स्तोत्रसंहिता 18
18
स्तोत्र 18
संगीत दिग्दर्शकासाठी; याहवेहचा सेवक दावीदाची रचना. जेव्हा याहवेहने दावीदाला त्याच्या सर्व शत्रूंच्या हातातून आणि शौलाच्या तावडीतून सोडविले, तेव्हा दावीदाने या शब्दात याहवेहसाठी गीत गाईले. तो म्हणाला,
1याहवेह, माझे सामर्थ्य, माझे तुमच्यावर प्रेम आहे.
2याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे;
माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो,
माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग#18:2 किंवा सामर्थ्य ते माझे शरणस्थान आहेत.
3स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला,
आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.
4मृत्यूच्या साखळदंडानी मला जखडले,
नाशाच्या प्रवाहांनी मला बुडवून टाकले.
5मृतलोकाच्या दोर्यांनी माझ्याभोवती वेटोळे केले;
मृत्यूचा पाश मला सामोरा आला.
6मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला;
परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली.
त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली;
माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.
7तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली,
आणि पर्वताचे पाये हादरले.
याहवेहच्या क्रोधामुळे ते भयभीत झाले.
8त्यांच्या नाकपुड्यातून धूर निघाला;
भस्म करणारा अग्नी त्यांच्या मुखातून निघाला,
जळते निखारे त्यातून निघाले.
9आकाशाला विभागून याहवेह खाली आले;
घनदाट ढग त्यांच्या पायाखाली होते.
10करुबावर आरूढ होऊन ते उडून आले;
वार्याच्या पंखांवर त्यांनी भरारी मारली.
11अंधकार, व आकाशातील काळे मेघ यांचे आच्छादन;
आपल्या सभोवती त्यांचा मंडप केला आहे.
12त्यांच्या तेजस्वी समक्षतेतून ढगांमधून विजा लखलखल्या
आणि गारांचे प्रचंड वादळ बाहेर पडले.
13याहवेहने स्वर्गातून गर्जना केली;
परात्पराच्या वाणीचा नाद झाला.
14त्यांनी आपले बाण सोडले आणि शत्रूंची दाणादाण केली,
मोठ्या विजेच्या कडकडाटांनी त्यांना पळवून टाकले.
15हे याहवेह, तुमच्या धमकीने
तुमच्या नाकपुड्यातील श्वासाच्या फुंकराने
समुद्राचे तळ उघडकीस आले,
आणि पृथ्वीचे पाये उघडे पडले.
16वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले;
खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.
17माझ्या बलवान शत्रूपासून
माझे शत्रू जे माझ्यासाठी फार शक्तिमान होते, त्यांच्यापासून मला सोडविले.
18माझ्या विपत्कालच्या दिवसात ते माझ्यावर चालून आले,
परंतु याहवेह माझे आधार होते.
19त्यांनी मला प्रशस्त ठिकाणी आणले;
त्यांनी मला सोडविले कारण त्यांना माझ्याठायी हर्ष होता.
20याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार माझ्याशी व्यवहार केला आहे;
माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार त्यांनी मला प्रतिफळ दिले आहे.
21कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत;
माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही.
22त्यांचे सर्व नियम माझ्यासमोर आहेत;
मी त्यांच्या आज्ञेपासून दूर वळलो नाही.
23मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे
आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.
24याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार,
त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या हाताच्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे.
25विश्वासणाऱ्यांशी तुम्ही विश्वासू आहात,
व निर्दोषांशी तुम्ही निर्दोषतेने वागता,
26शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता,
परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता.
27नम्रजनांचा तुम्ही उद्धार करता,
परंतु उन्मत्त दृष्टीच्या लोकांचा तुम्ही पात करता.
28याहवेह तुम्ही माझा दीप प्रज्वलित केला आहे;
माझ्या परमेश्वराने माझ्या अंधाराचा प्रकाश केला आहे.
29तुमच्याच साहाय्याने मी सैन्यावर मात करू शकतो;
माझ्या परमेश्वरामुळे मी गड चढू शकतो.
30परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे.
याहवेहचे वचन दोषरहित आहे;
जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
31याहवेहखेरीज दुसरा कोण परमेश्वर आहे?
आणि आमच्या परमेश्वराशिवाय कोण खडक आहे?
32परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात,
आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
33तेच माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतात;
कड्यांच्या माथ्यांवरून तेच मला सुखरुपपणे नेतात.
34ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात;
माझे हात कास्य धनुष्य वाकवितात.
35माझी ढाल म्हणून तुम्ही मला तारण दिले आहे,
तुमचा उजवा हात मला आधार देतो;
तुमच्या साहाय्याने मला थोर केले आहे.
36माझी पावले घसरू नयेत,
म्हणून माझ्या पावलांसाठी तुम्ही मार्ग विस्तृत केला आहे.
37मी माझ्या शत्रूंचा पाठलाग केला, त्यांना गाठले;
त्यांचा नाश होईपर्यंत मी परतलो नाही.
38मी त्यांना असे तुडविले आहे, की ते उठू शकले नाही,
ते माझ्या पायाखाली पडले.
39तुमच्या शक्तीने मला युद्धासाठी सुसज्ज केले;
माझ्या शत्रूंना तुम्ही माझ्यासमोर लीन केले.
40तुम्ही माझ्या वैर्यांना पाठ दाखविण्यास भाग पाडले,
आणि मी माझ्या शत्रूंचा नाश केला.
41त्यांनी साहाय्याची आरोळी केली, पण त्यांना वाचविण्यास कोणी नव्हते;
त्यांनी याहवेहचा धावा केला, परंतु त्यांनी उत्तर दिले नाही.
42वार्यावर उडून जाणार्या धुळीप्रमाणे मी त्यांचा भुगा केला;
रस्त्यावरील चिखलाप्रमाणे त्यांना तुडवून टाकले.
43लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली;
राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला नेमले.
ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,
44परदेशीय माझ्यासमोर भीतीने वाकतात;
माझे नाव ऐकताच ते माझी आज्ञा पाळतात.
45त्या सर्वांचे धैर्य खचून गेले,
ते त्यांच्या गडातून थरथर कापत बाहेर येतात.
46याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो!
परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो!
47परमेश्वरच आहेत जे माझ्यासाठी सूड घेतात,
ते राष्ट्रांना माझ्या अधीन करतात,
48ते माझी माझ्या वैर्यांपासून सुटका करतात.
तुम्ही मला माझ्या वैर्यांपेक्षा उंचावले आहे;
हिंसक मनुष्यापासून तुम्ही मला सोडविले.
49म्हणून हे याहवेह, राष्ट्रांमध्ये मी तुमची थोरवी गाईन;
मी आपल्या नावाची स्तुती गाईन.
50ते आपल्या राजाला महान विजय देतात;
ते आपल्या अभिषिक्तावर, दावीदावर
आणि त्याच्या वंशजांवरही सर्वदा प्रीती करतात.
Currently Selected:
स्तोत्रसंहिता 18: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.