YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 31

31
स्तोत्र 31
संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र
1याहवेह, मी केवळ तुमच्याच ठायी आश्रय घेतला आहे;
मला कधीही लज्जित होऊ देऊ नका;
आपल्या नीतिमत्वानुसार मला सोडवा.
2तुम्ही आपले कान माझ्याकडे लावा;
त्वरेने येऊन मला सोडवा;
माझ्या आश्रयाचे खडक व्हा,
मला वाचवण्यासाठी बळकट दुर्ग व्हा.
3कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात;
तुमच्या नावाकरिता मला मार्गदर्शन करा आणि मला चालवा.
4माझ्यासाठी लावलेल्या सापळ्यांमघून तुम्ही मला बाहेर काढा,
कारण तुम्हीच माझे आश्रयदुर्ग आहात.
5मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो;
माझ्या विश्वासयोग्य याहवेह, तुम्ही मला मुक्त केले.
6मी व्यर्थ मूर्तिपूजकांचा तिरस्कार करतो;
परंतु माझा भरवसा याहवेहवर आहे.
7तुमच्या प्रीतीमुळे मी आनंदाने प्रफुल्लित झालो आहे,
कारण तुम्ही माझ्या पीडा पाहिल्या आहेत
आणि माझ्या आत्म्यातील संघर्ष तुम्हाला समजले आहेत.
8तुम्ही मला माझ्या शत्रूंच्या स्वाधीन केलेले नाही,
परंतु तुम्ही माझे पाय विशाल जागी स्थिरावले आहेत.
9याहवेह, मजवर दया करा, कारण मी संकटात आहे;
माझे डोळे दुःखाने थकलेले आहेत;
शोकाने माझा देह व माझा आत्मा ढासळला आहे.
10दुःखामुळे माझे आयुष्य
व कण्हण्यामुळे माझी वर्षे कमी होत आहेत;
पापांनी माझी शक्ती शोषून घेतली आहे;
माझी हाडे झिजून गेली आहेत.
11माझ्या सर्व शत्रूंमुळे
माझे शेजारी माझा तिरस्कार करतात
आणि माझ्या जवळच्या मित्रांची मला भीती वाटते—
जे मला रस्त्यावर पाहताच माझ्यापासून दूर पळून जातात.
12एखाद्या मृत मनुष्यासारखा माझा विसर पडला आहे;
एखाद्या फुटलेल्या भांड्यासारखी माझी अवस्था झाली आहे.
13कारण अनेकांना कुजबुजतांना मी ऐकले आहे.
“सर्व बाजूने दहशत आहे!”
ते माझ्याविरुद्ध कट रचीत आहे
आणि माझा जीव घेण्यासाठी ते तयार आहेत.
14परंतु याहवेह, माझा भरवसा तुमच्यावर आहे.
मी म्हणालो, “तुम्हीच माझे परमेश्वर आहात.”
15माझे दिवस तुमच्याच हातात आहेत.
माझ्या शत्रूंच्या हातातून,
माझा पाठलाग करणार्‍यांपासून तुम्हीच मला सोडवा.
16तुमचा मुखप्रकाश तुमच्या दासावर पडू द्या;
तुमच्या प्रेमदयेने माझे तारण करा.
17याहवेह, मला लज्जित होऊ देऊ नका,
मी तुमचा धावा केला आहे;
दुष्ट लोक लज्जित होवोत;
ते अधोलोकात निःशब्द होवोत.
18त्यांचे असत्य बोलणारे ओठ शांत केले जावो.
कारण ते अहंकाराने आणि तिरस्काराने प्रेरित होऊन
नीतिमानाविरुद्ध गर्वाने बोलतात.
19तुमचा चांगुलपणा किती विपुल आहे,
जो तुम्ही तुमच्या भय धरणार्‍यांसाठी राखून ठेवला आहे,
आणि जे लोक तुमच्या ठायी आश्रय घेतात
त्यांच्यावर त्याचा सर्वांसमक्ष वर्षाव करता.
20आपल्या उपस्थितीच्या आश्रयस्थानी
तुम्ही मनुष्यांच्या युक्तीपासून त्यांचे रक्षण करता;
आपल्या मंडपात तुम्ही त्यांना शत्रूंच्या आरोप करणार्‍या
जिभेपासून बचाव करता.
21याहवेह धन्यवादित असोत,
कारण ज्यावेळी मी शत्रूंनी वेढलेल्या शहरात होतो,
त्यांनी मला प्रेमदयेने अद्भुत कृत्ये दाखविली आहेत.
22माझ्या उतावळेपणात मी म्हटले,
“मला तुमच्या दृष्टीपुढून काढून टाकले आहे!”
तरीही जेव्हा मी साहाय्यासाठी तुम्हाला हाक मारली
तेव्हा माझी दयेची विनवणी तुम्ही ऐकली.
23अहो याहवेहच्या सर्व भक्तांनो, त्यांच्यावर प्रीती करा!
याहवेह प्रामाणिक लोकांना मदत करतात
पण ते गर्विष्ठांना पूर्ण मापाने शिक्षा करतात.
24याहवेहवर भरवसा ठेवणारे सर्वजण,
खंबीर व्हा आणि धैर्याने राहा.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in