योहान 15
15
द्राक्षवेल आणि डाहळ्या
1“मी खरी द्राक्षवेल आहे आणि माझे पिता माळी आहेत. 2माझ्यातील प्रत्येक फांदी जी फळ देत नाही ती ते छाटून टाकतात आणि फळ न देणार्या प्रत्येक फांदीला अधिक फळ यावे म्हणून ते तिची छाटणी#15:2 किंवा स्वच्छ करतो करतात. 3जे वचन मी तुम्हाला सांगितले आहे त्यामुळे तुम्ही आधी शुद्ध झालाच आहात. 4म्हणून मजमध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहीन. कोणतीही फांदी स्वतःहून फळ देऊ शकत नाही; तिला वेलीमध्येच राहणे भाग आहे. तसेच माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाही फळ देता येणे शक्य नाही.
5“मी द्राक्षवेल आहे; तुम्ही फांद्या आहात. जर तुम्ही मजमध्ये राहाल व मी तुम्हामध्ये, तर तुम्ही मुबलक फळ द्याल; कारण माझ्यापासून वेगळे राहून तुम्हालाही काही करता येणार नाही. 6जर तुम्ही माझ्यामध्ये राहत नाही, तर त्या फांदीसारखे आहात जी फेकून देतात व ती वाळते; अशा सर्व फांद्या गोळा करून अग्नीत टाकून जाळतात. 7परंतु तुम्ही माझ्यामध्ये राहिलात आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली, तर जी काही तुमची इच्छा असेल ते मागा आणि ते तुम्हासाठी करण्यात येईल. 8तुम्ही मुबलक फळ देता तेव्हा हे दाखविता की तुम्ही माझे शिष्य आहात, हे माझ्या पित्याच्या गौरवासाठी आहे.
9“जशी पित्याने मजवर प्रीती केली, तशीच मीही तुमच्यावर प्रीती केली आहे. आता तुम्ही माझ्या प्रीतीत राहा. 10जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्यांच्या प्रीतीत राहतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, तर माझ्या प्रीतीत राहाल. 11मी तुम्हाला हे सर्व सांगितले आहे कारण माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद पूर्ण व्हावा. 12माझी आज्ञा ही आहे: मी तुम्हावर प्रीती केली, तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. 13आपल्या मित्रासाठी स्वतःचे प्राण अर्पण करावे, यापेक्षा कोणतीही प्रीती मोठी नाही. 14तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही माझे मित्र आहात. 15मी यापुढे तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धन्याचे व्यवहार दासाला माहीत नसतात; त्याऐवजी, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून शिकून घेतले आहे, ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे. 16तुम्ही मला निवडले नाही, पण मी तुम्हाला निवडले व तुमची नेमणूक केली. ती यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे व तुमचे फळ टिकावे—म्हणजे तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्यांनी तुम्हाला द्यावे. 17ही माझी आज्ञा आहे: तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी.
जग शिष्यांचा द्वेष करते
18“जर जगाने तुमचा द्वेष केला, तर हे लक्षात ठेवा की त्यांनी प्रथम माझाही द्वेष केला आहे. 19जर तुम्ही जगाचे असता, तर स्वतःवर करावी अशी त्यांनी तुमच्यावर प्रीती केली असती. परंतु तुम्ही जगाचे नाही, या जगातून मी तुमची निवड केली आहे. त्या कारणाने जग तुमचा द्वेष करते. 20मी तुम्हाला जे सांगितले याची आठवण ठेवा: ‘दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही.’#15:20 योहा 13:16 जर त्यांनी माझा छळ केला, तर ते तुमचाही छळ करतील. त्यांनी माझी वचने पाळली, तर ते तुमची ही पाळतील! 21माझ्या नावामुळे ते तुमच्याशी असे वागतील, कारण ज्यांनी मला पाठविले त्यांना ते ओळखीत नाहीत. 22मी आलो नसतो व त्यांच्याशी बोललो नसतो, तर त्यांच्यावर पापाचा दोष नसता; परंतु आता त्यांना त्यांच्या पापासाठी काहीही सबब सांगता येणार नाही. 23जो कोणी माझा द्वेष करतो, तो माझ्या पित्याचाही द्वेष करतो. 24जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे. 25‘विनाकारण त्यांनी माझा द्वेष केला,’#15:25 स्तोत्र 35:19; 69:4 असे त्यांच्या नियमात जे म्हटले आहे, ते पूर्ण झाले आहे.
पवित्र आत्म्याचे कार्य
26“जेव्हा कैवारी येईल, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवेन, तो सत्याचा आत्मा जो पित्याकडून येतो—तो माझ्याविषयी साक्ष देईल. 27परंतु तुम्हीदेखील साक्ष दिलीच पाहिजे, कारण आरंभापासून तुम्ही मजबरोबर राहिला आहात.
Επιλέχθηκαν προς το παρόν:
योहान 15: MRCV
Επισημάνσεις
Κοινοποίηση
Αντιγραφή
![None](/_next/image?url=https%3A%2F%2Fimageproxy.youversionapistaging.com%2F58%2Fhttps%3A%2F%2Fweb-assets.youversion.com%2Fapp-icons%2Fel.png&w=128&q=75)
Θέλετε να αποθηκεύονται οι επισημάνσεις σας σε όλες τις συσκευές σας; Εγγραφείτε ή συνδεθείτε
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.