YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 59

59
स्तोत्र 59
संगीत दिग्दर्शकासाठी. “अल्तश्केथ” चालीवर आधारित. दावीदाचे मिक्ताम गाण्याची रचना. दावीदाला ठार करण्याच्या उद्देशाने शौलाने त्याचा घरावर पाळत ठेवण्यासाठी सैनिक पाठवले तेव्हा ही घटना घडली.
1हे परमेश्वरा, मला माझ्या शत्रूपासून सोडवा;
जे माझ्याविरुद्ध उठले आहेत, त्यांच्यापासून रक्षण करण्यास माझे दुर्ग व्हा.
2दुष्कर्म करणार्‍यांपासून
आणि या रक्तपिपासू लोकांपासून माझा बचाव करा.
3पाहा, माझा जीव घेण्यासाठी ते कसा दबा धरून बसले आहेत!
याहवेह, मी कोणताही अपराध किंवा पाप केले नसता
क्रूर माणसे माझ्याविरुद्ध कट रचत आहेत.
4मी काही चुकीचे केले नसले तरी ते माझ्यावर आक्रमण करण्याची तयारी करीत आहेत.
हे परमेश्वरा, उठा, माझ्या कष्टांकडे पाहा आणि मला साहाय्य करा.
5याहवेह, सेनाधीश परमेश्वरा,
इस्राएलाच्या परमेश्वरा, जागृत होऊन सर्व राष्ट्रांना दंड करा.
या दुष्ट, विश्वासघातकी लोकांना
दयामाया दाखवू नका. सेला
6संध्याकाळी ते परत येतात;
कुत्र्यांसारखे गुरगुरत
हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.
7ते त्यांच्या तोंडातून काय ओकतात ते पाहा.
त्यांच्या तोंडातील शब्द तलवारीसारखे धारदार आहेत
आणि ते विचारतात, “आम्हाला कोण ऐकू शकेल?”
8याहवेह, तुम्ही त्यांच्यावर हसता;
तुम्ही सर्व राष्ट्रांचा उपहास करता.
9तुम्ही माझे सामर्थ्य आहात, मी तुमची प्रतीक्षा करेन;
कारण परमेश्वर तुम्हीच माझे आश्रयस्थान आहात.
10तुम्ही माझे प्रेमळ परमेश्वर आहात.
परमेश्वर माझ्यापुढे जातील,
मग मी माझ्या निंदकांवर समाधानतेने उपहासात्मक दृष्टी टाकू शकेन.
11परंतु त्यांना जिवे मारू नका,
माझे लोक लवकर विसरतील,
प्रभू, तुम्ही आमची ढाल#59:11 किंवा सार्वभौम आहात.
आपल्या बलाने त्यांना मुळासकट उपटा आणि त्यांना खाली पाडा.
12त्यांच्या मुखाने केलेली पापे,
त्यांच्या ओठांचे शब्द
आणि त्यांनी दिलेल्या शापांमुळे
व लबाड्यांमुळे त्यांना स्वतःच्या अहंकारात अडकू द्या.
13त्यांना आपल्या क्रोधाच्या अग्नीने भस्म करा,
त्यांना असे भस्म करा, की त्यांच्यातील काहीही शिल्लक राहणार नाही.
तेव्हा दिगंतापर्यंत कळेल की
परमेश्वर खरोखरच याकोबाचे सत्ताधारी आहेत. सेला
14संध्याकाळी ते परत येतात;
कुत्र्यांसारखे गुरगुरत,
हल्ला करण्यास ते नगराभोवती हिंडतात.
15अन्नाचा शोध करीत भटकतात
आणि संतुष्ट झाले नाही तर भुंकत राहतात.
16परंतु मी दररोज सकाळी तुमचे सामर्थ्य
आणि तुमची दया यांची गीते गाईन,
कारण माझ्या दुःखाच्या व संकटाच्या दिवसात तुम्ही माझे
आश्रयदुर्ग आणि शरणस्थान आहात.
17हे माझ्या सामर्थ्या, तुमची स्तुतिस्तोत्रे मी गात आहे,
कारण हे माझ्या दयाळू परमेश्वरा,
तुम्हीच माझ्या सुरक्षिततेचे उंच दुर्ग आहात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in