31
राजा लमुवेलची नीतिसूत्रे
1राजा लमुवेलची ही नीतिसूत्रे—त्याच्या आईने प्रेरणेने शिकविलेली ही वचने आहेत.
2माझ्या मुला ऐक! माझ्या पोटच्या मुला ऐक!
माझ्या प्रार्थनांचे मिळालेले उत्तर, अशा माझ्या मुला ऐक!
3तुझी शक्ती#31:3 किंवा संपत्ती स्त्रियांच्या सहवासात घालवू नको.
जे राजांचा नाश करतात, त्यांच्यासाठी तुझे बळ घालवू नको.
4हे लमुवेला, राजांसाठी हे अयोग्य आहे—
मद्य पिणे हे राजांसाठी योग्य नाही
किंवा मदिरेची इच्छा बाळगणे हे राजांना शोभत नाही.
5असे होऊ नये की, त्यांनी मद्य प्राशन करावे आणि त्यांना दिलेला हुकूमनामा विसरून जावे,
आणि सर्व जाचलेल्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित करावे.
6ज्यांचा नाश होत आहे त्यांना मदिरा पिऊ द्या,
जे यातनेमध्ये आहेत त्यांना मद्य पिऊ द्या!
7त्यांना पिऊ द्या आणि त्यांचे दारिद्र्य विसरू द्या,
आणि त्यांच्या क्लेशाचे विस्मरण होऊ द्या.
8जे स्वतःसाठी बोलण्यास असमर्थ आहेत, त्यांच्यातर्फे बोल,
जे सर्व निराश्रित आहेत त्यांच्या हक्कासाठी तू बोल.
9गोरगरीब आणि गरजवंत यांचा कैवार घे;
त्यांच्यासाठी बोल आणि त्यांना निष्पक्ष न्याय मिळवून दे.
समारोप: सद्गुणी पत्नीचे वर्णन
10सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल?
तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
11तिचा पती तिच्यावर पूर्ण भरवसा ठेवतो,
आणि त्याला कोणत्याही मोलवान वस्तूची उणीव पडत नाही.
12आयुष्यभर ती त्याच्या हितासाठी झटते,
त्याचे अहित करीत नाही.
13ती लोकर व ताग मिळविते
आणि कामात गर्क राहून ते पिंजते.
14ती एका व्यापारी जहाजासारखी आहे,
तिची भोजनसामुग्री ती फार लांब जाऊन आणते.
15ती रात्र सरताच उठते;
आणि तिच्या कुटुंबीयांच्या भोजनाचा प्रबंध करते
आणि दासींना त्यांचा वाटा पुरविते.
16ती शेत घेण्याचा विचार करते, आणि ते विकत घेते;
तिच्या मिळकतीमधून ती द्राक्षमळा लावते.
17ती उत्साही व कष्टाळू आहे.
कामे पूर्ण करण्यासाठी तिचे बाहू सशक्त आहेत.
18तिचा व्यापार लाभदायक व्हावा यासाठी ती सतर्क असते,
आणि तिचा दिवा रात्रीही मालवत नाही.
19ती तिच्या हातांमध्ये चाती धरते,
आणि ती बोटांनी चरकी चालविते.
20ती गरिबांना उदारहस्ते देते
आणि गरजूंना सढळ हाताने देते.
21हिवाळा येतो तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची चिंता करीत नसते;
कारण ते सर्वजण किरमिजी वस्त्र घातलेले असतात.
22ती तिचा पलंग सजविण्यासाठी चादरी विणते;
ती रेशमी तागाचा आणि जांभळा पोशाख घालते.
23तिच्या पतीला नगराच्या वेशीत सन्मान मिळतो,
जिथे तो देशातील पुढार्यांबरोबर बसतो.
24ती तागाची वस्त्रे करून विकते
आणि व्यापार्यांना कमरबंद पुरविते.
25बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत.
भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते.
26तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत.
तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.
27घरातील प्रत्येक गोष्टींवर तिचे बारकाईने लक्ष असते;
आळसाने मिळवलेली भाकर ती कधीही खात नाही.
28तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात;
आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो:
29“उत्कृष्ट कार्य करणार्या अनेक स्त्रिया आहेत,
पण त्या सर्वात तू उत्तम आहेस.”
30मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते,
परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.
31तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर,
आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.