योहान 19
19
यहुदी लोकांचा दबाव
1नंतर पिलातने येशूला नेले आणि फटके मारवले. 2शिपायांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यावर ठेवला व त्याला जांभळा झगा घातला. 3ते त्याच्याजवळ आले आणि म्हणाले, “यहुदी लोकांचा राजा चिरायू होवो!” मग त्यांनी त्याला चपराका मारल्या.
4पिलातने पुन्हा बाहेर जाऊन लोकांना म्हटले, “पाहा, मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही, हे तुम्हांला कळावे म्हणून मी त्याला तुमच्यासमोर बाहेर आणतो.” 5काट्यांचा मुकुट व जांभळा झगा घातलेला येशू बाहेर आला, पिलात त्यांना म्हणाला, “पाहा, हा मनुष्य!”
6मुख्य याजक व मंदिराचे रक्षक त्याला पाहून ओरडून म्हणाले, “ह्याला क्रुसावर खिळा, क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्याला नेऊन क्रुसावर खिळा कारण मला तो अपराधी वाटत नाही.”
7यहुदी लोकांनी त्याला उत्तर दिले, “आमच्या कायद्यानुसार ह्याला मृत्युदंडाची शिक्षा व्हायला हवी, कारण ह्याने स्वतः देवाचा पुत्र असल्याचा दावा केला आहे.”
8हे बोलणे ऐकून पिलात अधिकच घाबरला. 9पुन्हा सरकारवाड्यात जाऊन त्याने येशूला विचारले, “तू कुठला आहेस?” परंतु येशूने त्याला उत्तर दिले नाही. 10पिलातने त्याला म्हटले, “माझ्याबरोबर तू बोलत नाहीस काय? तुला सोडण्याचा अधिकार मला आहे व तुला क्रुसावर खिळण्याचा अधिकार मला आहे, हे तुला ठाऊक नाही काय?”
11येशूने उत्तर दिले, “तुम्हांला वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्याने मला तुमच्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक मोठे आहे.”
12पिलातने हे ऐकले, तेव्हा तो येशूला सोडवण्याची खटपट करत राहिला. परंतु लोकसमुदाय आरडाओरड करून म्हणाला, “आपण ह्याला सोडले, तर आपण कैसरचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसरला विरोध करतो!”
13हे शब्द ऐकून पिलातने येशूला बाहेर आणले आणि फरसबंदी नावाच्या जागी तो न्यायासनावर बसला. हिब्रू भाषेत ह्या जागेला गब्बाथा म्हणतात. 14तो ओलांडण सणाच्या तयारीचा दिवस होता व दुपारची वेळ झाली होती. पिलात लोकांना म्हणाला, “पाहा, तुमचा राजा!”
15ते ओरडले, “त्याला ठार करा, ठार करा, त्याला क्रुसावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला क्रुसावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “कैसरवाचून आमचा कोणी राजा नाही!”
16त्यानंतर पिलातने येशूला क्रुसावर खिळण्याकरता त्यांच्या स्वाधीन केले.
येशूला क्रुसावर खिळतात
17त्यांनी येशूला ताब्यात घेतले. तो त्याचा क्रूस स्वतः वाहत कवटीचे स्थान म्हटलेल्या जागी गेला. त्या जागेला हिब्रू भाषेत गोलगोथा म्हणतात. 18तेथे त्यांनी त्याला व त्याच्याबरोबर दुसऱ्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये, असे क्रुसावर खिळले. 19‘नासरेथकर येशू, यहुदी लोकांचा राजा’, असे एका पाटीवर लिहून ती पिलातने क्रुसावर लावली. 20येशूला क्रुसावर खिळले ते स्थळ शहराच्या जवळ होते म्हणून पुष्कळ यहुदी लोकांनी ती पाटी वाचली. ती हिब्रू, लॅटिन व ग्रीक ह्या भाषांत लिहिली होती. 21मुख्य याजक पिलातला म्हणाले, “‘यहुदी लोकांचा राजा’ असे लिहू नका, तर ‘मी यहुदी लोकांचा राजा आहे, असे त्याने म्हटले’, असे लिहा.”
22पिलातने उत्तर दिले, “मी जे लिहिले, ते लिहिले.”
