योहान 16
16
1“तुम्ही बहकविले जाऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे. 2कारण ते तुम्हाला सभागृहामधून काढून टाकतील आणि खरोखर, अशी वेळ येत आहे की, जे कोणी तुम्हाला जिवे मारतील त्यांना आपण परमेश्वराला सेवेचा यज्ञ अर्पण करीत आहोत असे वाटेल. 3ते अशा गोष्टी करतील कारण त्यांनी कधीही पित्याला किंवा मला ओळखले नाही. 4मी तुम्हाला हे सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की मी आधी तुम्हाला त्यासंबंधी इशारा दिला होता. मी या गोष्टी यापूर्वी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी प्रत्यक्ष तुम्हाबरोबर होतो, 5परंतु आता ज्यांनी मला पाठविले त्यांच्याकडे मी परत जात आहे. तरी तुम्हापैकी कोणीही, ‘आपण कुठे जाता?’ असे विचारीत नाही 6खरे सांगावयाचे तर, मी या गोष्टी सांगितल्या आहेत म्हणून तुमची हृदये दुःखाने भरून गेलेली आहेत. 7परंतु खरी गोष्ट सांगतो की, माझे जाणे हे तुमच्या हितासाठीच आहे. मी जर गेलो नाही, तर कैवारी तुमच्याकडे येणार नाही; पण मी जर गेलो तर मी त्याला तुमच्याकडे पाठवेन. 8जेव्हा तो येईल, तेव्हा पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी व न्यायनिवाड्या विषयी जग कशी चूक करत आहे हे तो सिद्ध करेल. 9पापाविषयी, कारण जगातले लोक मजवर विश्वास ठेवीत नाहीत; 10नीतिमत्त्वाविषयी, कारण मी पित्याकडे जात आहे आणि तुम्ही मला यापुढे पाहणार नाही; 11न्यायनिवाड्या विषयी, कारण या जगाच्या अधिपतीला दोषी ठरविण्यात आले आहे.
12“मला तुम्हाला बरेच काही सांगावयाचे आहे, पण आता ते तुमच्याने ग्रहण होणार नाही. 13परंतु जेव्हा तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हाला मार्गदर्शन करून पूर्ण सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे काहीही सांगणार नाही; तर त्याने जे काही ऐकले आहे, तेच तुम्हाला सांगेल. तो तुम्हाला जे काही घडणार आहे ते सांगेल. 14कारण तो माझ्यापासून आहे, म्हणून माझे गौरव करेल आणि माझ्यापासून जे त्याला मिळेल ते तो तुम्हाला प्रकट करेल. 15पित्याचे जे सर्व आहे ते माझे आहे. यासाठी मी म्हणालो की आत्मा जे माझ्याकडून स्वीकारेल ते तो तुम्हाला प्रकट करेल.”
शिष्यांच्या दुःखाचे आनंदात रूपांतर होईल
16येशू वारंवार म्हणत होते, “थोड्या वेळाने मी तुम्हाला दिसणार नाही, परंतु त्यानंतर थोड्या वेळाने तुम्ही मला पुन्हा पाहाल.”
17यावरून, त्यांचे काही शिष्य एकमेकास विचारू लागले, “मी पित्याकडे जातो म्हणून थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल याचा अर्थ काय?” 18तेव्हा ते विचारू लागले, “थोड्या वेळाने, असे जे येशू म्हणत आहेत, हे आम्हास समजत नाही.”
19त्यांना याविषयी काही विचारायचे आहे हे ओळखून येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला जे सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय की ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.’ 20मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जग आनंद करेल पण तुम्ही रडाल व शोक कराल. तुम्ही दुःख कराल परंतु तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात होईल. 21जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते. 22त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही. 23त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल. 24आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.
25“जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन. 26त्या दिवसात तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन. 27नाही, पिता स्वतःही तुमच्यावर प्रीती करतात, कारण तुम्ही मजवर प्रीती केली व मी परमेश्वरापासून आलो आहे असा विश्वास ठेवला. 28मी पित्यापासून आलो आणि या जगात प्रवेश केला आणि मी हे जग सोडून पित्याकडे परत जात आहे.”
29तेव्हा येशूंचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता तुम्ही स्पष्ट बोलत आहात, अलंकारिक भाषेत काही सांगत नाही. 30आता आम्हास कळले की, तुम्हाला सर्वगोष्टी ठाऊक आहेत, म्हणून कोणासही आपणास प्रश्न विचारण्याची गरज नाही. यावरून आपण परमेश्वरापासून आला आहात असा आम्ही विश्वास ठेवतो.”
31येशूंनी उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास ठेवता काय? 32अशी वेळ येत आहे आणि आलीच आहे की तुमची पांगापांग होईल व तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी परत जाल. तुम्ही मला एकटे सोडाल, तरीसुद्धा मी एकटा नसेन, कारण माझे पिता मजबरोबर आहेत.
33“मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे.”
S'ha seleccionat:
योहान 16: MRCV
Subratllat
Comparteix
Copia
Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.