YouVersion Logo
Search Icon

मार्क 13

13
मंदिराचा नाश व अखेरच्या काळाची चिन्हे
1येशू मंदिरातून बाहेर निघत असताना, त्यांच्या शिष्यांपैकी एकजण त्यांना म्हणाले, “पाहा ना, गुरुजी! किती भव्य हे दगड आणि सुंदर इमारती!”
2येशू उत्तरले, “तुम्ही आता या भव्य इमारती पाहता ना? याच्या एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड पाडला जाईल.”
3येशू मंदिरासमोर असलेल्या जैतुनाच्या डोंगरावर बसले असताना, पेत्र, याकोब, योहान आणि आंद्रिया यांनी त्यांना खाजगी रीतीने विचारले, 4“या घटना केव्हा घडतील या गोष्टी पूर्ण होण्याच्या सुमारास काय चिन्ह असतील हे आम्हाला सांगा.”
5येशू त्यांना म्हणाले, “कोणीही तुम्हाला फसवू नये म्हणून सावध राहा. 6कारण अनेकजण माझ्या नावाने येतील आणि, ‘तो मीच आहे,’ असा दावा करतील आणि पुष्कळांना फसवतील. 7जेव्हा तुम्ही लढायांसंबंधी ऐकाल आणि लढायांच्या अफवा ऐकाल, तेव्हा तुम्ही घाबरू नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण शेवट अजूनही यावयाचा आहे. 8कारण राष्ट्रांविरुद्ध राष्ट्र व राज्याविरुद्ध राज्य उठतील. निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील, दुष्काळ पडतील. या गोष्टी तर प्रसूती वेदनांची सुरुवात आहेत.
9“तुम्ही सावध असले पाहिजे. तुम्हाला न्यायालयाकडे सोपविले जाईल आणि सभागृहामध्ये तुम्हाला फटके मारण्यात येईल आणि माझ्यामुळे तुम्हाला राज्यपाल आणि राजे त्यांच्यापुढे माझे साक्षी व्हावे लागेल. 10प्रथम शुभवार्तेचा प्रचार सर्व राष्ट्रांमध्ये झालाच पाहिजे. 11परंतु जेव्हा ते तुम्हाला धरून नेतील व तुमच्याविरुद्ध खटला सुरू होईल, तेव्हा तुम्ही काय बोलावे याविषयी आधी चिंता करू नका. त्यावेळी तुम्हाला जे सुचविले जाईल ते बोला. कारण तुम्ही ते बोलणार नाही, तर पवित्र आत्मा बोलेल.
12“भाऊ भावाला, पिता आपल्या पोटच्या लेकरांना जिवे मारण्याकरिता विश्वासघाताने धरून देतील. लेकरेही आपल्या आईवडिलांविरुद्ध बंड करतील आणि त्यांचा वध घडवून आणतील. 13माझ्यामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, परंतु जो शेवटपर्यंत स्थिर राहील, त्याचे मात्र तारण होईल.
14“जेव्हा तुम्ही ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’#13:14 दानी 9:27; 11:31; 12:11 ज्या ठिकाणी त्याचा संबंध नाही, त्या ठिकाणी उभा असलेला पाहाल—वाचकाने हे समजून घ्यावे—त्यावेळी जे यहूदीयात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. 15जो कोणी घराच्या छपरांवर असेल, त्याने घरातून काही आणण्याकरिता प्रवेश करू नये; 16जो शेतात असेल, त्याने आपला अंगरखा नेण्यासाठी परत जाऊ नये. 17गर्भवती आणि दूध पाजणार्‍या स्त्रियांसाठी तर तो काळ किती क्लेशाचा असेल! 18तरी हे हिवाळ्यामध्ये होऊ नये, म्हणून प्रार्थना करा, 19कारण ते दिवस इतके कष्टाचे असतील की, परमेश्वराने पृथ्वी निर्माण केल्यापासून आजपर्यंत असे दिवस आले नाहीत किंवा पुढेही येणार नाहीत.
20“जर प्रभूने ते दिवस कमी केले नसते, तर कोणी वाचला नसता. तरी केवळ निवडलेल्या लोकांसाठी, ज्यांना त्यांनी निवडले आहे, त्यांच्यासाठी ते कमी केले जातील. 21त्या काळात, ‘येथे ख्रिस्त आहे!’ किंवा ‘पाहा, तो तिथे आहे,’ असे जर कोणी तुम्हाला सांगितले, तर अजिबात विश्वास ठेवू नका. 22कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदय पावतील आणि मोठी चिन्हे व अद्भुते करून, साधेल तर, निवडलेल्या लोकांनाही फसवतील. 23म्हणून तुम्ही सावध राहा. मी तुम्हाला आधी सर्वकाही सांगून ठेवलेले आहे.
24“हा भयानक क्लेशांचा काळ संपल्याबरोबर त्या दिवसात,
“ ‘सूर्य अंधकारमय होईल,
आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही;
25आकाशातून तारे गळून पडतील,
आणि आकाशमंडळ डळमळेल.’#13:25 यश 13:10; 34:4
26“त्यावेळी लोक मानवपुत्राला परमेश्वराच्या उजवीकडे बसलेले आणि सामर्थ्याने व पराक्रमाने आकाशात मेघारूढ होऊन परत येत असलेले पाहतील. 27आणि चारही दिशांकडून, पृथ्वीच्या व आकाशांच्या या टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत त्यांच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करण्यासाठी ते आपल्या दूतांस पाठवतील.
28“आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका: त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता. 29या घटना घडत असताना तुम्ही पाहाल, तेव्हा ते जवळ अगदी दारातच आहे, हे समजून घ्या. 30मी तुम्हाला निश्चित सांगतो की या सर्वगोष्टी घडून आल्याशिवाय ही पिढी नाहीशी होणार नाही. 31आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.
दिवस व घटका अज्ञात
32“तरीपण त्या दिवसाबद्दल किंवा वेळेबद्दल कोणालाच माहीत नाही, म्हणजे स्वर्गातील दूतांना नाही, पुत्रालाही नाही, ते फक्त पित्यालाच ठाऊक आहे. 33सावध असा! जागृत राहा!#13:33 काही मूळ प्रतींमध्ये सावध राहा आणि प्रार्थना करा ती वेळ केव्हा येईल, हे तुम्हाला माहीत नाही! 34हे एका दूरच्या प्रवासावर निघालेल्या मनुष्यासारखे आहे: तो आपले घर सोडतो, त्याच्या दासांना अधिकार देतो, प्रत्येकाला ज्याचे त्याचे काम वाटून देतो आणि तो परत येईपर्यंत बारकाईने लक्ष ठेवावे, असे द्वारपालाला सांगतो.
35“यास्तव तुम्ही जागृत राहा, कारण घराचा मालक कोणत्या दिवशी परत येईल; संध्याकाळी, मध्यरात्री, कोंबडा आरवेल त्यावेळी किंवा पहाटे येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. 36तो जर एकाएकी आला तर तुम्ही त्याला झोपेत असलेले सापडू नये. 37मी जे तुम्हाला सांगतो ते प्रत्येकाला सांगत आहेः ‘सावध राहा!’ ”

Currently Selected:

मार्क 13: MRCV

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for मार्क 13