YouVersion Logo
Search Icon

यहोशुआ 10

10
सूर्य स्थिर राहतो
1यरीहो येथे यहोशुआने जे केले, तसेच आय शहरात करून त्याने ते कसे हस्तगत केले, त्याचा कसा नाश केला, त्याच्या राजांचा कसा वध केला, गिबोनाच्या लोकांनी इस्राएली लोकांशी शांतीचा करार कसा केला आणि आता ते इस्राएलचे मित्र राष्ट्र म्हणून कसे बनून राहिले, या सर्व गोष्टी यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेक याने ऐकल्या, 2तेव्हा तो व त्याचे लोक अतिशय घाबरून गेले. कारण गिबोन हे एका राजेशाही शहराप्रमाणे प्रतिष्ठित शहर होते; ते आय नगरापेक्षा मोठे होते व त्यातील पुरुष उत्तम योद्धे होते. 3म्हणून यरुशलेमचा राजा अदोनी-सेदेकाने हेब्रोनाचा राजा होहाम, यर्मूथचा राजा पिराम, लाखीशचा राजा याफीय आणि एग्लोनाचा राजा दबीरकडे आपले निवेदन पाठवले. 4तो म्हणाला, “या आणि गिबोनावर हल्ला करण्यास मला मदत करा, कारण त्यांनी यहोशुआशी व इस्राएल लोकांशी शांतीचा करार केला आहे.”
5तेव्हा अमोर्‍यांचे पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश व एग्लोन या नगरांचे राजे एकत्र आले व आपले सैन्य एकजूट करून गिबोन विरुद्ध त्यांनी आपले स्थान घेतले व त्यांच्यावर हल्ला केला.
6तेव्हा यहोशुआ जो गिलगालच्या छावणीत होता, त्याच्याकडे गिबोनाच्या लोकांनी निरोप पाठवून म्हटले: “आमचा त्याग करू नका. आमच्याकडे लवकर येऊन आम्हाला वाचवा! आमची मदत करा, कारण डोंगरवटीच्या सर्व अमोरी राजांनी आमच्याविरुद्ध आपले सैन्य उभारले आहे.”
7लगेच यहोशुआ आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांसह सर्व सैन्य घेऊन गिलगालहून निघाला. 8तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “त्यांना भिऊ नकोस; मी त्यांना तुझ्या हाती दिलेले आहे. त्यांच्यातील कोणीही तुझ्यापुढे टिकाव धरू शकणार नाही.”
9गिलगालहून रात्रभर प्रवास केल्यानंतर, यहोशुआने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. 10मग याहवेहने इस्राएली समोर शत्रू सैन्यांमध्ये गोंधळ निर्माण केला आणि यहोशुआ व इस्राएलांच्या सैन्याने गिबोनाजवळ पूर्णपणे त्यांचा पराभव केला. इस्राएली लोकांनी वर बेथ-होरोनकडे जाणार्‍या वाटेपर्यंत त्यांचा पाठलाग केला व अजेकाह व मक्केदापर्यंत त्यांना मारत आले. 11ते इस्राएल पुढून बेथ-होरोन पासून अजेकाहच्या वाटेवरून पळून जात असताना, याहवेहने त्यांच्यावर गारांच्या प्रचंड वर्षाव केला आणि इस्राएली लोकांच्या तलवारीपेक्षा गारांनीच अधिक लोक मारले गेले.
12ज्या दिवशी याहवेहने अमोरी लोकांना इस्राएली लोकांच्या हाती दिले, तेव्हा इस्राएली लोकांच्या उपस्थितीत यहोशुआ याहवेहना म्हणाला:
“सूर्या, गिबोनावर स्थिर उभा हो,
आणि हे चंद्रा, तू अय्यालोनच्या खोर्‍यावर स्तब्ध राहा”
13तेव्हा इस्राएली राष्ट्राने आपल्या शत्रूंचा सूड#10:13 किंवा विजय मिळवेपर्यंत घेईपर्यंत
सूर्य स्थिर उभा राहिला,
आणि चंद्र स्तब्ध झाला.
