YouVersion Logo
Search Icon

यशायाह 48

48
हट्टी इस्राएल
1“याकोबाच्या वंशजांनो, हे ऐका
तुम्ही जे इस्राएल या नावाने ओळखले जाता,
आणि यहूदाह वंशावळीतून येता,
तुम्ही जे याहवेहच्या नावाने शपथ घेता
आणि इस्राएलाच्या परमेश्वराचा धावा करता—
परंतु सत्यतेत किंवा नीतिमत्तेत नव्हे—
2पवित्र नगरीचे रहिवासी असल्याचा दावा करता
आणि इस्राएलाच्या परमेश्वरावर अवलंबून असल्याची फुशारकी मारता—
ज्यांचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे:
3भावी काळात काय घडणार याबद्दल भविष्यवाणी मी फार पूर्वी केलेली आहे
मी माझ्या मुखाने ते घोषित करून जाहीर केले;
मग अकस्मात मी ते प्रत्यक्ष केले व तसे घडले.
4तुम्ही किती हेकेखोर आहात हे मला माहीत होते;
तुमच्या मानेचे स्नायू लोखंडाचे
आणि तुमचे कपाळ कास्याचे आहेत.
5याकारणास्तव या गोष्टी फार पूर्वीच सांगितल्या;
प्रत्यक्ष वेळ येण्यापूर्वीच त्या मी तुम्हाला जाहीर केल्या,
जेणेकरून तुम्ही असे म्हणू शकणार नाही,
‘आमच्या कोरीव मूर्तीने हे घडवून आणले;
आमच्या लाकडी मूर्तीने व धातूच्या दैवतांनी ती आज्ञा दिली होती.’
6ही भविष्ये तुम्ही ऐकलेली आहेत; त्या सर्वांकडे बघा.
ती तुम्ही स्वीकारीत नाही का?
“यापुढे मी तुमच्यापासून लपवून ठेवलेल्या
नव्या गोष्टी सांगतो.
7त्या आताच घडविण्यात आल्या आहेत, फार पूर्वी नव्हे;
आजच्या आधी त्या तुम्ही ऐकलेल्या नाहीत.
तुम्ही असे म्हणू शकणार नाही,
‘होय, त्या आम्हाला माहीत होत्या.’
8तुम्ही त्या ऐकलेल्या नाहीत किंवा तुम्हाला उमगल्या नाहीत;
पूर्वीपासूनच तुमचे कान उघडलेले नाहीत.
कारण मला चांगले माहीत आहे कि तुम्ही किती विश्वासघातकी आहात;
जन्मापासूनच तुम्ही बंडखोर म्हटले गेले.
9तरी माझ्या नावाकरिता मी माझ्या प्रकोपास विलंब करेन,
आणि माझ्या प्रशंसेकरिता तुमच्यावरून आवरून धरेन
आणि तुमचा सर्वस्वी नाश करणार नाही.
10पाहा, मी तुम्हाला शुद्ध केले आहे, पण चांदीइतके नव्हे;
पीडेच्या भट्टीत मी तुमची परीक्षा घेतली.
11तरीही माझ्या प्रीत्यर्थ, होय, माझ्याच प्रीत्यर्थ मी हे करेन.
मी स्वतःची अपकीर्ती कशी होऊ देईन?
माझे गौरव मी इतरांना घेऊ देणार नाही.
इस्राएलची मुक्तता
12“याकोबा, मी ज्यांना बोलाविले,
त्या इस्राएला, माझे ऐक,
मीच परमेश्वर आहे;
मीच आदि आणि मीच अंत आहे.
13मी माझ्या स्वतःच्या हाताने पृथ्वीचा पाया घातला,
आणि माझ्या उजव्या हाताने आकाश आच्छादले;
मी जेव्हा त्यांना हजर होण्याची आज्ञा देतो,
ते सर्व एकत्र उभे राहतात.
14“एकत्र या, तुम्ही सर्वजण आणि ऐका:
तुमच्या कोणत्या मूर्तीने तुम्हाला हे भविष्य सांगितले होते?
याहवेहचा निवडलेला मित्र
बाबेलच्या विरुद्ध त्यांचे हेतू साध्य करेल;
बाबेलवर ते त्यांचा हात उगारतील.
15मी, जरी मी हे बोललो;
होय, मीच त्याला बोलाविले आहे.
मी त्याला आणेन.
आणि या कामगिरीत तो यशस्वी होईल.
16“माझ्याजवळ या व हे लक्षपूर्वक ऐका:
“माझ्या पहिल्या घोषणेपासूनच मी गुप्तपणे बोललो नाही;
ज्यावेळी ते घडेल, मी तिथे हजर आहे.”
आणि आता सार्वभौम याहवेहने,
त्यांच्या पवित्र आत्म्याची देणगी देऊन मला पाठविले आहे.
17याहवेह हे असे म्हणतात—
जे तुमचे उद्धारकर्ता, इस्राएलचे पवित्र परमेश्वर आहेत:
“मी याहवेह, तुमचा परमेश्वर आहे,
जो तुमच्या हितासाठीच तुम्हाला शिक्षण देतो,
जे मार्ग तुम्ही अनुसरावे, त्यांनीच तुम्हाला मार्गस्थ करतो.
18केवळ तुम्ही माझ्या आज्ञांकडे लक्ष दिले असते,
तर शांती एखाद्या नदीप्रमाणे,
तुमचे सुयश समुद्रातील लाटांप्रमाणे वाहिले असते,
19तुमचे वंशज वाळूसारखे झाले असते.
तुमची संतती धान्यकणासारखी अगणित असती;
त्यांचे नाव कधीही मिटले नसते
ना ते माझ्यासमोर कधी नष्ट झाले असते.”
20बाबेलमधून निघा,
खास्द्यांपासून पलायन करा!
हे हर्षगर्जना करून जाहीर करा
व घोषित करा,
“याहवेहने आपला सेवक याकोबाचा उद्धार केला आहे.”
अशी घोषणा पृथ्वीच्या दिगंतापर्यंत पोहचू द्या.
21त्यांनी त्यांना वाळवंटातून नेले, तेव्हा ते तहानले नाहीत;
त्यांनी त्यांच्याकरिता खडकातून पाणी वाहत बाहेर आणले.
त्यांनी खडक दुभांगला
आणि पाणी उफाळून बाहेर आले.
22“दुष्टांना शांती नसते,” असे याहवेह म्हणतात.

Currently Selected:

यशायाह 48: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for यशायाह 48