YouVersion Logo
Search Icon

इफिसकरांस 1

1
1परमेश्वराच्या इच्छेने झालेला ख्रिस्त येशूंचा प्रेषित पौल याजकडून,
इफिस शहरातील ख्रिस्त येशूंमधील विश्वासू असलेल्या परमेश्वराच्या पवित्र लोकांना,
2आपले परमेश्वर पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती लाभो.
ख्रिस्तामधील आध्यात्मिक आशीर्वादासाठी स्तुती
3परमेश्वर आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता यांची स्तुती असो, ज्यांनी आपल्याला स्वर्गामधील सर्व आत्मिक आशीर्वादाने ख्रिस्तामध्ये आशीर्वादीत केले आहे. 4आम्ही त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक असावे म्हणून त्यांनी जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्तामध्ये प्रीतिमुळेच निवडले. 5त्यांच्या आनंदास आणि इच्छेस अनुसरून येशू ख्रिस्ताद्वारे आपण दत्तकपुत्र व्हावे, ही त्यांची पूर्व योजना होती; 6त्यांच्या प्रिय पुत्राद्वारे आपल्याला मुक्तपणे दिलेल्या गौरवयुक्त कृपेची स्तुती व्हावी. 7त्यांच्यामध्ये परमेश्वराच्या विपुल कृपेद्वारे व त्यांच्या रक्ताद्वारे खंडणी म्हणून आपल्याला पापांची क्षमा देऊन 8आपल्यावर कृपेची वृष्टी केली आहे. सर्व ज्ञान व बुद्धिने, 9त्यांनी ख्रिस्तामध्ये त्यांच्या इच्छेचे रहस्य त्यांच्या उद्देशानुसार आपल्याला कळविले आहे. 10ही योजना काळाच्या पूर्णतेची होती, यासाठी की स्वर्गातील आणि पृथ्वीवरील सर्वगोष्टी ख्रिस्तामध्ये एकत्र व्हाव्या.
11कारण ज्यांच्या इच्छेनुसार व उद्देशानुसार जे सर्वकाही चालवितात, त्यांच्या पूर्व योजनेनुसार आपण त्यांच्यामध्ये निवडलेले होतो. 12यात उद्देश असा होता की, आपण ज्यांनी ख्रिस्तावर प्रथम आशा ठेवली होती, त्यांनी त्यांच्या गौरवाच्या स्तुतीचे साधन व्हावे. 13जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला, 14आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.
उपकारस्तुती आणि प्रार्थना
15या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून 16माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण ठेवून तुम्हासाठी आभार मानण्याचे मी थांबविले नाही. 17माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरवशाली पिता जे परमेश्वर, यांनी तुम्हाला ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा. 18मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे. 19जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे 20ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले, 21जे स्थान सर्व शासन आणि अधिकार, सामर्थ्य आणि प्रभुता व सध्याच्या युगात व येणार्‍या युगातील कोणत्याही नावांपेक्षाही सर्वोच्च आहे, 22आणि परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आणि मंडळीसाठी प्रत्येक गोष्टींमध्ये मस्तक म्हणून नियुक्त केले. 23मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in