YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 37

37
स्तोत्र 37
दावीदाचे स्तोत्र.
1दुष्टांचा हेवा करू नकोस;
दुष्कर्म करणार्‍यांमुळे अस्वस्थ होऊ नकोस.
2कारण ते गवताप्रमाणे लवकर वाळून जातील,
हिरवळीप्रमाणे ते शीघ्र नष्ट होऊन जातील.
3याहवेहवर भरवसा ठेव आणि चांगले ते कर;
की तू सुरक्षित कुरणाचा आनंद उपभोगून देशात वसती करू शकशील.
4याहवेहमध्ये आनंद कर,
म्हणजे ते तुझ्या हृदयाची मागणी पूर्ण करतील.
5तू आपला जीवनक्रम याहवेहच्या स्वाधीन कर;
त्यांच्यावर भरवसा ठेव, म्हणजे ते तुझ्यासाठी हे करतील:
6तुझ्या नीतिमत्त्वाचे फळ सूर्योदयेप्रमाणे प्रकाशित होईल,
तुझ्यातील सत्यता भर दुपारच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे स्पष्ट होईल.
7याहवेहसमोर निश्चिंत राहा
व धीराने त्यांची वाट पाहा;
जेव्हा लोकांना त्यांच्या मार्गात यश मिळते,
त्यांच्या दुष्ट योजना सफल होतात, तेव्हा तू संतापू नकोस.
8तुझा राग सोडून दे आणि चिरडीस येऊ नको;
हेवा करू नको—नाहीतर वाईट करण्यास तू प्रवृत्त होशील.
9दुष्टांचा नाश ठरलेलाच आहे.
परंतु ज्यांची आशा याहवेहवर आहे, त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.
10थोडक्याच अवधीत दुष्ट लोक नाहीसे होतील;
त्यांना शोधूनही ते तुला सापडणार नाहीत.
11परंतु नम्र लोकांना पृथ्वीचे वतन मिळेल
आणि ते विपुल शांती व समृद्धीचा उपभोग घेतील.
12दुष्ट लोक नीतिमानाविरुद्ध कट रचतात,
त्यांना पाहून आपले दातओठ खातात;
13प्रभू दुष्टांवर हसत आहे,
कारण त्यांना माहीत आहे की त्यांचा दिवस येत आहे.
14दीनदुबळ्यांस ठार करावे
व सरळ मार्गाने चालणार्‍यांचा वध करण्यास
दुष्ट तलवार उपसतात
आणि धनुष्य वाकवून सज्ज करतात.
15परंतु त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदणार,
आणि त्यांची धनुष्ये तोडून टाकली जाणार.
16दुर्जनांनी दुष्टाईने मिळविलेल्या विपुल धनापेक्षा
नीतिमानाचे सीमित धन बरे;
17दुष्टांचे सामर्थ्य मोडून टाकले जाईल,
परंतु याहवेह नीतिमानांना आधार देतात.
18निर्दोष लोकांच्या दिवसांवर याहवेहचे लक्ष असते,
आणि त्यांचे वतन सर्वकाळ टिकते.
19कठीण काळी ते लज्जित होणार नाही;
दुष्काळात त्यांच्याजवळ भरपूर असेल.
20पण दुष्ट लोक मात्र नष्ट होतील:
याहवेहचे शत्रू हे मैदानातील फुलांप्रमाणे वाळून जातील
आणि धुराप्रमाणे दिसेनासे होतील.
21दुष्ट लोक उसने घेतात पण फेडीत नाहीत,
परंतु नीतिमान उदारपणे देत असतो;
22याहवेह ज्यांना आशीर्वाद देतात, ते पृथ्वीचे वतन पावतील,
परंतु जे शापित आहेत, ते नष्ट होतील.
23ज्याला याहवेह प्रिय वाटतात,
त्या मनुष्याची पावले याहवेह स्थिर करतात;
24जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही,
कारण याहवेह त्याला आपल्या हाताने सावरतील.
25मी तरुण होतो आणि आता प्रौढ झालो आहे,
तरी आजपर्यंत नीतिमानाला टाकलेला
किंवा त्याच्या संततीला भीक मागताना मी पाहिले नाही.
26ते नेहमी इतरांना उदारतेने दान आणि उसने देतात;
त्यांची संतती आशीर्वाद#37:26 किंवा त्यांच्या लेकरांची नावे इतरांना आशीर्वाद देताना उच्चारली जातील असते.
27वाईटापासून दूर राहा आणि चांगले ते करा;
म्हणजे तुम्ही या देशात कायमचे राहाल.
28कारण याहवेहस न्यायी प्रिय आहे;
ते आपल्या विश्वासू भक्तांचा कधीही त्याग करणार नाही.
दुष्टपणा करणारे लोक मात्र पूर्णपणे नाश पावतील,
दुष्टांची संतती नष्ट होऊन जाईल.
29नीतिमानास पृथ्वीचे वतन मिळेल
आणि आपल्या वतनात ते सर्वदा राहतील.
30नीतिमान आपल्या मुखाने ज्ञानाच्या गोष्टी बोलतो,
त्याची जीभ जे न्याय्य आहे ते उच्चारते.
31परमेश्वराचे नियम त्याच्या अंतःकरणात असतात;
त्याची पावले घसरणार नाही.
32दुष्ट लोक नीतिमानांवर टपलेले असतात,
त्यांना जिवे मारण्याची वाट पाहत असतात.
33परंतु याहवेह त्यांना दुष्ट लोकांच्या हाती देणार नाही,
किंवा न्यायालयात त्यांना ते दोषीही ठरविले जाऊ देणार नाही.
34याहवेहची प्रतीक्षा कर
आणि त्यांच्या सन्मार्गाचे अवलंबन कर.
तेच तुला उंच करून पृथ्वीचे अधिकारी करतील;
दुष्ट लोक नष्ट झाल्याचे तू डोळ्यांनी पाहशील.
35मी एक वाईट व क्रूर मनुष्य पाहिला आहे.
तो सुपीक जमिनीतील हिरव्यागार झाडासारखा पसरलेला होता.
36परंतु तो लवकरच नाहीसा झाला;
मी त्याचा शोध घेतला, पण तो मला सापडला नाही.
37सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा;
शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे.
38परंतु सर्व पापी लोक नष्ट केले जातील;
आणि त्याची संतती छाटली जाईल.
39याहवेहद्वारे नीतिमानांचे तारण होते.
संकटकाळी ते त्यांचे आश्रयदुर्ग असतात.
40याहवेह त्यांचे साहाय्य करतात आणि त्यांना मुक्त करतात;
दुष्टांपासून सुटका करून त्यांचे रक्षण करतात,
कारण त्यांनी याहवेहचा आश्रय घेतला आहे.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in