YouVersion Logo
Search Icon

मत्तय 20

20
द्राक्षमळ्यातील मजुरांचा दाखला
1“स्वर्गाचे राज्य एका जमीनदारासारखे आहे. तो आपल्या द्राक्षमळ्यातील हंगामाचे पीक कापण्याकरिता मजूर शोधण्यासाठी अगदी सकाळीच बाहेर पडला. 2एक दिवसासाठी एक दिनार#20:2 एक दिनार एका दिवसाची साधारण मजुरी होती देण्याचे कबूल करून, त्याने मजुरांना आपल्या द्राक्षमळ्यात पाठविले.
3“सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तो बाहेर गेला, तेव्हा बाजारपेठेत दुसरे काही मजूर रिकामे उभे असल्याचे त्याने पाहिले. 4त्याने त्यांना म्हटले, ‘तुम्ही जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा आणि योग्य ती मजुरी मी तुम्हाला देईन.’ 5म्हणून ते गेले.
“तो पुन्हा दुपारच्या सुमारास बाहेर गेला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारासही त्याने असेच केले. 6पाच वाजता तो बाहेर गेला असताना, काही लोक रिकामे उभे असलेले त्याने पाहिले. त्याने त्यांना विचारले, ‘तुम्ही येथे दिवसभर काही काम न करता का थांबला आहात?’
7“ ‘आम्हाला कोणी मजुरीवर लावले नाही,’ त्यांनी उत्तर दिले.
“तो त्यांना म्हणाला, ‘मग तुम्ही सुद्धा जाऊन माझ्या द्राक्षमळ्यात काम करा.’
8“संध्याकाळी धन्याने आपल्या मुकादमाला सांगितले, ‘द्राक्षमळ्यामध्ये आलेल्या मजुरांना बोलवा आणि जे शेवटी आले होते त्यांच्यापासून आरंभ करून जे प्रथम आले होते त्या सर्वांना मजुरी द्या.’
9“तेव्हा संध्याकाळी पाच वाजता आलेल्या मजुरांना एक दिनार मजुरी मिळाली. 10त्यावरून आधी आलेल्या मजुरांना, आपल्याला अधिक मजुरी मिळेल, असे वाटले; परंतु त्यांनाही एका दिवसाचीच मजुरी मिळाली. 11जेव्हा त्यांना ती मिळाली, तेव्हा त्यांनी धन्याविरुद्ध कुरकुर करण्यास सुरुवात केली. 12‘त्या माणसांनी फक्त एकच तास काम केले, तरी त्यांना तुम्ही दिवसभराची मजुरी दिली आणि आम्ही येथे सकाळपासून उन्हात दिवसभर राबलो, तरी आम्हाला तुम्ही त्यांच्यासारखेच केले.’
13“त्याने त्यांच्यापैकी एकाला म्हटले, ‘मित्रा, तुझ्यावर मी कोणताही अन्याय केलेला नाही; याच मजुरीत दिवसभर काम करण्याचे तू कबूल केले होतेस की नाही? 14मग तुझी मजुरी घे आणि जा; जेवढी मी तुला दिली तेवढीच मजुरी जो शेवटी आला त्यालाही द्यावी असे मला वाटते. 15माझा पैसा मी माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करण्याचा अधिकार मला नाही काय? किंवा मी उदार आहे म्हणून तुला का राग यावा?’
16“याप्रमाणे जे शेवटचे ते पहिले, आणि जे पहिले ते शेवटचे होतील.”
येशू आपल्या मृत्यूचे तिसर्‍या वेळेस भविष्य करतात
17येशू यरुशलेमला जात होते. वाटेत त्यांनी आपल्या बारा शिष्यांना एका बाजूला घेतले आणि त्यांना म्हटले, 18“आपण यरुशलेमात जात आहोत आणि तिथे मानवपुत्राला महायाजक व नियमशास्त्र शिक्षक यांच्या हवाली करण्यात येईल. ते त्याच्यावर आरोप करून त्याला मृत्युदंड देतील आणि नंतर त्याला गैरयहूदीयांच्या हाती सोपवून देण्यात येईल. 19ते लोक त्याची थट्टा करतील, त्याला फटके मारतील व क्रूसावर खिळतील; परंतु तीन दिवसानंतर तो मरणातून पुन्हा उठेल.”
एका मातेची विनंती
20मग जब्दीच्या पुत्रांची आई तिच्या मुलांना घेऊन येशूंकडे आली. तिने त्यांच्यासमोर गुडघे टेकले आणि त्यांच्याजवळ एक कृपादान मागितले.
21येशूंनी तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”
ती म्हणाली, “तुमच्या राज्यामध्ये माझा या दोन पुत्रातील एकाला आपल्या उजवीकडे व दुसर्‍याला डावीकडे बसू द्यावे.”
22यावर येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही काय मागता हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे, तो तुम्ही पिऊ शकाल काय?”
त्यांनी उत्तर दिले, “आम्ही तो पिऊ शकू!”
23“त्या प्याल्यातून तुम्ही प्याल यात शंका नाही,” येशूंनी त्यांना म्हटले, “परंतु माझ्या उजवीकडे किंवा डावीकडे कोणी बसावे, हे ठरविण्याचा अधिकार मला नाही. या जागा माझ्या पित्याने ज्यांच्यासाठी तयार केल्या आहेत, त्यांनाच मिळतील.”
24हे बाकीच्या दहा शिष्यांनी ऐकले, तेव्हा त्यांना त्या दोन्ही भावांचा खूप राग आला. 25हे पाहून येशूंनी त्यांना एकत्र बोलावून म्हटले, “गैरयहूदी लोकांचे शासक त्यांच्यावर हुकमत चालवितात आणि त्यांचे उच्चाधिकारी त्यांच्यावर अधिकार गाजविणारे हे तुम्हाला माहीत आहे. 26पण तुम्हामध्ये तसे नसावे. तुमच्यामध्ये जो कोणी श्रेष्ठ होऊ पाहतो, त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. 27आणि जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने तुमचा गुलाम व्हावे. 28मी मानवपुत्र, सेवा करवून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आणि पुष्कळांच्या उद्धारासाठी आपला जीव खंडणी म्हणून द्यावयास आलो आहे.”
दोन आंधळ्यांना दृष्टी मिळते
29येशू व त्यांचे शिष्य हे यरीहो शहर सोडून जात असताना, त्यांच्यामागे खूप मोठी गर्दी चालली होती. 30दोन आंधळी माणसे रस्त्याच्या कडेला बसली होती. येशू आपल्या बाजूने येत आहेत, हे त्यांनी ऐकले, तेव्हा ते मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दावीदाचे पुत्र! आम्हावर दया करा!”
31गर्दीतील लोकांनी त्यांना धमकाविले आणि गप्प बसण्यास सांगितले, तर ते अधिक मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अहो प्रभू, दावीदाचे, पुत्र, आम्हावर दया करा!”
32येशू थांबले आणि त्यांनी आंधळ्यांना बोलाविले व ते म्हणाले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
33“प्रभूजी,” त्यांनी उत्तर दिले, “आम्हाला आमची दृष्टी यावी.”
34येशूंना त्यांचा कळवळा आला; त्यांनी त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला; ताबडतोब त्यांना दिसू लागले आणि ते त्यांच्यामागे चालू लागले.

Currently Selected:

मत्तय 20: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in