YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 109

109
स्तोत्र 109
संगीत दिग्दर्शकाकरिता. दावीदाची रचना. एक स्तोत्र.
1हे माझ्या स्तुतिपात्र परमेश्वरा,
तुम्ही मौन धारण करू नका,
2कारण दुष्ट आणि कपटी लोकांनी
माझ्याविरुद्ध त्यांचे मुख उघडले आहे;
ते माझ्याविरुद्ध असत्य गोष्टी बोलले आहेत.
3त्यांनी द्वेषपूर्ण शब्दांचा माझ्यावर वर्षाव केला;
विनाकारण ते माझ्यावर हल्ला करतात.
4माझ्या मैत्रीच्या बदल्यात ते माझ्यावर आरोप करतात,
परंतु मी निरंतर प्रार्थना करणारा मनुष्य आहे.
5ते बर्‍याची फेड वाईटाने करतात
आणि प्रीतीच्या मोबदल्यात द्वेष करतात.
6त्यांच्यावर अन्यायी मनुष्य अधिकारी म्हणून नियुक्त करा;
आरोप लावणारा त्याच्या उजव्या हातास उभा ठेवा.
7त्याचे प्रकरण निकालासाठी येताच तो दोषी ठरविल्या जावो,
त्याचीच प्रार्थना त्यास दंडाज्ञा देवो.
8त्याच्या आयुष्याची वर्षे अल्पकालीन होवोत;
त्याचा अधिकार घेण्यासाठी इतर येवोत.
9त्याची मुले पितृहीन होवोत,
आणि त्याची पत्नी विधवा होवो;
10त्याची मुले भीक मागत भटकोत,
त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या घरातून ते बाहेर हाकलण्यात येवो.
11त्याची सर्व मालमत्ता सावकार हिरावून घेवो;
आणि त्याने कष्टाने मिळविलेले सर्वकाही परके लुटोत.
12त्याच्यावर दया करणारा कोणीही नसो;
त्याच्या पितृहीन मुलांची कीव करणारा कोणीही नसो,
13त्याची सर्व पितृहीन मुले मरोत;
एकाच पिढीमध्ये त्याच्या वंशाचे नाव पुसून टाकले जावो.
14त्याच्या आईवडिलांच्या अपराधांबद्दल याहवेह त्याला शासन करो;
त्याच्या मातेची पातके कधीही पुसली न जावो.
15त्याने केलेल्या दुष्ट कृत्यांची याहवेह सतत आठवण ठेवो,
व पृथ्वीवरून त्याचे नाव ते कायमचे पुसून टाकोत.
16कारण त्याने इतरांना दया दाखविली नाही,
उलट गरजवंतांचा त्याने छळ केला
आणि दुःखीकष्टी लोकांचा त्यांना मृत्यू येईपर्यंत पाठलाग केला.
17इतरांना शाप देणे त्याला आवडत असे—
म्हणून त्याचे शाप त्याच्यावरच उलटू द्या.
इतरांचे हितचिंतन करण्यात त्याला आनंद वाटत नसे—
म्हणून त्याचेही हित न होवो.
18त्याने शापाला आपली वस्त्रे म्हणून पांघरली;
ते त्याच्या शरीरात पाण्यासारखे,
व त्याच्या हाडात तेलासारखे शिरले.
19आता त्याचे ते शाप त्याला वस्‍त्रांप्रमाणे पांघरूण टाकोत,
एखाद्या कटिबंधासमान ते त्याला जखडून टाकोत.
20जे माझे शत्रू माझ्याविषयी खोट्या गोष्टी उठवितात,
त्यांना माझे याहवेह परमेश्वर हाच मोबदला देवो.
21तरी हे सार्वभौम याहवेह,
तुमच्या नावासाठी माझ्यावर कृपा करा;
आपल्या करुणामय प्रीती अनुरूप माझी सुटका करा.
22कारण मी दीन आणि दरिद्री आहे,
माझे अंतःकरण घायाळ झाले आहे.
23संध्याछायेसारखा मी समाप्त होत आहे;
टोळा सारखा मी झटकून टाकला जात आहे.
24उपासाने माझे गुडघे शक्तिहीन झाले आहेत;
मी कातडी आणि हाडे यांचा सापळा झालो आहे.
25विरोधकांसाठी मी अपयशाचे प्रतीक झालो आहे;
मला पाहून ते डोकी हलवितात.
26हे याहवेह माझ्या परमेश्वरा,
तुमच्या अक्षय प्रीतिनुरुप माझे तारण करा.
27हे याहवेह, सर्वांना कळावे की जे काही होत आहे,
ते सर्वकाही तुमच्याच हातांनी केले आहे.
28त्या सर्वांनी शाप दिले तरी तुम्ही मला आशीर्वादित करा;
जे माझ्यावर हल्ला करतात, ते लज्जित होवोत,
पण मी, तुमचा सेवक मात्र हर्षभरित होवो.
29माझे विरोधक एखाद्या वस्त्राप्रमाणे अनादर धारण करोत,
आणि लज्जेने ते स्वतःस पांघरूण घेवोत.
30परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन,
उपासकांच्या विशाल समुदायासमोर त्यांचे स्तवन करेन.
31कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात,
त्यांना मृत्युदंड देणार्‍यापासून ते त्यांना संरक्षण देतात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in