10
1बंधूंनो व भगिनींनो, माझी मनापासून इच्छा व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की इस्राएल लोकांचे तारण व्हावे. 2ते परमेश्वराप्रती आवेशी आहेत, हे मला ठाऊक आहे, परंतु तो आवेश ज्ञानावर आधारित नाही, याबद्दल मी साक्ष देतो. 3परमेश्वराच्या नीतिमत्वाविषयी त्यांना माहीत नाही. ते परमेश्वराच्या नीतिमत्वाच्या अधीन न होता, त्यांनी स्वतःचे नीतिमत्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले. 4कारण ख्रिस्त नियमशास्त्रांची परिपूर्ती आहे, यासाठी की विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्व प्राप्त व्हावे.
5नियमशास्त्रावर आधारित नीतिमत्वासंबंधी मोशेने अशा रीतीने लिहिले: “जो कोणी या गोष्टी करेल तो त्यामुळे जिवंत राहील.”#10:5 लेवी 18:5 6पण विश्वासाने मिळणारे नीतिमत्व सांगते: “असे आपल्या मनात म्हणू नका की, ‘स्वर्गात कोण चढेल?’ ”#10:6 अनु 30:12 (म्हणजे, ख्रिस्ताला खाली आणण्यासाठी) 7“किंवा ‘खाली पाताळात कोण उतरेल?’ ” (म्हणजे, ख्रिस्ताला मेलेल्यांमधून वर आणण्यासाठी)#10:7 अनु 30:12‑13 8याचा अर्थ काय आहे? “हे वचन तुमच्याजवळ आहे; ते तुमच्या मुखात व हृदयात आहे,”#10:8 अनु 30:14 हा विश्वासाचा संदेश आम्ही गाजवितो: 9“येशू प्रभू आहे,” असे तुम्ही मुखाने जाहीर कराल व परमेश्वराने त्यांना मेलेल्यातून उठविले असा तुमच्या अंतःकरणात विश्वास धराल, तर तुमचे तारण होईल. 10कारण तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवल्यानेच तुम्ही नीतिमान ठरता; आणि आपल्या मुखाने इतरांना आपल्या विश्वासाबद्दल सांगितले की तारण होते. 11शास्त्रलेख म्हणते, “जो कोणी प्रभू येशूंवर विश्वास ठेवितो तो कधीही लज्जित होणार नाही.”#10:11 योएल 2:32 12यहूदी व गैरयहूदी यामध्ये फरक नाही; त्या सर्वांचा एकच प्रभू आहे आणि जे त्यांचा धावा करतात त्या सर्वांना ते विपुल आशीर्वाद देतात, 13परंतु, “जो कोणी प्रभूच्या नावाने त्यांचा धावा करेल तोच वाचेल.”#10:13 योएल 2:28‑32
14ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, तर ते त्याचा धावा कसा करतील? आणि ज्याच्याविषयी त्यांनी कधी ऐकलेच नाही, तर त्याच्यावर विश्वास कसा ठेवतील? आणि कोणी त्यांना संदेश सांगितलाच नाही, तर ते कसे ऐकतील? 15आणि कोणाला पाठविल्यावाचून ते संदेश कसा सांगतील? कारण असे लिखित आहे: “शुभवार्ता आणणार्याचे पाय किती मनोरम आहेत!”#10:15 यश 52:7
16परंतु शुभवार्ता सर्वच इस्राएल लोकांनी स्वीकारली नाही. यशायाह म्हणतो, “प्रभू, आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे?”#10:16 यश 53:1 17तरीपण, संदेश ऐकल्यानेच विश्वास प्राप्त होतो, आणि ख्रिस्ताचा संदेश, वचन ऐकल्यामुळे प्राप्त होतो. 18परंतु मी विचारतो: त्यांनी ऐकले नाही का? होय, ऐकले:
“पृथ्वीच्या दिगंतापर्यंत त्यांची वाणी गेली आहे,
कारण जगाच्या शेवटपर्यंत त्यांचा शब्द गेला आहे.”#10:18 स्तोत्र 19:4
19मी पुन्हा विचारतो: हे इस्राएली लोकांना कळलेच नाही का? प्रथम मोशे म्हणतो,
“जे राष्ट्र नाही त्यांच्याद्वारे मी तुम्हाला ईर्षेस आणेन;
ज्या राष्ट्राला समज नाही त्याद्वारे मी तुम्हाला क्रोधास आणेन.”#10:19 अनु 32:21
20यशायाह धिटाईने म्हणाला,
“ज्यांनी माझा शोध केला नव्हता, त्यांना मी सापडलो आहे;
ज्यांनी माझ्याविषयी विचारपूस केली नव्हती, त्यांना मी स्वतःस प्रकट केले.”#10:20 यश 65:1
21इस्राएलाबद्दल तो म्हणतो,
“आज्ञा न पाळणार्या आणि हट्टी लोकांसाठी
मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत.”#10:21 यश 65:2