19
1विकृत ओठांच्या मूर्ख मनुष्यापेक्षा,
निर्दोषपणाने वागणारा गरीब मनुष्य अधिक चांगला आहे.
2योग्य ज्ञान असल्याशिवाय इच्छा धरणे चांगले नाही—
घाई करणारे पाय कितीदा असे मार्ग चुकवितात!
3मनुष्य स्वतःच्याच मूर्खपणाने आपल्या नाशाकडे जातो,
तरीही त्याचे हृदय याहवेहविरुद्ध संतापते.
4संपत्ती पुष्कळ मित्र आकर्षित करते,
परंतु अगदी जवळचा मित्रही गरिबाला सोडून जातो.
5खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही.
आणि खोटे शब्द ओतणार्याची सुटका होणार नाही.
6शासनकर्त्याची कृपा लाभावी म्हणून अनेकजण त्याचे स्तुतिपाठक बनतात,
आणि प्रत्येकजण देणग्या देणाऱ्याचा मित्र असतो.
7गरीब माणसांचे सर्व नातेवाईक त्याला टाळतात—
तर त्याचे मित्र त्याला किती बरे टाळतील!
गरीब मनुष्य गयावया करून कितीही त्यांच्यामागे गेला
तरी ते कुठेही सापडत नाहीत.
8जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो;
आणि जो समंजसपणाची आवड धरतो, तो लवकर समृद्ध होतो.
9खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही,
आणि खोटे शब्द ओतणार्याचा नाश होईल.
10मूर्खाने ऐषारामात राहणे उचित नाही—
तसेच गुलामाने राजपुत्रावर अधिकार गाजविणे योग्य नाही!
11मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते;
आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते.
12राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा असतो,
परंतु त्याची कृपादृष्टी गवतावरील दवबिंदूसारखी असते.
13मूर्ख संतान म्हणजे वडिलांच्या नाशाचे कारण आहे.
आणि भांडखोर पत्नी ही
सतत ठिबकणार्या गळक्या छप्परासारखी आहे.
14पूर्वजांपासून वारसांना घरेदारे व संपत्ती मिळते,
परंतु समंजस पत्नी याहवेहपासून मिळते.
15आळस मनुष्याला गाढ झोप आणतो
आणि लक्ष्यहीन मनुष्य उपाशी राहतो.
16जे याहवेहच्या आज्ञा पाळतात, ते आपला जीव सुरक्षित ठेवतात,
परंतु जे आपल्या वर्तनाविषयी निष्काळजी असतात, ते मृत्युमुखी पडतात.
17जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो,
आणि त्यांच्या सत्कृत्याबद्दल याहवेह परतफेड करतील.
18तुझ्या मुलांना शिस्त वेळेवर लाव, कारण त्यातच आशा आहे;
परंतु शिस्त मर्यादे पलीकडे जाऊ नये, जेणेकरून त्यात त्याला मृत्युच येईल.
19तापट मनुष्याला त्याच्या कृतीची शिक्षा भोगावीच लागते;
त्यांना सोडविलेस, तर तुम्हाला पुन्हा तेच करावे लागेल.
20बोध ऐका आणि शिक्षण स्वीकारा
आणि शेवटी तुमची गणना सुज्ञ्यांमध्ये होईल.
21मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो,
पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.
22मनुष्य इच्छा बाळगतो की त्याला अतूट प्रेम मिळावे#19:22 किंवा हाव मनुष्याची लज्जा आहे;
लबाडी करण्यापेक्षा गरीब राहणे बरे.
23याहवेहच्या भयाने जीवनप्राप्ती होते;
तेव्हा अरिष्टाचा स्पर्शही न होता, एखादा समाधानाने विश्रांती घेतो.
24आळशी व्यक्ती आपला हात ताटात घालतो;
तो हात पुन्हा तोंडापर्यंत आणत नाही!
25निंदकाला चाबकाचा मार द्या, म्हणजे साधाभोळा धडा शिकेल;
सुज्ञांना फटकारणी करा, म्हणजे ते अधिक सुज्ञ होतील.
26जे कोणी त्यांच्या वडिलांना लुटतात आणि त्यांच्या आईला हाकलून देतात,
ती अशी संतान आहे जी लज्जा व अप्रतिष्ठा यांना कारणीभूत होते.
27माझ्या मुला, जर शिक्षण ऐकण्याचे थांबवलेस,
तर ज्ञानाच्या वचनापासून तू दूर जाशील.
28भ्रष्ट साक्षीदार न्यायाची अवहेलना करतात;
दुष्टांचे मुख दुष्टता गिळून टाकतात.
29निंदकांसाठी शिक्षा
आणि मूर्खांची पाठ फटक्यांसाठी निर्धारित केली आहे.