YouVersion Logo
Search Icon

यशायाह 53

53
1आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला
आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे?
2त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला,
शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता.
आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते,
तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते.
3मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले,
कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता.
जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी
तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता.
4तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले,
आणि आमचे क्लेश वाहिले,
आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली,
त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली.
5परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला,
तो आमच्या पापामुळे चिरडला गेला;
आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली,
आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले.
6आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो,
आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते;
आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष
त्याच्यावर लादला.
7त्याला छळले व जाचले,
तरीही त्याने आपले मुख उघडले नाही;
वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले,
आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते,
तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.
8अत्याचार#53:8 किंवा कैद करून करून, दोषी ठरविल्यावर ते त्याला जिवे मारण्यासाठी घेऊन गेले.
तरी त्याच्या पिढीतून कोणी विरोध केला?
कारण तो जिवंताच्या भूमीवरून काढून टाकण्यात आला;
माझ्या लोकांच्या अपराधांसाठी त्याला शिक्षा देण्यात आली.
9दुष्ट माणसांच्या सोबत त्याला कबर नेमून देण्यात आली,
आणि श्रीमंताच्या कबरेमध्ये पुरण्यात आले,
परंतु त्याने काहीही हिंसा केली नव्हती,
आणि त्याच्या मुखात कोणतेही कपट नव्हते.
10परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती,
आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले,
तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल,
आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल.
11वेदना सहन केल्यानंतर,
तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल;
माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल,
आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.
12म्हणूनच महान लोकांसह मी त्याला वतन देईन,
आणि अनेक सामर्थ्यशाली लोकांसह लूट वाटून घेईल.
कारण त्याने आपले जीवन मरेपर्यंत ओतले,
आणि अपराधी लोकांत त्याची गणना झाली.
त्याने अनेकांचा पापाचा भार वाहिला,
आणि पाप्यांसाठी मध्यस्थी केली.

Currently Selected:

यशायाह 53: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in