मत्तय 11

11
येशू आणि बाप्तिस्मा करणारा योहान
1येशूंनी आपल्या बारा शिष्यांना या सूचना देण्याचे संपविल्यावर, तेथून ते गालील शहरात,#11:1 शहरात ग्रीक त्यांची शहरे उपदेश करण्यास व शिक्षण देण्यास गेले.
2जेव्हा बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता, ख्रिस्त करीत असलेल्या कामाविषयी त्याने ऐकले, आपल्या शिष्यांना पाठविले 3हे विचारावयास की, “जे यावयाचे ख्रिस्त ते आपण आहात की आम्ही दुसर्‍या कोणाची वाट पाहावी?”
4येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही जे ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा, 5आंधळ्यांना दृष्टी मिळते, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिर्‍यांना ऐकू येते, मेलेले पुन्हा जिवंत होतात आणि गरीब लोकांना शुभवार्ता सांगितली जाते. 6जो कोणी माझ्यासंबंधाने अडखळत नाही तो धन्य होय.”
7योहानाचे शिष्य निघून गेल्यावर येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय? जर नाही, 8तर मग काय पाहावयाला तुम्ही गेला होता? किमती पोशाख घातलेला एखादा पुरुष काय? नाही, भारी पोशाख घालणारे राजाच्या राजवाडयातच आहेत. 9तर मग तुम्ही काय पाहावयास गेला होता? संदेष्टा? होय, मी तुम्हाला सांगतो, संदेष्ट्यापेक्षाही अधिक.” 10हा तोच आहे ज्याच्याविषयी हे लिहिले आहे:
“ ‘मी आपला संदेशवाहक तुझ्यापुढे पाठवीन
आणि तो तुझा मार्ग तुझ्यापुढे सिद्ध करील.’#11:10 मला 3:1
11मी तुम्हाला निश्चित सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तिंमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. 12योहानाच्या काळापासून आतापर्यंत स्वर्गाचे राज्य मोठ्या शक्तीने#11:12 शक्तीने जोमाने कूच करीत आहे पसरत आहे. आणि आवेशी लोक याचे अधिकार प्राप्त करीत आहेत. 13कारण सर्व संदेष्ट्यांनी आणि नियमशास्त्रांनी योहानापर्यंत भविष्यकथन केलेले आहे. 14आणि ते मान्य करण्याची तुमची तयारी असेल तर ऐका: येणारा एलीया तो हाच आहे. 15ज्यांना कान आहेत, त्यांनी ऐकावे.
16“या पिढीच्या लोकांना मी कोणाची उपमा देऊ? बाजारात बसून इतरांना हाक मारणार्‍या लहान मुलांसारखी ही पिढी आहे:
17“ ‘आम्ही तुमच्यासाठी बासरी वाजविली
तरी तुम्ही नाचला नाही;
आम्ही शोकगीताचे स्वर वाजविले,
तरी तुम्ही रडला नाही.’
18कारण योहान काहीही न खाता किंवा पिता आला होता आणि ते म्हणतात, ‘तो दुरात्म्याने ग्रस्त आहे.’ 19मनुष्याचा पुत्र खातपीत आला आणि ते म्हणतात, ‘पाहा, हा खादाड आणि मद्यपी मनुष्य! जकातदार आणि पापी लोक यांचा मित्र!’ परंतु ज्ञान आपल्या कृत्याने खरे असे सिद्ध झाले आहे.”
पश्चात्ताप न करणार्‍या शहरांचा धिक्कार
20मग ज्या नगरांमध्ये सर्वात अधिक चमत्कार केले होते आणि तरीही त्यांनी पश्चात्ताप केला नाही, त्यांच्यावर येशूंनी टीका करण्यास सुरुवात केली. 21“खोराजिना, तुला धिक्कार असो! बेथसैदा, तुला धिक्कार असो! कारण जे चमत्कार तुमच्यामध्ये केले ते सोर आणि सीदोनात केले असते, तर त्यांनी गोणपाट नेसून आणि डोक्यात राख घालून केव्हाच पश्चात्ताप केला असता. 22पण मी तुम्हाला सांगतो की, न्यायाच्या दिवशी सोर आणि सीदोन यांना मिळणारी शिक्षा, तुम्हाला मिळणार्‍या शिक्षेपेक्षा अधिक सुसह्य असेल. 23हे कफर्णहूमा, तू, स्वर्गात घेतला जाशील काय? नाही, पण तू नरकात#11:23 नरकात अर्थात् मृतांची जागा खोलवर जाशील, कारण जी अद्भुत कृत्ये मी तुझ्यात केली ती सदोममध्ये केली असती तर सदोम आजपर्यंत अस्तित्वात असते. 24परंतु मी तुला सांगतो की न्यायाचा दिवस तुझ्यापेक्षा सदोमाला अधिक सुसह्य असेल.”
पिता पुत्रामध्ये प्रकट होतो
25त्यावेळी येशूंनी ही प्रार्थना केली, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू, स्वतःस ज्ञानी आणि सुज्ञ समजणार्‍या लोकांपासून या गोष्टी गुप्त ठेऊन, त्या तू लहान बालकांना प्रगट केल्यास म्हणून मी तुमचे आभार मानतो. 26कारण हे पित्या, असे करणेच तुम्हाला उचित वाटले.
27“माझ्या पित्याने माझ्याकडे सर्वकाही सोपविले आहे. पुत्राला पित्याशिवाय कोणी ओळखत नाही आणि पिता कोण आहे, हे पुत्रावाचून व पुत्राने ज्या कोणाला त्यांची ओळख करून देण्यासाठी निवडले असेल, त्या वाचून कोणीही पित्याला ओळखत नाही.
28“जे तुम्ही थकलेले आणि भाराक्रांत आहात, ते तुम्ही सर्वजण माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती देईन. 29माझे जू आपणावर घ्या आणि माझ्याकडून शिका; कारण मी सौम्य व लीन मनाचा आहे आणि तुमच्या आत्म्याला विसावा मिळेल. 30कारण माझे जू हलके व माझे ओझे सहज पेलवणारे आहे.”

S'ha seleccionat:

मत्तय 11: MRCV

Subratllat

Comparteix

Copia

None

Vols que els teus subratllats es desin a tots els teus dispositius? Registra't o inicia sessió