YouVersion Logo
Search Icon

यशायाह 35

35
तारण पावलेल्यांचा आनंद
1वाळवंट आणि शुष्क भूमी आनंदित होईल;
अरण्य हर्षोल्हास करेल आणि बहरून येईल.
केशराच्या फुलाप्रमाणे, 2त्याच्या फुलोऱ्याचा स्फोट होईल;
तो मोठा आनंद करेल आणि उल्हासाने ओरडेल.
लबानोनचे गौरव,
कर्मेल आणि शारोन यांचे वैभव त्याला दिले जाईल;
ते याहवेहचे गौरव,
आमच्या परमेश्वराची भव्यता पाहतील.
3अशक्त हात बळकट करा,
निर्बल झालेले गुडघे स्थिर करा;
4भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा,
“बलवान व्हा, घाबरू नका;
तुमचे परमेश्वर येतील,
ते सूड घेण्यास येतील.
दैवी प्रतिफळ देऊन
तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”
5तेव्हा आंधळ्यांचे डोळे उघडतील
आणि बहिऱ्यांचे कान उघडले जातील.
6तेव्हा पांगळे हरिणाप्रमाणे उड्या मारतील,
आणि मुकी जीभ आनंदाने ओरडेल.
अरण्यामध्ये पाणी
आणि वाळवंटात झरे उफाळून वर येतील.
7तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल,
आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील.
जिथे कधी कोल्हे निजले,
त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.
8आणि तिथे एक महामार्ग असेल;
त्याला पवित्रतेचा मार्ग म्हटले जाईल;
तो त्यांच्यासाठी असेल जे त्या पवित्र मार्गावरून चालतात.
अशुद्ध असलेले त्यावरून प्रवास करणार नाहीत.
दुष्ट मूर्ख लोक त्यावरून चालणार नाहीत.
9तिथे कोणताही सिंह नसेल,
किंवा कोणताही वखवखलेला हिंस्र पशू नसेल.
ते तिथे सापडणार नाहीत.
फक्त तारण झालेलेच तिथे चालतील,
10आणि ज्यांना याहवेहने सोडविले, ते लोक परत येतील.
ते हर्षगीते गात सीयोनात प्रवेश करतील;
अनंतकाळचा उल्हास त्यांच्या मस्तकावर असेल.
हर्ष व उल्हासाने ते भरून जातील,
दुःख व शोक दूर पळून जातील.

Currently Selected:

यशायाह 35: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यशायाह 35