मार्क 7
7
जे विटाळविते
1परूशी आणि यरुशलेम नगरातून आलेले नियमशास्त्राचे काही शिक्षक येशूंच्या भोवती गोळा झाले. 2येशूंचे काही शिष्य अशुद्ध हाताने, म्हणजे हात न धुताच जेवतात, असे त्यांनी पाहिले होते. 3परूशी आणि सर्व यहूदी लोक, वाडवडिलांच्या परंपरेस अनुसरून आपले हात विधिपूर्वक धुतल्याशिवाय कधीही जेवत नसत. 4ज्यावेळी ते बाजारातून घरी येत, त्या त्यावेळेस हात धुतल्याशिवाय ते जेवत नसत. भांडी, पातेली, ताटे#7:4 काही मूळप्रतींमध्ये धुण्याचे कप व भांडी, पातेले, ताटे वगैरे धुण्यासंबंधीच्या अनेक रूढी ते पाळीत असत.
5या कारणामुळे परूशी आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनी येशूंना विचारले, “तुमचे शिष्य आपल्या वाडवडिलांच्या परंपरा प्रमाणे का वागत नाहीत व ते आपले हात अशुद्ध असताना का जेवतात?”
6यावर येशूंनी उत्तर दिले, “यशया संदेष्ट्याने तुमच्या ढोंगीपणाचे अचूक वर्णन केले आहे; तो म्हणतो:
“ ‘हे लोक त्यांच्या ओठांनी माझा सन्मान करतात,
पण त्यांची हृदये माझ्यापासून फार दूर आहेत.
7माझी उपासना ते व्यर्थपणे करतात;
त्यांची शिकवण हे केवळ मनुष्यांनी केलेले नियमच#7:7 यश 29:13 असतात.’
8तुम्ही परमेश्वराने दिलेल्या आज्ञा टाळता आणि मनुष्याच्या परंपरेला चिटकून बसता.”
9आणि पुढे ते म्हणाले, “तुमच्या रीती पाळण्यासाठी, परमेश्वराच्या आज्ञा टाळण्याचा सुलभ मार्ग तुम्हाला माहीत आहे! 10मोशे म्हणाला, ‘तुझ्या आईवडिलांचा मान राख,’#7:10 निर्ग 20:12; अनु 5:16 आणि ‘जो कोणी त्यांच्या आई किंवा वडिलांना शाप देतो तो मरणदंडास पात्र व्हावा.’#7:10 निर्ग 21:17; लेवी 20:9 11परंतु तुम्ही म्हणता, जर कोणी असे घोषित करतो की, आईवडिलांना करत असलेली मदत, ही ‘परमेश्वराला समर्पित’ आहे ते अर्पण आहे— 12त्यामुळे तुम्ही त्यांना आई वडिलांसाठी काहीही करण्यास मनाई करता. 13या ज्या तुमच्या परंपरा पूर्वजांपासून चालत आलेल्या आहेत, त्यासाठी तुम्ही परमेश्वराचे वचन रद्द करता आणि अशा प्रकारच्या पुष्कळच गोष्टी तुम्ही करता.”
14मग येशूंनी समुदायाला आपल्याकडे बोलावले व त्यांना म्हणाले, “तुम्ही सर्वजण ऐका आणि हे समजून घ्या. 15अशी कोणतीच गोष्ट नाही की जी बाहेरून मनुष्यामध्ये प्रवेश करून त्याला अशुद्ध करू शकेल. वास्तविक मनुष्यामधून जे बाहेर पडते, तेच त्याला अशुद्ध करते. 16ज्याला ऐकावयास कान आहेत, तो ऐको.”#7:16 काही मूळप्रतींमध्ये हे वचन समाविष्ट करून घेतात 4:23.
17गर्दीतून निघून घरी गेल्यावर, शिष्यांनी त्यांना दाखल्याचा अर्थ विचारला. 18“तुम्ही इतके मतिमंद आहात काय?” त्यांनी विचारले, “जे काही मनुष्यामध्ये बाहेरून शिरते ते त्याला अशुद्ध करू शकत नाही, हे तुम्ही पाहू शकत नाही काय? 19ते त्यांच्या हृदयात जात नाही पण पोटात उतरते आणि नंतर शरीरातून बाहेर पडते.” या म्हणण्यावरून सर्व अन्न शुद्ध आहे, असे येशूंनी जाहीर केले.
