YouVersion Logo
Search Icon

रोमकरांस 11

11
इस्राएलमधील अवशेष
1मग मी विचारतो: परमेश्वराने आपल्या लोकांचा त्याग केला आहे काय? मुळीच नाही! मी स्वतः एक इस्राएली, अब्राहामाच्या कुळातील व बन्यामीनाच्या वंशातील आहे. 2ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली: 3“प्रभू, त्यांनी तुमच्या संदेष्ट्यांना मारून टाकले आहे, आणि तुमच्या वेद्या फोडल्या आहेत; मी एकटाच उरलो आहे, आणि आता ते मला सुद्धा मारण्याचा प्रयत्न करीत आहेत.”#11:3 1 राजे 19:10, 14 4यावर परमेश्वराचे त्याला काय उत्तर होते? “मी माझ्याकरिता सात हजार लोक राखून ठेवले आहेत आणि ज्यांनी बआलच्या पुढे गुडघे टेकले नाहीत.”#11:4 1 राजे 19:18 5वर्तमान काळीही असेच आहे. काही अवशिष्ट जण कृपेने निवडलेले आहेत, 6आणि जर हे कृपेने आहे, तर कर्मावर आधारित होऊ शकत नाही. तसे असते, तर कृपा ही यापुढे कृपा राहणार नाही.
7मग काय? इस्राएली लोकांनी जे झटून शोधले ते त्यांना मिळालेले नाही. जे निवडलेले होते त्यांना मिळाले, पण इतरजण कठीण झाले, 8जसे लिहिले आहे:
“परमेश्वराने त्यांना धुंदीचा आत्मा दिला आहे,
त्यांचे डोळे पाहू शकत नाहीत
व कान ऐकू शकत नाहीत,
आणि असे आज या दिवसापर्यंत चालले आहे.”#11:8 अनु 29:4; यश 29:10
9दावीद राजा म्हणाला:
“त्यांचा मेज सापळा व पाश,
त्यांना अडखळविण्याचा धोंडा आणि प्रतिफळ असा होवो.
10त्यांचे डोळे अंधकारमय होवोत, म्हणजे त्यांना दिसणार नाही,
आणि त्यांची कंबर कायमची खाली वाकवून ठेवा.”#11:10 स्तोत्र 69:22, 23
कलम केलेल्या फांद्या
11मी पुन्हा विचारतो: ते असे अडखळले की परत उभे राहू शकणार नाहीत का? नक्कीच नाही! त्यांच्या पापांमुळे, गैरयहूदी लोकांना तारण प्राप्त होईल, म्हणजे इस्राएल ईर्षेला पेटतील. 12त्यांच्या पापांचा परिणाम म्हणून जग आत्मिकरित्या धनवान झाले आणि त्यांचे नुकसान म्हणजे गैरयहूदीयांचे आत्मिक धन झाले, तर मग त्यांचे भरून येणे कितीतरी आत्मिक आशीर्वादाने धनयुक्त होईल!
13मी जे तुम्ही गैरयहूदी आहात, त्यांच्यासोबत बोलतो. मी जितका गैरयहूदीयांसाठी प्रेषित आहे, तेवढाच मी माझ्या सेवेचा अभिमान बाळगतो. 14या आशेने की कसेही करून मी माझ्या लोकांमध्ये हेवा निर्माण करून त्यांच्यापैकी काही जणांचे तारण साधावे. 15त्यांच्या नकारामुळे जगाचा समेट झाला तर त्यांची स्वीकृती मरणातून जीवन होणार नाही का? 16आणि आता पिठाच्या गोळ्यापैकी काही भाग प्रथमफळ म्हणून पवित्र आहे तर, सर्वच पिठाचा गोळाही पवित्र ठरेल; जर मुळे पवित्र असली, तर फांद्याही असणार.
