इब्री 13
13
अखेरचा बोध
1बंधुप्रीतिमध्ये जडून राहा. 2अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे. 3तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.
4विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरुण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्यांचा न्याय परमेश्वर स्वतः करील. 5द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे,
“मी तुला कधीच सोडणार नाही
व तुला कधीच टाकणार नाही.”#13:5 अनु 31:6
6म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते:
“प्रभू माझे साहाय्यक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही.
नश्वर मानव मला काय करणार?”#13:6 स्तोत्र 118:6, 7
7तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा. 8येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत.
9म्हणून विचित्र, नव्या शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. जे खाऊन खाणार्याचा काहीच फायदा होत नाही असे विधिविषयक विशिष्ट पदार्थ खाण्याने नव्हे, तर तुमचे अंतःकरण कृपेने बळकट करणे चांगले आहे. 10आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही.
11वधलेल्या पशूंचे रक्त पापार्पण म्हणून मुख्य याजक नियमानुसार परमपवित्रस्थानात नेत असत व नंतर त्या पशूंची शरीरे छावणीबाहेर जाळून टाकीत. 12लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले. 13तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या. 14आपण तर स्वर्गातील भावी नगराची वाट पाहत आहोत, कारण आपल्याला या जगात स्थायिक नगर नाही.
15तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांचे नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या. 16चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना वाटेकरी करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.
17आपल्या पुढार्यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा. तुमच्या आत्म्यांवर नजर ठेवणे हे त्यांचे काम आहे, कारण तुमच्याविषयी त्यांना प्रभुला हिशेब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.
18आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे. 19तुमच्याकडे मी लवकर परत यावे म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची विशेष गरज आहे.
आशीर्वाद आणि अंतिम शुभेच्छा
20-21आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहे यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताच्याद्वारे करो व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना युगानुयुग गौरव असो. आमेन.
22बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे.
23बंधू तीमथ्य हा आता तुरुंगातून सुटला आहे, हे तुम्हाला माहिती असावे, अशी माझी इच्छा आहे; तो इकडे लवकर आला, तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन.
24मंडळीतील तुमच्या सर्व वडील जनांस व तेथील इतर पवित्र जणांना माझ्या शुभेच्छा सांगा.
माझ्याबरोबर येथे असलेले इटलीमधील विश्वासी बांधव तुम्हाला शुभेच्छा सांगतात.
25तुम्हा सर्वांवर परमेश्वराची कृपा असो.
Currently Selected:
इब्री 13: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.