20ते पुढे म्हणाले, “मनुष्यामधून जे बाहेर पडते तेच मनुष्याला अशुद्ध करते. 21कारण आतून, मनुष्याच्या हृदयातून, दुष्ट विचार, खून, जारकर्म, व्यभिचार, चोरी, लैंगिक पापे, 22बदफैलीपणा, दुष्कृत्ये, फसवेगिरी, कामातुरपणा, मत्सर, निंदा, गर्विष्ठपणा आणि मूर्खपणा 23या सर्व अमंगळ गोष्टी आतून निघतात आणि मनुष्याला अशुद्ध करतात.”
येशू एका सुरफुनीकी स्त्रीच्या विश्वासाचा मान करतात
24नंतर येशूंनी ते स्थान सोडले आणि ते सोर आणि सीदोन#7:24 पुष्कळ जुन्या प्रतींमध्ये सोर आणि सीदोन या प्रांतात गेले. ते एका घरात गेले आणि हे कोणाला कळू नये अशी त्यांची इच्छा होती; परंतु त्यांची उपस्थिती लपून राहू शकली नाही. 25त्यांच्याविषयी ऐकताच, एक स्त्री जिच्या लहान मुलीला दुरात्म्याने पछाडले होते, त्यांच्याकडे आली आणि त्यांच्या पाया पडली. 26आपल्या कन्येला दुरात्म्याच्या तावडीतून सोडवावे, अशी तिने त्यांच्याजवळ विनंती केली. ती स्त्री ग्रीक असून सुरफुनीकी प्रांतात जन्मली होती.
27“प्रथम लेकरांना जेवढे पाहिजे तेवढे खाऊ द्या,” ते म्हणाले, “मुलांची भाकर काढून कुत्र्यांना घालणे बरोबर नाही.”
28“प्रभू” तिने प्रत्युत्तर दिले, “मुलांच्या मेजाखाली जे तुकडे पडतात ते देखील कुत्रे खातात!”
29येशूंनी उद्गार काढले, “या उत्तरामुळे तू जाऊ शकतेस; दुरात्म्याने तुझ्या मुलीला सोडले आहे.”
30ती घरी आली त्यावेळी तिला तिची मुलगी बाजेवर झोपलेली आढळली आणि दुरात्मा तिच्यामधून निघून गेला होता.
येशू एका बहिर्या व मुक्या मनुष्याला बरे करतात
31सोर सोडून येशू सीदोन प्रांतामधून गेले आणि तेथून दकापलीस#7:31 दहा गावे रस्त्याने ते पुन्हा गालील समुद्राकडे आले. 32तेथे काही लोकांनी एका बहिर्या आणि बोबड्या अशा मनुष्याला त्यांच्याकडे आणले. येशूंनी त्याच्यावर हात ठेवून त्याला बरे करावे अशी लोकांनी येशूंना विनंती केली.
33येशूंनी त्याला गर्दीतून बाजूला नेले. त्याच्या कानात त्यांनी बोटे घातली. नंतर ते थुंकले आणि त्या मनुष्याच्या जिभेला केला. 34मग स्वर्गाकडे दृष्टी लावून व एक निःश्वास सोडून ते म्हणाले, “इप्फाता” म्हणजे, “मोकळा हो” 35ताबडतोब त्या मनुष्याचे कान उघडले व त्याच्या जिभेचे बंधन मोकळे झाले आणि त्याला स्पष्ट बोलता येऊ लागले.
36याविषयी कोणाला सांगू नका, असे येशूंनी निक्षून सांगितले. परंतु ते जसे सांगत गेले तशी ही बातमी अधिकच प्रसिद्ध होत गेली. 37यावरून लोक कमालीचे आश्चर्यचकित झाले होते. ते म्हणाले, “त्यांनी सर्वकाही उत्कृष्ट केले आहे. ते बहिर्यांना ऐकण्यास व मुक्यांना बोलावयास लावतात.”
Currently Selected:
मार्क 7: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.