे काही नाही.
10“पाहा! हे काहीतरी नवे आहे,
असे कोणी म्हणू शकेल काय?”
हे तर पूर्वकाळापासूनच होते;
आमच्या काळापूर्वीच ते होते.
11पुढे येणार्‍या पिढीला,
पूर्वीच्या पिढ्यांची आठवण नाही
आणि पुढे येणार्‍या पिढीला सुद्धा
त्याचे स्मरण नसेल.
सुज्ञानाची व्यर्थता
12मी, उपदेशक, यरुशलेममध्ये इस्राएलचा राजा होतो. 13आकाशाखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास आणि शोध सुज्ञानाने करण्यासाठी मी माझ्या बुद्धीचा उपयोग केला. परमेश्वराने मनुष्यावर किती जड ओझे लादले आहे! 14सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्‍यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत.
15जे वाकडे आहे, ते सरळ करता येत नाही;
जी उणीव आहे, ती मोजता येत नाही.
16मी स्वतःला म्हटले, “पाहा, यरुशलेममध्ये माझ्या आधी राज्य करून गेलेल्या राजांपेक्षा, मी अधिक सुज्ञान प्राप्त केले आहे; सुज्ञान आणि विद्या यांचा मला सर्वात अधिक अनुभव घडला आहे.” 17मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्‍याचा पाठलाग केल्यासारखे आहे.
18कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते;
जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख.

Currently Selected:

उपदेशक 1: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in