स्तोत्रसंहिता 106
106
स्तोत्र 106
1याहवेहची स्तुती असो!
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते चांगले आहेत;
त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.
2याहवेहची सर्व गौरवशाली कृत्ये,
किंवा त्यांची स्तुती पूर्णपणे कोण जाहीर करेल?
3जे इतरांशी न्यायाने वागतात,
आणि नेहमीच नीतीने आचरण करतात, ते आशीर्वादित असतात.
4हे याहवेह, जेव्हा तुमच्या प्रजेवर कृपादृष्टी कराल, तेव्हा माझेही स्मरण करा,
त्यांचे तारण कराल, तेव्हा मलाही मदत करा.
5म्हणजे तुम्ही निवडलेल्यांच्या समृद्धीत मलाही वाटा मिळेल,
आणि तुमच्या राष्ट्रांच्या सर्व आनंदामध्ये मीही सहभागी होईन,
आणि तुमच्या वारसांसह मी देखील तुमचे स्तुतिगान करेन.
6आम्ही आमच्या पूर्वजांप्रमाणे पाप केले;
आम्ही अपराध केला आणि दुष्टतेने वागलो.
7जेव्हा ते इजिप्तमध्ये होते,
तेव्हा तुम्ही केलेल्या अद्भुत चमत्कारांकडे त्यांनी लक्ष दिले नाही;
तुम्ही केलेली अनेक दयाळूपणाची कृत्ये ते विसरले;
उलट, तांबड्या समुद्राकाठी त्यांनी तुमच्याविरुद्ध बंड केले.
8तरीसुद्धा आपल्या नामासाठी,
आपले सामर्थ्य प्रगट करण्यासाठी परमेश्वराने त्यांचे तारण केले.
9तांबड्या समुद्राला दरडावताच तो कोरडा झाला;
वाळवंटातून चालत असल्यासारखे त्यांना खोल समुद्रातून चालविले.
10त्यांना त्यांच्या शत्रूपासून सोडविले;
शत्रूंच्या अधिकारातून त्यांची सुटका केली.
11त्यांच्या शत्रूंना जलसमाधी मिळाली;
त्यापैकी एकजणही वाचला नाही.
12तेव्हा लोकांनी त्यांच्या वचनांवर विश्वास ठेवला,
व त्यांचे स्तुतिगान केले.
13परंतु त्यांनी केलेले कार्य ते लवकर विसरले,
त्यांनी केलेली योजना पूर्ण होण्याची त्यांनी वाट पाहिली नाही.
14ओसाड भूमीत त्यांनी आपल्या उत्कट इच्छांना मोकळी वाट करून दिली;
वाळवंटात परमेश्वराची परीक्षा पाहिली.
15परमेश्वराने त्यांच्या मागण्या पुरविल्या,
परंतु जीव झुरणीस लावणारा रोगही त्यांच्याकडे पाठविला.
16तंबूत असताना मोशे आणि याहवेहचा अभिषिक्त अहरोन
यांच्या विरुद्धही त्यांचा हेवा वाढला.
17मग पृथ्वी उघडली आणि तिने दाथानाला गिळून टाकले;
अबीराम व त्याच्या समुहाला दफन केले.
18आणि त्यांच्या अनुयायांवर अग्निपात झाला;
दुष्ट माणसांना भस्म करण्यात आले.
19होरेब येथे त्यांनी एका वासराची मूर्ती घडविली,
आणि त्या धातूच्या मूर्तीची आराधना केली.
20परमेश्वराच्या गौरवाची अदलाबदल
गवत खाणार्या बैलाच्या प्रतिमेशी केली.
21त्या परमेश्वराला ते विसरले, ज्यांनी त्यांना सोडविले,
इजिप्त देशात महान चमत्कार केले,
22हामच्या भूमीत आश्चर्यकर्म केले,
आणि तांबड्या समुद्राकाठी चमत्कार केले.
23मग ते म्हणाले की ते त्यांचा नाश करतील—
जर खुद्द त्यांनी निवडलेला पुरुष मोशे, मध्ये उभा राहिला नसता तर,
त्यांनी आपला क्रोध न आवरता
त्या लोकांचा नाश केला असता.