जसे याशारच्या ग्रंथात लिहिलेले आहे.
सूर्य संपूर्ण दिवसभर आकाशात मध्यभागी स्थिर राहिला आणि त्याने अस्त होण्यास विलंब केला. 14असा दिवस यापूर्वी कधीही आला नव्हता आणि त्यानंतरही कधी आला नाही. त्या दिवशी, याहवेहने एका मनुष्याचा शब्द ऐकला. कारण याहवेह निश्चितच इस्राएलसाठी लढत होते!
15त्यानंतर यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसोबत गिलगाल येथील छावणीकडे परतला.
पाच अमोरी राजांचा वध
16तेव्हा ते पाच राजे पळून गेले व मक्केदा येथे गुहेत लपून बसले. 17ते पाच राजे मक्केदा येथील एका गुहेत लपलेले आहेत हे जेव्हा यहोशुआला कळविण्यात आले, 18तेव्हा यहोशुआ म्हणाला, “मोठे धोंडे गुहेच्या तोंडावर लोटा आणि त्याचे राखण करावयाला काही माणसांना तिथे बसवा. 19पण थांबू नका; शत्रूचा पाठलाग चालू ठेवा! त्यांच्यावर मागून हल्ला करा आणि त्यांना त्यांच्या शहरांकडे जाऊ देऊ नका, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी त्यांना तुमच्या हातात दिले आहे.”
20तेव्हा यहोशुआ आणि इस्राएली सैन्याने त्यांचा पूर्ण पराभव केला, परंतु त्यातून काही लोक वाचले व त्यांच्या तटबंदीच्या शहरात गेले. 21मग संपूर्ण इस्राएली सैन्य मक्केदाच्या छावणीत यहोशुआकडे सुरक्षित परतले. त्यानंतर इस्राएलविरुद्ध कोणीही एकही शब्द उच्चारला नाही.
22यहोशुआने म्हटले, “गुहेचे तोंड उघडून त्या पाच राजांना माझ्याकडे बाहेर आणा.” 23मग त्या गुहेतून पाच राजे—यरुशलेम, हेब्रोन, यर्मूथ, लाखीश आणि एग्लोन या नगरांच्या राजांना बाहेर काढण्यात आले. 24जेव्हा त्या पाच राजांना बाहेर काढून यहोशुआ पुढे हजर करण्यात आले, तेव्हा त्याने सर्व इस्राएली पुरुषांना बोलाविले. मग त्याच्यासोबत आलेल्या सेनेच्या अधिकार्‍यांना तो म्हणाला, “इकडे या व आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवा.” तेव्हा ते पुढे आले आणि त्यांनी आपले पाय या राजांच्या मानेवर ठेवले.
25तेव्हा यहोशुआ त्यांना म्हणाला, “भिऊ नका; निराश होऊ नका. खंबीर आणि धैर्यवान व्हा, कारण याहवेह तुमच्या सर्व शत्रूंच्या बाबतीत हेच करणार आहेत.” 26नंतर यहोशुआने त्या राजांचा वध केला आणि त्यांची मृत शरीरे पाच झाडांवर संध्याकाळपर्यंत तशीच टांगून ठेवली.
27सूर्य मावळू लागला, तेव्हा यहोशुआने आज्ञा दिली की त्या राजांचे मृतदेह झाडांवरून खाली काढा आणि ते ज्या गुहेमध्ये लपून राहिले होते त्या गुहेत ती फेकून द्या. हे केल्यावर गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठ्या खडकांची रास रचून ठेवली. आजपर्यंत ती रास तिथेच आहे.
दक्षिणेकडील शहरांवर ताबा
28त्याच दिवशी यहोशुआने मक्केदा या शहराचा नाश केला आणि त्या शहराचा राजा व त्यातील प्रत्येकाचा तलवारीने संहार केला. एकही व्यक्ती जिवंत ठेवण्यात आली नाही. त्याने यरीहोच्या राजाचे केले तसेच मक्केदाच्या राजाचेही केले.