17जर काही फांद्या मोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही, जे रानटी जैतून, त्यांच्यामध्ये कलमरूपे लावले तर तुम्ही जैतून वृक्षाच्या मुळातून होणार्‍या पौष्टिकतेचे वाटेकरी झाला आहात. 18परंतु इतर फांद्यापेक्षा स्वतःला विशेष समजू नका. हे लक्षात ठेवा: तुम्ही मुळाला आधार देत नाही, परंतु मूळ तुम्हाला आधार देते. 19तुम्ही म्हणत असाल, “या फांद्या तोडल्या म्हणजे मला कलम लावण्यात येईल.” 20ठीक आहे. त्या फांद्या अविश्वासामुळे तोडण्यात आल्या, आणि तुम्ही केवळ विश्वासामुळे उभे आहात. तेव्हा अहंकारी होऊ नका पण भयभीत व्हा. 21कारण जर परमेश्वराने स्वाभाविक फांद्या राखल्या नाहीत, तर तो तुम्हालाही राखणार नाही.
22परमेश्वराचा दयाळूपणा आणि कठोरपणा लक्षात घ्या: जे पडले त्यांच्याशी कठोरपणा, पण तुमच्यासाठी दयाळूपणा. पण तुम्ही त्यांच्या दयाळूपणात राहिले पाहिजे; नाही तर तुम्हालाही छाटून टाकण्यात येईल. 23आणि जर ते अविश्वासात राहणार नाहीत, तर तेही कलम म्हणून लावले जातील, कारण परमेश्वर त्यांचे कलम पुन्हा लावण्यास समर्थ आहेत. 24या सर्वानंतर, जर तुम्हाला मूळच्या रानटी जैतुनाच्या झाडातून कापून टाकले, त्या तुम्हाला सृष्टिक्रम सोडून चांगल्या जैतूनात कलम लावले, तर या ज्या त्याच्या मूळच्याच फांद्या त्या आपल्या जैतूनात किती विशेषकरून कलम म्हणून लावल्या जातील!
सर्व इस्राएली लोकांचा उद्धार
25प्रिय बंधूंनो व भगिनींनो, या रहस्याविषयी तुम्ही अजाण नसावे अशी माझी इच्छा आहे, यासाठी की तुम्ही बढाई मारू नये: गैरयहूदी लोकांची ठरलेली संख्या पूर्ण विश्वासात येईपर्यंत इस्राएली लोक काही प्रमाणात कठोर झाले आहेत, 26आणि याप्रकारे सर्व इस्राएलचे तारण होईल. याविषयी लिहिले आहे:
“सीयोनातून तारणारा येईल;
व तो याकोबाला सर्व अभक्तीपासून वळवेल.
27मी त्यांची पापे हरण करेन.
आणि त्यांच्याशी केलेला हा माझा करार आहे.”#11:27 यश 59:20, 21; 27:9; यिर्म 31:33, 34
28शुभवार्तेच्या दृष्टिकोनातून पाहता, ते तुमचे शत्रू आहेत; निवडीच्या दृष्टिकोनातून पाहता पूर्वजांसाठी ते अजूनही परमेश्वराला प्रिय असेच आहेत. 29कारण परमेश्वराचे पाचारण व कृपादाने अपरिवर्तनीय असतात. 30एकेकाळी तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळणारे नव्हता, आता यहूदीयांच्या अवज्ञेचा परिणाम म्हणून तुम्हाला दया मिळाली आहे, 31आता परमेश्वराची जी दया तुमच्यावर झाली त्याचा परिणाम म्हणून, जे आज्ञा उल्लंघन करणारे झाले, त्यांना आता दया प्राप्त होईल. 32कारण सर्वांवर दया करावी म्हणून परमेश्वराने त्या सर्वांना आज्ञा मोडणार्‍यांसोबत बांधले आहे.
परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे
33अहाहा, परमेश्वराचे गहन ज्ञान आणि बुद्धीची संपत्ती किती अगम्य आहे!
त्यांचे न्याय गहन आहेत,
त्यांचे मार्ग किती दुर्गम आहेत!
34“कारण प्रभूचे मन कोण जाणू शकेल?
किंवा त्यांचा सल्लागार कोण आहे?”#11:34 यश 40:13
35“परमेश्वराला कोणी कधी काही दिले
की परमेश्वराने त्यांची परतफेड करावी?”#11:35 इय्योब 41:11
36कारण त्यांच्यापासून आणि त्यांच्याद्वारे आणि त्यांच्यासाठी सर्वगोष्टी आहेत.
त्यांना सदासर्वकाळ गौरव असो! आमेन.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in