Logo YouVersion
Ikona vyhledávání

मत्तय 3

3
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचा संदेश
1त्या वेळी बाप्तिस्मा देणारा योहान यहुदियाच्या रानात येऊन अशी घोषणा करूलागला, 2“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.” 3त्याच्याविषयी यशया संदेष्ट्याद्वारे सांगण्यात आले होते:
अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी:
‘प्रभूचा मार्ग तयार करा,
त्याच्या वाटा नीट करा.’
4योहान उंटाच्या केसांचे वस्त्र परिधान करत असे. त्याच्या कमरेला कातड्याचा कमरबंद असे आणि टोळ व रानमध हे त्याचे अन्न होते. 5यरुशलेम, सर्व यहुदिया व यार्देन नदीच्या आसपासच्या परिसरातील लोक योहानकडे येऊलागले होते. 6त्यांनी स्वतःची पापे कबूल करून त्याच्याकडून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.
7परुशी व सदूकी ह्यांच्यापैकी अनेकांना बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने म्हटले, “अहो सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून दूर पळायला तुम्हांला कोणी सावध केले? 8पश्‍चात्तापाला अनुरूप असे वर्तन करा. 9‘अब्राहाम आमचा पूर्वज आहे’, असे म्हणून तुम्हांला स्वतःचे समर्थन करता येईल, असे समजू नका. मी तुम्हांला सांगतो, देव ह्या दगडांपासून अब्राहामसाठी मुले निर्माण करण्यास समर्थ आहे. 10आताच तर झाडाच्या मुळावर कुऱ्हाड रोवलेली आहे. जे चांगले फळ देत नाही, असे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकले जाईल. 11तुम्ही पश्चात्ताप केला, हे दर्शवण्यासाठी मी तुम्हांला पाण्याने बाप्तिस्मा देतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे, तो माझ्यापेक्षा अधिक समर्थ आहे. त्याची पादत्राणे उचलायचीदेखील माझी पात्रता नाही. तो तुम्हांला पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा देईल. 12त्याच्या हातात त्याचे सूप आहे. त्याने तो त्याच्या खळ्यातील धान्य पाखडून गहू कोठारात साठवील पण भूस मात्र कधीही न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील.”
येशूचा बाप्तिस्मा
13तेव्हा योहानकडून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलहून यार्देन नदीवर आला. 14परंतु योहान त्याला नकार देत म्हणाला, “आपणाकडून मी बाप्तिस्मा घ्यावा, असे असता आपण माझ्याकडे येता?”
15येशूने त्याला उत्तर दिले, “आता हे होऊ दे, कारण अशा प्रकारे सर्व धर्माचरण पूर्ण करणे उचित आहे.” तेव्हा येशूने त्याला तसे करू दिले.
16बाप्तिस्मा घेतल्यावर लगेच येशू पाण्यातून वर येत असताना, पाहा, स्वर्ग उघडला आणि त्याला दिसले की, परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा त्याच्यावर उतरत आहे 17आणि काय आश्चर्य! आकाशातून अशी वाणी झाली, “हा माझा परमप्रिय पुत्र आहे, त्याच्यावर मी प्रसन्न आहे.”

Zvýraznění

Sdílet

Kopírovat

None

Chceš mít své zvýrazněné verše uložené na všech zařízeních? Zaregistruj se nebo se přihlas