YouVersion Logo
Search Icon

गलातीकरांस 5

5
ख्रिस्तामध्ये स्वातंत्र्य
1ख्रिस्ताने स्वातंत्र्यासाठी आपल्याला मुक्त केले आहे म्हणून त्यामध्ये स्थिर राहा व पुन्हा दास्यत्वाच्या जुवाखाली सापडू नका.
2माझे ऐकून घ्या! मी पौल तुम्हाला सांगतो की जर तुम्ही स्वतः सुंता करून घेत असाल, तर ख्रिस्ताचे तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. 3मी पुन्हा प्रत्येक मनुष्यास जाहीर करतो की जो कोणी आपली सुंता करून घेईल, तो पूर्ण नियमशास्त्र आचरण्यास बांधलेला आहे. 4तुम्ही नीतिमान ठरावे म्हणून नियमांचे पालन करता ते तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे झाले आहात; आणि परमेश्वराच्या कृपेला अंतरले आहात. 5आम्ही पवित्र आत्म्याद्वारे नीतिमत्व प्राप्त करावे या विश्वासाने आशा धरून वाट पाहत आहोत. 6ख्रिस्त येशूंमध्ये सुंता होणे किंवा न होणे याला काही महत्व नाही; फक्त एकच गोष्ट अगत्याची आहे ती म्हणजे विश्वास प्रीतीद्वारे प्रकट व्हावा.
7तुम्ही चांगली धाव धावत होता तर तुम्हाला सत्याचे पालन करण्यास कोणी अडखळण केले? 8हे मन वळविण्याचे काम ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे त्याच्याकडून होत नाही. 9“थोडेसे खमीर सर्व पिठाच्या गोळ्याला फुगविते.” 10मला प्रभुमध्ये विश्वास आहे, की तुम्ही अन्य विचारांचा स्वीकार करणार नाही. तुम्हाला गोंधळात टाकणारा मग तो कोणीही का असेना, त्याला दंड भोगावा लागेल. 11बंधू व भगिनींनो, मी जर अजूनही सुंतेचा प्रचार करतो तर माझा छळ अजूनही का होतो? तर मग क्रूसाच्या अडथळ्याचे निर्मूलन झाले असते. 12जे तुम्हाला हैराण करणारे आहेत, त्यांनी स्वतःला पूर्णरीतीने नपुंसक करून घ्यावे एवढीच माझी इच्छा आहे.
आत्म्याने प्रेरित जीवन
13बंधू व भगिनींनो, तुम्हाला स्वातंत्र्यासाठी पाचारण झाले आहे, ते देहवासना पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर प्रीतिने व नम्रपणाने एकमेकांची सेवा करण्यासाठी झाले आहे. 14कारण सर्व नियमशास्त्र या एका आज्ञेत सामावलेले आहे: “जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्‍यावर प्रीती करा.”#5:14 लेवी 19:18 15तुम्ही एकमेकांना टोचता व खाऊन टाकता तर एकमेकांचा नाश परस्परांच्या हातून होऊ नये म्हणून सांभाळा.
16मी तुम्हाला सांगतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. 17दैहिक इच्छा आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ते आपसात विरोधी आहेत, यासाठी की ज्याकाही गोष्टी तुम्हाला करावयास पाहिजे त्या तुम्ही करू नये. 18जर तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालता तर तुम्ही नियमशास्त्राधीन नाही.
19देहस्वभावाची कृत्ये उघड आहेत: लैंगिक अनैतिकता, अशुद्धता आणि दुर्व्यसनीपणा, 20मूर्तिपूजा आणि जादूटोणा, द्वेष, मतभेद, मत्सर, क्रोध, स्वार्थी इच्छा, कलह, तट, 21हेवा, दारुबाजी, गोंधळ आणि अशा प्रकारच्या गोष्टी ज्याबद्दल मी तुम्हाला पूर्वी सावध केले होते की जे कोणी असे जीवन जगतात त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
22परंतु आत्म्याची फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, दयाळूपणा, चांगुलपणा, विश्वासूपणा, 23सौम्यता व आत्मसंयमन; अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. 24जे ख्रिस्त येशूंचे आहेत, त्यांनी आपल्या दैहिक वासनांना व इच्छांना क्रूसावर खिळले आहे. 25जर आपण आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो, तर आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. 26तर आता आपण गर्विष्ठ होऊ नये व एकमेकांना चीड आणू नये.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in