20
1मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते;
तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.
2राजाचा क्रोध सिंहाच्या गर्जनेसारखा भयप्रद आहे;
जो त्याचा राग जागृत करतो त्याची प्राणहानी होते.
3कलहापासून दूर राहणे मनुष्याचा सन्मान आहे,
परंतु प्रत्येक मूर्ख भांडणास तत्पर असतो.
4आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत;
म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही.
5मनुष्याच्या अंतःकरणाचे उद्देश हे खोल पाण्यासारखे आहेत,
परंतु ज्याच्याकडे अंतर्दृष्टी असते तो त्या उद्देशांना ओढून बाहेर काढतो.
6पुष्कळजण अतूट प्रेम असल्याचा दावा करतात,
परंतु प्रामाणिक मनुष्य कोणाला सापडेल?
7नीतिमान मनुष्य निष्कलंकीतपणे चालतो;
त्याच्यामागे त्याच्या मुलाबाळांना आशीर्वाद प्राप्त होतात.
8जेव्हा राजा न्याय करण्यासाठी सिंहासनावर बसतो
तेव्हा तो त्याच्या नजरेने सर्व वाईट पाखडून दूर करतो.
9“मी माझे अंतःकरण शुद्ध ठेवले आहे,
मी शुद्ध आहे आणि पाप केलेले नाही.” असे कोण म्हणू शकेल?
10वजनावजनांत व मापामापांत फरक असणे—
या दोन गोष्टींचा याहवेहला वीट आहे.
11अगदी लहान मुलेसुद्धा खरोखरच प्रामाणिक आणि निर्दोष आहेत
ते त्यांच्या कृत्यांवरून ओळखली जात नाहीत काय?
12पाहणारे डोळे व ऐकणारे कान—
दोन्हीही याहवेहचीच निर्मिती आहे.
13तू झोपेची आवड धरू नकोस, नाहीतर तू गरीब होत जाशील;
जागा राहा आणि तुझ्याकडे विपुल खाद्य शिल्लक राहील.
14खरेदी करणारा म्हणतो, “हे चांगले नाही, हे चांगले नाही!”
नंतर तो जातो आणि खरेदी बद्दल बढाई मारतो.
15सोने आहे आणि माणकेही भरपूर आहेत,
परंतु शहाणपणाचे शब्द बोलणारे ओठ दुर्मिळ रत्न आहे.
16जो अनोळखी व्यक्तीला जामीन राहतो त्याचे वस्त्र काढून घे;
जर ते परक्यासाठी केले असेल तर ते गहाण म्हणून घे.
17फसवणूक करून मिळविलेले अन्न स्वादिष्ट लागते,
परंतु त्याचे मुख शेवटी खड्यांनी भरून जाईल.
18सल्ला घेऊन योजना स्थापल्या जातात;
म्हणून युद्ध करण्यापूर्वी योग्य मार्गदर्शन मिळव.
19चहाड्या करणारा विश्वासघात करतो;
म्हणून अतिशय बोलणार्यापासून दूर राहावे.
20जो आपल्या आईवडिलांना शिव्याशाप देतो,
त्याचा दीप गडद अंधारात विझून जाईल.
21वारसासंपत्तीसाठी उतावळेपणे समयापूर्व केलेला दावा
शेवटपर्यंत आशीर्वादित राहत नाही.
22“वाईटाची फेड मी नक्की करेन!” असे म्हणू नकोस.
याहवेहची प्रतीक्षा कर, ते तुझ्यासाठी प्रतिशोध घेतील.
23वजनात व मापात फरक असणे याचा याहवेहला वीट आहे
आणि अप्रामाणिक वजनकाटे त्यांना प्रसन्न करीत नाहीत.
24याहवेह मनुष्याचे मार्ग निर्धारित करतात.
तर मग स्वतःचे मार्ग कोण समजू शकेल?
25विचार न करता घाईघाईने समर्पण करणे
आणि नंतर दिलेल्या शपथांचा विचार करणे, मनुष्यासाठी हा एक सापळा आहे.
26सुज्ञ राजा दुष्टांना पाखडून बाहेर काढतो;
तो मळणीचे चक्र त्यांच्यावर फिरवितो.
27मनुष्याचा आत्मा#20:27 किंवा शब्द याहवेहचा दीप आहे.
तो मनुष्याच्या अंतःकरणावर प्रकाश टाकतो.
28प्रीती आणि विश्वासूपणा राजाला सुरक्षित ठेवते;
तर प्रीतीद्वारे त्याचे सिंहासन सुरक्षित केले जाते.
29तरुणांचे भूषण त्यांचे बळ आहे.
वृद्धांचे भूषण त्यांचे पांढरे केस आहेत.
30बसलेला मार आणि जखमा दुष्टता धुवून टाकते,
आणि बसलेल्या फटक्यांनी अंतःकरण शुद्ध होते.