YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 42

42
द्वितीय पुस्तक
स्तोत्रसंहिता 42–72
स्तोत्र 42
संगीत दिग्दर्शकासाठी. कोरहाच्या मुलांचे मासकील.
1हरणी जशी पाण्यासाठी उत्कट लालसा करते,
तसा हे परमेश्वरा, माझा जीव तुमच्यासाठी उत्कट लालसा करीत आहे.
2माझा जीव परमेश्वराकरिता, जिवंत परमेश्वराकरिता तहानलेला आहे.
मी केव्हा परमेश्वरासमोर येऊन त्यांचे दर्शन करणार?
3रात्र आणि दिवस,
माझे अश्रू माझा आहार झाले आहेत.
मला लोक सतत असे विचारीत आहेत.
“कुठे आहे तुझा परमेश्वर?”
4या गोष्टींची आठवण करून
माझा आत्मा तुटत आहे:
कसे मी परमेश्वराच्या भवनाकडे जाणार्‍या
विशाल गर्दीचे नेतृत्व करीत होतो.
त्यावेळी उत्सवाच्या वातावरणात आनंद, जयघोष
आणि आभार यांचा आवाज प्रतिध्वनित होत होता.
5हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास?
आतल्याआत का तू तळमळत आहेस?
परमेश्वराची आशा धर.
मी अजूनही माझा तारणारा
आणि माझ्या परमेश्वराची स्तुती पुनः करेन.
6माझ्या परमेश्वरा, माझा जीव माझ्याठायी उदास झाला आहे;
तेव्हा मी यार्देन प्रदेशातून
आणि हर्मोनाच्या शिखरावरून, मिसहार पर्वतावरून
तुमचे स्मरण करणार.
7तुमच्या गर्जणार्‍या धबधब्याप्रमाणे,
सागर सागराला आव्हान करतो;
तुमच्या सर्व लाटा व त्यांचा कल्लोळ
माझ्यावर झपाटून आदळत आहेत.
8तरी देखील याहवेह आपल्या अढळ प्रीतीचा वर्षाव
दिवसा माझ्यावर करतात, मला जीवन देणार्‍या परमेश्वराची
मी रात्रभर गीते गातो, प्रार्थना करतो.
9मी आरोळी मारून म्हणतो,
“हे परमेश्वरा, माझ्या आश्रयाचे खडक,
तुम्ही मला का विसरलात?
शत्रूंच्या हल्ल्यामुळे शोकाकुल होऊन मी का फिरावे?”
10माझे शत्रू दिवसभर
थट्टेने मला विचारतात,
“तुझा परमेश्वर कुठे आहे?”
यामुळे माझ्या हाडांना नश्वर वेदना होत आहे.
11हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास?
आतल्याआत का तळमळत आहेस?
परमेश्वरावर आपली आशा ठेव,
मी पुनः माझा तारणारा आणि
माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in