नीतिसूत्रे 16
16
1अंतःकरणाच्या योजना मानव करतो,
परंतु जिभेचे योग्य उत्तर याहवेहपासून येते.
2मनुष्यास वाटते कि त्याचे सर्व मार्ग शुद्ध आहेत,
परंतु याहवेह त्याचा उद्देश पारखतात.
3तुम्ही जे काही काम करता ते याहवेहकडे सोपवून द्या,
आणि ते तुमच्या योजना यशस्वी करतील.
4याहवेह सर्व कार्ये योग्य रीतीने सिद्धीस नेतात.
दुष्टांच्या विनाशासाठी देखील त्यांनी एक दिवस नेमला आहे.
5याहवेह गर्विष्ठ अंतःकरण असलेल्यांचा सर्वांचा तिरस्कार करतात.
याची खात्री असू द्या: त्यांना शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
6दया व सत्य यामुळे पापांचे प्रायश्चित होते;
आणि याहवेहचे भय धरल्यामुळे दुष्टता टाळली जाते.
7जर एखाद्या मनुष्यांचे मार्ग याहवेहला आवडले,
तर ते त्याच्या शत्रूंबरोबरसुद्धा त्यांचा समेट घडवून आणतात.
8अप्रामाणिक मार्गाने मिळविलेल्या अफाट संपत्तीपेक्षा
प्रामाणिकपणे मिळविलेले थोडकेच बरे.
9मानव त्यांच्या हृदयात त्यांच्या योजना करतात
परंतु याहवेह त्यांच्या मार्गांची दिशा ठरवितात.
10राजाच्या ओठांतील शब्द एखाद्या दिव्य वाणीप्रमाणे आहेत,
आणि त्याचे मुख न्याय-विसंगति करीत नाही.
11प्रामाणिकपणाची मापे आणि तराजू याहवेहची आहेत
पिशवीतील सर्व वजने त्यांनीच तयार केली आहेत.
12राजांना वाईट कृत्त्यांचा तिरस्कार वाटतो;
कारण न्यायीपणावरच सिंहासन स्थिर राहते.
13प्रामाणिकपणे बोलणारे राजांना प्रसन्न करतात;
जे योग्य ते बोलतात त्याच्यावर ते प्रीती करतात.
14राजाचा क्रोध म्हणजे मृत्यूचा दूत,
परंतु सुज्ञ मनुष्य तो क्रोध शमवेल.
15जेव्हा राजाचा चेहरा चमकतो, याचा अर्थ जीवदान आहे;
त्याची कृपा वसंतऋतूमध्ये आलेल्या पावसाच्या ढगासारखी आहे.
16सोन्यापेक्षा सुज्ञता मिळविणे कितीतरी पटीने चांगले आहे,
आणि समंजसपणा, चांदी मिळविण्यापेक्षा चांगले आहे!
17सुज्ञांचा मार्ग दुष्टाईला टाळतो;
जे त्यांच्या मार्गांचे रक्षण करतात, त्यांचे आयुष्य सुरक्षित राहते.
18नाशापूर्वी गर्व
आणि अधःपातापूर्वी मग्रूरी येते.
19गर्विष्ठांबरोबर राहून लूट वाटून घेण्यापेक्षा
दीनांबरोबर नम्रचित्त असणे बरे.
20जो कोणी शिक्षणाकडे काळजीपूर्वक लक्ष देतो, त्याची समृद्धी होते,#16:20 किंवा जे उत्तम ते त्यांना मिळते
आणि जो याहवेहवर भरवसा ठेवतो तो आशीर्वादित असतो.
21सुज्ञ अंतःकरण समंजस म्हणून ओळखले जाते,
आणि मधुर वचनांनी शिक्षणाला प्रोत्साहन#16:21 किंवा चालू ठेवते मिळते.
22सुज्ञाला सुज्ञता हा जीवनाचा झरा आहे;
पण मूर्खाची मूर्खताच त्यांच्यावर शिक्षा आणते.
23शहाण्याचे मन त्याच्या मुखावर ताबा ठेवते,
आणि त्याचे ओठ ज्ञान प्रसार करते.
24मधुर शब्द मधाच्या पोळासारखे असतात;
ते आत्म्याला गोड वाटतात आणि हाडांना आरोग्य देतात.
25एक मार्ग असा आहे जो योग्य वाटतो;
परंतु तो शेवटी मृत्यूकडे नेतो.
26परिश्रम करणार्यांना भूक लागणे योग्य;
भूक भागविण्यासाठी त्यांना काम करण्याची प्रेरणा मिळते.
27अधम वाईट योजना करतो,
आणि त्यांच्या ओठांवर ती होरपळणाऱ्या अग्नीसारखी असते.
28विकृत मनुष्य कलहास चेतावणी देतो,
आणि निंदानालस्ती जिवलग मित्रांना सुद्धा विभक्त करते.
29हिंसा करणारा आपल्या शेजार्याला मोहात पाडतो
आणि त्याला कुमार्गावर जाण्यास प्रेरित करतो.
30जो कोणी त्याचे डोळे मिचकावतो तो विकृत योजना करीत असतो;
जो कोणी त्याचे ओठ चावतो, तो वाईट प्रवृत्तीचा आहे.
31पांढरे केस गौरवी मुकुट आहे;
नीतिमत्तेच्या मार्गात चालल्याने तो लाभतो.
32योद्धा असण्यापेक्षा शांत स्वभावी असणे बरे,
शहर जिंकून घेणार्यापेक्षा स्वतःवर ताबा ठेवणारा उत्तम.
33आपण पदरात नाणेफेक करतो,
पण त्याचा प्रत्येक निर्णय याहवेहच्या हाती असतो.
Currently Selected:
नीतिसूत्रे 16: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.