23शिपायांनी येशूला क्रुसावर टांगल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि प्रत्येक शिपायाला एक वाटा असे चार वाटे केले. त्यांनी झगाही घेतला. त्या झग्याला शिवण नव्हती. तो वरपासून खालपर्यंत अखंड विणलेला होता. 24म्हणून ते एकमेकांना म्हणाले, “हा आपण फाडू नये तर कोणाला मिळेल ते चिठ्ठ्या टाकून पाहावे.” हे ह्यासाठी झाले की, ‘त्यांनी माझे कपडे आपसात वाटून घेतले आणि माझ्या झग्यावर चिठ्या टाकल्या’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा. त्याप्रमाणे शिपायांनी केले.
25येशूच्या क्रुसाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया मग्दालिया ह्या उभ्या होत्या. 26येशूने त्याच्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा!”
27नंतर त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्यानंतर त्या शिष्याने तिला आपल्या घरी नेले.
28ह्यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे, हे जाणून धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूने म्हटले, ‘मला तहान लागली आहे’.
29तेथे आंब भरून ठेवलेले एक भांडे होते, म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झुडपाच्या फांदीवर ठेवून त्याच्या तोंडाला लावला. 30आंब घेतल्यानंतर येशूने म्हटले, “पूर्ण झाले आहे” आणि मस्तक लववून त्याने प्राण सोडला.
येशूच्या कुशीत भाला
31तो साबाथच्या तयारीचा दिवस होता, साबाथ दिवशी शरीरे क्रुसावर राहू नयेत, कारण तो साबाथ महापवित्र दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावेत आणि त्यांना घेऊन जावे, अशी यहुद्यांनी पिलातला विनंती केली.
32म्हणून शिपायांनी येऊन येशूबरोबर क्रुसावर चढवलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले, 33परंतु येशूजवळ आल्यावर तो आधीच मरण पावला आहे, असे पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. 34तरी पण शिपायांतील एकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला. लगेच रक्त व पाणी बाहेर निघाले. 35तुम्हीही विश्वास ठेवावा म्हणून ज्याने हे पाहिले, त्याने साक्ष दिली आहे. त्याची साक्ष खरी आहे व आपण खरे बोलतो, हे त्याला ठाऊक आहे. 36‘त्याचे हाड मोडले जाणार नाही’, हा धर्मशास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून ह्या गोष्टी घडल्या. 37शिवाय दुसऱ्याही धर्मशास्त्रलेखात असे म्हटले आहे, ‘ज्याला त्यांनी भोसकले त्याच्याकडे ते पाहतील.’
येशूची उत्तरक्रिया
38त्यानंतर अरिमथाईकर योसेफ ह्याने पिलातला अशी विनंती केली की, त्याला येशूचे शरीर नेऊ द्यावे. यहुदी लोकांच्या भयामुळे तो येशूचा गुप्त शिष्य होता. पिलातने परवानगी दिल्यानंतर तो येशूचे शरीर घेऊन गेला. 39येशूकडे पूर्वी एका रात्री आलेला निकदेमही गंधरस व अगरू ह्यांचे सुमारे तीस किलो मिश्रण घेऊन तेथे आला. 40त्या दोघांनी येशूचे शरीर घेऊन त्याला यहुदी लोकांच्या उत्तरकार्याच्या रीतीप्रमाणे सुगंधी द्रव्ये लावली व ते कापडात गुंडाळले. 41येशूला क्रुसावर खिळले होते, त्या ठिकाणी एक बाग होती. तिच्यात एक नवी कबर होती, तिच्यामध्ये त्या वेळेपर्यंत कोणालाही ठेवलेले नव्हते. 42तो यहुदी लोकांच्या साबाथच्या तयारीचा दिवस असल्यामुळे त्यांनी येशूला तेथे ठेवले कारण ती कबर जवळ होती.
Zur Zeit ausgewählt:
योहान 19: MACLBSI
Markierung
Teilen
Kopieren
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fde.png&w=128&q=75)
Möchtest du deine gespeicherten Markierungen auf allen deinen Geräten sehen? Erstelle ein kostenloses Konto oder melde dich an.
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.