24वचनदत्त देशास त्या लोकांनी तुच्छ लेखले;
त्यांनी दिलेल्या अभिवचनांवर त्यांचा विश्वास नव्हता.
25त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली,
आणि याहवेहची आज्ञा झिडकारली.
26तेव्हा परमेश्वराने आपले हात उंचावून शपथ घेतली,
की या रानात ते त्यांना नष्ट करतील.
27त्यांच्या वंशजांना दूरदूरच्या राष्ट्रात पाठवतील,
आणि समस्त पृथ्वीवर त्यांना विखरून टाकतील.
28त्यांनी बआल-पौराची पूजा-अर्चना केली
आणि निर्जीव दैवताला यज्ञ अर्पिले.
29या सर्व दुष्टकर्मांनी त्यांनी याहवेहला क्रुद्ध केले,
म्हणून त्यांच्यामध्ये मरी पसरली.
30तेव्हा फिनहास मध्यस्थ म्हणून उभा राहिला,
आणि मग मरी थांबली.
31फिनहासाच्या या चांगल्या कृत्यामुळे
त्याची पिढ्यान् पिढ्या सर्वकाळ नीतिमानात गणना होईल.
32मरीबाह जलाशयाजवळ देखील त्यांनी याहवेहला राग आणला,
आणि त्यांच्यामुळेच मोशेवर संकट आले;
33परमेश्वराच्या आत्म्याविरुद्ध त्यांनी बंडखोरी केली,
आणि मोशे संतापला व अविचारीपणाने बोलला.
34याहवेहनी तशी आज्ञा केली असूनही,
त्यांनी इतर राष्ट्रातील लोकांचा नाश केला नाही.
35उलट ते अन्य राष्ट्रात मिसळले,
आणि त्यांच्या प्रथा आत्मसात केल्या.
36त्यांनी त्यांच्या मूर्तींची आराधना केली,
त्यामुळे ते पाशात अडकले.
37त्यांनी आपल्या लहान मुलामुलींनाही त्या
खोट्या दैवतांना अर्पण केले.
38निष्पाप मुलामुलींचे नरबळी दिले,
कनानाच्या मूर्तींना अर्पणे वाहिली,
आणि त्यांचे रक्त सांडून
त्यांनी ती भूमी अपवित्र केली.
39आपल्याच कर्मानी ते भ्रष्ट झाले;
आणि त्यांचे कृत्य व्यभिचारी ठरले.
40आणि म्हणून याहवेहचा क्रोध आपल्या लोकांविरुद्ध भडकला
आणि त्यांना त्यांच्या वारसांची घृणा आली.
41त्यांनी त्यांना परराष्ट्रांच्या अधीन केले,
त्यांचे शत्रू त्यांच्यावर राज्य करू लागले.
42त्यांच्या शत्रूंनी त्यांना चिरडले
आणि त्यांच्या शक्ती समोर त्यांना समर्पण करावे लागले.
43बरेचदा परमेश्वराने त्यांना सोडविले,
तरी त्यांच्याविरुद्ध ते बंडखोरी करीत राहिले
आणि शेवटी त्यांच्याच पापामुळे ते नाश पावले.
44असे असतानाही परमेश्वराने त्यांच्या यातनांची दखल घेतली
आणि त्यांचा आक्रोश ऐकला;
45त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले,
आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.
46त्यांना बंदिवासात नेलेल्या शत्रूंच्या मनात
त्यांच्याकरिता कृपा उत्पन्न केली.
47हे याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्हाला मुक्त करा;
आम्हाला राष्ट्रांतून एकवटून घ्या,
जेणेकरून आम्ही तुमचे पवित्र नाव धन्यवादित करून,
तुमच्या स्तवनात गौरव मानावे.
48इस्राएलचे परमेश्वर याहवेहची,
अनादिकालापासून अनंतकालापर्यंत स्तुती होवो.
सर्व लोकांनी म्हणावे “आमेन!”
याहवेहची स्तुती होवो.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 106: MRCV
Highlight
Share
Copy
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fen.png&w=128&q=75)
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.