29नंतर यहोशुआ व त्याच्याबरोबर सर्व इस्राएली लोक मक्केदाहून लिब्नाह शहरावर चालून गेले आणि त्याच्यावर हल्ला केला. 30याहवेहने ते शहर आणि त्याच्या राजालाही इस्राएलच्या हाती दिले. ते शहर आणि त्यातील प्रत्येकाचा यहोशुआने तलवारीने नाश केला. त्याने कोणालाही जिवंत सोडले नाही आणि यरीहोच्या राजाचे जसे केले तसे त्याने तेथील राजांचे केले.
31मग यहोशुआसह संपूर्ण इस्राएल लिब्नाहहून लाखीशला गेले; ते त्या शहराशी युद्ध करण्यासाठी सज्ज झाले व त्यांच्यावर हल्ला केला. 32याहवेहने लाखीश शहर इस्राएलच्या हाती दिले आणि यहोशुआने दुसर्‍या दिवशी त्यांच्यावर ताबा मिळविला. लिब्नाहचा केला तसाच लाखीश शहर व त्यात असलेल्या सर्वांचा त्यांनी तलवारीने नाश केला. 33लाखीशवर हल्ला होत असताना, गेजेरचा राजा होराम लाखीश शहरास मदत करण्यास आला. परंतु यहोशुआने त्याचा व त्याच्या सैनिकांचा पराजय केला; त्यांच्यातील एकही जण वाचला नाही.
34मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने लाखीश सोडल्यावर ते एग्लोनला आले; त्यांनी त्यांच्यावर हल्ल्याची तयारी केली व त्यांच्याशी लढले. 35त्यांनी ते शहर त्याच दिवशी हस्तगत केले आणि तेथील प्रत्येकाचा लाखीश येथे केल्याप्रमाणे तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहिली नाही.
36मग यहोशुआ आणि त्याच्यासह संपूर्ण इस्राएलने एग्लोन सोडल्यावर ते हेब्रोनला आले आणि त्यावर हल्ला केला. 37त्यांनी ते शहर हस्तगत केले आणि एग्लोन येथे केल्याप्रमाणे हेब्रोनच्या राजासह प्रत्येकाचा तलवारीने नाश केला. एकही व्यक्ती जिवंत राहू दिली नाही.
38मग यहोशुआ व त्याच्यासह संपूर्ण इस्राएली मागे वळून दबीरवर चालून गेले व त्यांच्याशी लढले. 39त्यांनी ते शहर, त्याचा राजा व त्यातील गावे हस्तगत केली व त्यांना तलवारीने मारून टाकले. त्यातील प्रत्येकाचा समूळ नाश केला. त्यांनी एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. आणि लिब्नाह व त्याच्या राजाला व हेब्रोनला केले तसे त्यांनी दबीर व त्याच्या राजालाही केले.
40अशा रीतीने यहोशुआने सर्व देश, म्हणजे डोंगराळ प्रदेश, नेगेव प्रांत, पश्चिमी तळवट, डोंगराची उतरण, तेथील राजांसह हस्तगत केला. एकही व्यक्ती जिवंत सोडली नाही. याहवेह इस्राएलच्या परमेश्वरांनी आज्ञापिल्याप्रमाणे प्रत्येक जीवधारी प्राण्यांचा नाश केला. 41कादेश-बरनेआपासून गाझापर्यंत आणि गोशेनपासून गिबोनापर्यंतचे प्रदेश यहोशुआने हस्तगत केले. 42यहोशुआने हे सर्व राजे व त्यांची भूमी एकाच मोहिमेत जिंकले, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर इस्राएलसाठी लढले.
43मग यहोशुआ सर्व इस्राएली लोकांसह गिलगालच्या छावणीकडे परतला.

Currently Selected:

यहोशुआ 10: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in