योहान 10

10
उत्तम मेंढपाळ व त्याची मेंढरे
1“परूश्यांनो मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जो कोणी मेंढवाड्यात दारातून आत प्रवेश करत नाही आणि दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू असला पाहिजे. 2जो दाराने आत जातो तो मेंढरांचा मेंढपाळ आहे. 3दारावरचा पहारेकरी त्याच्यासाठी दार उघडतो आणि मेंढरे त्यांची वाणी ओळखतात. तो आपल्या मेंढरांना त्यांच्या नावाने हाक मारतो व त्यांना बाहेर घेऊन जातो. 4आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर, तो त्यांच्यापुढे चालतो व मेंढरे त्याला अनुसरतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. 5ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत; उलट ती त्याच्यापासून दूर पळून जातील, कारण ती त्या परक्याची वाणी ओळखीत नाहीत.” 6येशू हे अलंकारिकरित्या बोलले, परंतु परूश्यांना ते समजले नाही.
7यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे. 8जे सर्व माझ्यापूर्वी आले होते ते सर्व चोर व लुटारू होते, मेंढरांनी त्यांचे ऐकले नाही. 9मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल.#10:9 किंवा सुरक्षित ठेवले जातील ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील. 10चोर केवळ चोरी, घात आणि नाश करण्यास येतो; मी त्यांना जीवन मिळावे व ते विपुलपणे मिळावे म्हणून आलो आहे.
11“मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो. 12परंतु भाडेकरू, जो मेंढपाळ नाही, तो लांडगा येताना पाहतो व मेंढरे तशीच सोडून पळून जातो, मग तो लांडगा त्या कळपावर हल्ला करतो आणि त्यांची पांगापांग होते. 13तो मनुष्य पळून जातो कारण तो भाडेकरू असतो आणि त्याला मेंढरांची काहीच काळजी नसते.
14“मी उत्तम मेंढपाळ आहे; मला माझी मेंढरे माहीत आहेत व माझ्या मेंढरांना मी माहीत आहे 15तसेच माझे पिता मला ओळखतात आणि मी पित्याला ओळखतो आणि मी माझ्या मेंढरांसाठी माझा जीव देतो. 16माझी आणखी काही मेंढरे आहेत, पण ती या मेंढवाड्यातील नाहीत. त्यांनासुद्धा मी माझ्या मेंढवाड्यात आणलेच पाहिजे. ते सुद्धा माझी वाणी ऐकतील आणि मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. 17पिता मजवर प्रीती करतात, याचे कारण हे आहे की, मी आपला जीव देतो, तो केवळ परत घेण्याकरिता देतो; 18तो कोणी मजपासून घेत नाही, तर मी स्वतः होऊनच तो अर्पण करतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.”
19यहूद्यांनी या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्यांच्यात पुन्हा मतभेद उत्पन्न झाले. 20त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, “तो एकतर भूतग्रस्त अथवा वेडा तरी असावा. अशा माणसाचे तुम्ही का ऐकता?”
21तर इतर म्हणाले, “ही वचने ज्याला भूत लागलेले आहे त्या माणसाची नाहीत. भुताला आंधळ्यांचे डोळे उघडता येतील काय?”
येशूंच्या दाव्यावरून अधिक वाद
22ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा#10:22 किंवा हनूकाह सण होता. 23आणि येशू मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या शलोमोनच्या अंगणामध्ये फिरत होते. 24यहूदी पुढार्‍यांनी त्यांच्याभोवती गराडा घालून विचारले, “तू आम्हाला अजून किती वेळ संशयात ठेवणार आहेस? तू जर ख्रिस्त असशील, तर तसे आम्हाला स्पष्टपणे सांगून टाक.”
25येशूंनी उत्तर दिले, “मी तुम्हाला सांगितले पण तुम्ही विश्वास ठेवीत नाही. माझ्या पित्याच्या नावाने मी जे कार्य करतो ते माझ्याविषयी साक्ष देतात, 26परंतु तुम्ही मजवर विश्वास ठेवीत नाही, कारण तुम्ही माझी मेंढरे नाहीत. 27माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात; मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 28मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो आणि त्यांचा कधीही नाश होणार नाही; कोणीही त्यांना माझ्या हातातून हिरावून घेणार नाही. 29ज्या माझ्या पित्याने ती मला दिली आहेत तो सर्वश्रेष्ठ आहे;#10:29 पूर्वीच्या प्रतींमध्ये जे काही माझ्या पित्याने मला दिले आहे ते सर्वात महान आहे. कोणीही त्यांना माझ्या पित्याच्या हातातून हिसकून घेऊ शकत नाही. 30मी आणि माझे पिता एक आहोत.”
31तेव्हा यहूदी विरोधकांनी त्यांना दगडमार करण्यासाठी पुन्हा दगड उचलले, 32परंतु येशू त्यांना म्हणाले, “मी पित्याद्वारे अनेक चांगली कामे केली आहेत. माझ्या कोणत्या कामामुळे तुम्ही मला दगडमार करीत आहात?”
33ते म्हणाले, “कोणत्याही चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुला दगडमार करीत नाही, तर दुर्भाषण केल्याबद्दल. तू एक सामान्य मानव असूनही, स्वतःला परमेश्वर म्हणवितोस म्हणून आम्ही तुला दगडमार करीत आहोत.”
34त्यावर येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही ‘दैवते’#10:34 स्तोत्र 82:6 आहात असे मी म्हणालो, हे तुमच्या नियमात लिहिले नाही काय? 35ज्यास परमेश्वराचे वचन प्राप्त झाले त्यास त्याने ‘दैवते’ म्हटले तर शास्त्रलेखाचा भंग होत नाही 36तर ज्याला पित्याने स्वतः वेगळे करून जगात पाठविले, तो जर म्हणतो की, ‘मी परमेश्वराचा पुत्र आहे,’ तर त्या विधानाला तुम्ही दुर्भाषण, असे कसे म्हणता? 37मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास, माझ्यावर विश्वास ठेऊ नका; 38तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवीत नाही, तर मी करत असलेल्या कृत्यांवर तरी विश्वास ठेवा. म्हणजे तुमची खात्री होईल की पिता मजमध्ये आहे व मी पित्यामध्ये आहे.” 39त्यांना अटक करण्याचा त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या हातातून निसटून गेले.
40मग येशू यार्देन नदीच्या पलीकडे जिथे योहान आरंभीच्या दिवसात बाप्तिस्मा करीत असे, त्या ठिकाणी जाऊन राहिले. 41आणि त्यांच्याकडे अनेक लोक आले. ते आपसात म्हणू लागले, “योहानाने काही चिन्ह केले नाही, तरी येशूंबद्दल त्याने जे काही सांगितले ते सर्व खरे ठरले आहे.” 42तेव्हा त्या ठिकाणी अनेक लोकांनी येशूंवर विश्वास ठेवला.

Valgt i Øjeblikket:

योहान 10: MRCV

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind

Video til योहान 10