YouVersion Logo
Search Icon

जखर्‍याह 10

10
याहवेह यहूदीयाचे संगोपन करतील
1“वसंतॠतूमध्ये पाऊस पडावा म्हणून याहवेहस विनंती करा;
याहवेहच कडाडणाऱ्या मेघगर्जना पाठवितात.
तेच सर्व लोकांवर पावसाचा वर्षाव करतात
आणि प्रत्येकाला शेतातील पीक देतात.
2मूर्ती लबाड बोलतात,
दैवप्रश्न करणारे खोटे दृष्टान्त बघतात;
ते जी स्वप्ने सांगतात ती खरी नसतात,
त्यांनी केलेले सांत्वन व्यर्थ असते.
म्हणून लोक मेंढपाळ नसल्यामुळे
जुलमाच्या दबावाखाली मेंढराप्रमाणे भटकतात.
3“माझा संताप मेंढपाळांविरुद्ध भडकतो,
आणि मी पुढार्‍यांना शिक्षा करेन;
कारण आपल्या कळपाची, यहूदीयाच्या लोकांची
काळजी सर्वसमर्थ याहवेह करतील,
आणि त्यांना युद्धातील कुशल घोड्यांप्रमाणे करतील.
4यहूदातून कोनशिला येईल,
त्याच्यातूनच तंबूचा खिळा,
त्याच्यातूनच युद्धाचे धनुष्य,
त्याच्यातूनच प्रत्येक अधिकारी येईल.
5एकत्र ते योद्ध्यांसारखे होतील
ते आपले शत्रू रस्त्यातील चिखलात तुडवतील.
ते लढतील कारण याहवेह त्यांच्याबरोबर आहेत,
आणि ते त्यांच्या शत्रूंच्या घोडेस्वारांना लज्जित करतील.
6“मी यहूदाहला बलवान करेन
आणि योसेफाच्या वंशास वाचवेन.
मी त्यांची पुनर्स्थापना करेन
कारण मी त्यांच्यावर करुणा करतो.
ते असे होतील, जणू काही
मी त्यांचा त्याग कधी केलाच नव्हता,
कारण मी त्यांचा याहवेह परमेश्वर आहे
आणि मी त्यांचा धावा ऐकेन.
7एफ्राईमी योद्ध्यांसारखे होतील,
द्राक्षारसाने व्हावे तसे त्यांचे हृदय आनंदित होईल.
त्यांची मुलेसुद्धा हे पाहतील आणि उल्लास पावतील;
त्यांची हृदये याहवेहच्या ठायी आनंदित होतील.
8मी त्यांना संकेत देईन,
आणि त्यांना एकत्र करेन.
मी निश्चितच त्यांना सोडवेन;
ते पुन्हा पूर्वीसारखेच असंख्य होतील.
9जरी मी त्यांना लोकांमध्ये विखुरले आहे,
तरी देखील त्या दूर देशी ते माझी आठवण करतील.
ते व त्यांची सर्व मुलेबाळे जगतील,
आणि ते परत येतील.
10मी त्यांना इजिप्तमधून परत आणेन,
आणि अश्शूरातून एकत्र गोळा करेन.
गिलआद व लबानोनमध्ये त्यांचे पुनर्वसन करेन,
आणि तिथे त्यांना जागा पुरेशी होणार नाही.
11ते संकटांच्या समुद्रातून प्रवास करतील;
उफाळणाऱ्या लाटा शांत केल्या जातील
आणि नाईल नदीचे खोल पाणी शुष्क होईल.
अश्शूरचा गर्व खाली करण्यात येईल
व इजिप्तचा राजदंड निघून जाईल.
12मी याहवेहमध्ये त्यांना सामर्थ्यवान करेन
आणि त्यांच्या नामामध्ये ते सुरक्षितपणे जगतील,”
असे याहवेह जाहीर करतात.

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in