प्रकटीकरण 10
10
देवदूत आणि लहानसा ग्रंथपट
1मग मी आणखी एक प्रचंड देवदूत, स्वर्गातून उतरताना पाहिला. त्याने मेघांचे वेष्टण घातले होते. त्याच्या मस्तकाच्या वरती मेघधनुष्य होते; त्याचा चेहरा सूर्यासारखा तेजस्वी होता, आणि त्याचे पाय अग्नी स्तंभासारखे होते. 2त्याच्या हातात एक उघडलेली छोटी गुंडाळी होती. त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय जमिनीवर ठेवला. 3मग त्याने सिंहगर्जनेसारखी एक मोठी गर्जना केली, तेव्हा सात मेघगर्जनांनी प्रत्युत्तर दिले. 4त्या सात मेघगर्जनांनी उच्चारलेले शब्द मी लिहून ठेवणार होतो; तेवढ्यात स्वर्गातून एक वाणी मला म्हणाली, “थांब, लिहू नकोस. त्यांचे शब्द शिक्कामोर्तब कर, आताच ते प्रकट करावयाचे नाहीत.”
5मग समुद्र व जमीन यावर उभे राहिलेल्या त्या बलवान देवदूताने आपला उजवा हात स्वर्गाकडे उंचावला. 6आणि जे युगानुयुग जिवंत आहे, ज्यांनी आकाश व त्यातील सर्वकाही, पृथ्वी व तिच्यातील सर्वकाही, समुद्र व त्यातील सर्व जलचर निर्माण केले, त्यांची शपथ वाहून म्हटले की, “आता अधिक विलंब लागणार नाही! 7पण सातवा देवदूत आपले रणशिंग वाजविण्याच्या बेतात असेल त्या दिवसात, आपले सेवक व संदेष्टे यांना कळविल्याप्रमाणे युगानुयुग गुप्त ठेवलेली परमेश्वराची रहस्यमय योजना साध्य होईल.”
8मग स्वर्गातील ती वाणी माझ्याशी पुन्हा बोलली, “जा आणि समुद्र व जमीन यावर उभ्या असलेल्या त्या बलवान देवदूताकडून ती उघडलेली गुंडाळी घे.”
9त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊन मी त्याला ती छोटी गुंडाळी मागितली. तो मला म्हणाला, “ही घे आणि खाऊन टाक. ‘ती तुझ्या तोंडात मधासारखी गोड लागेल,’ पण ती गिळल्यावर ती तुझे पोट आंबट करील.”#10:9 यहे 3:3 10तेव्हा मी देवदूताच्या हातातून छोटी गुंडाळी घेतली आणि खाऊन टाकली. त्याने सांगितल्याप्रमाणे माझ्या तोंडाला ती मधाप्रमाणे गोड लागली, पण ती गिळल्यावर माझे पोट आंबट झाले. 11तेव्हा मला सांगण्यात आले की, “अनेक लोक, राष्ट्रे, भाषा बोलणारे व राजे यांना तू पुन्हा भविष्यवाणी केली पाहिजे.”
Currently Selected:
प्रकटीकरण 10: MRCV
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
मराठी समकालीन आवृत्ती™, नवीन करार
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे. सर्व अधिकार जगभरात राखीव.
Marathi Contemporary Version™, New Testament
Copyright © 1978, 1982, 2008, 2022 by Biblica, Inc.
Used with permission. All rights reserved worldwide.