लूक 21
21
विधवेचे दोन पैसे
1मग त्याने दृष्टी वर करून धनवानांना आपली दाने मंदिराच्या भांडारात टाकताना पाहिले.
2त्याने एका दरिद्री विधवेलाही तेथे दोन टोल्या टाकताना पाहिले.
3तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, ह्या दरिद्री विधवेने सर्वांपेक्षा अधिक टाकले आहे.
4कारण त्या सर्वांनी आपल्या समृद्धीतून [देवाच्या] दानात टाकले; हिने तर आपल्या कमताईतून आपली सर्व उपजीविका टाकली आहे.”
यरुशलेमेचा विध्वंस व युगाची समाप्ती ह्यांविषयी येशूचे भविष्य
5मंदिर उत्तम पाषाणांनी व अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी कित्येक जण बोलत असता त्याने म्हटले,
6“असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहात त्यांतला पाडला जाणार नाही असा चिर्यावर चिरा राहणार नाही.”
7तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरूजी, ह्या गोष्टी केव्हा घडून येतील? आणि ज्या काळात ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय?”
8तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा; कारण माझ्या नावाने पुष्कळ लोक येऊन ‘मीच तो आहे’ आणि ‘तो काळ जवळ आला आहे,’ असे म्हणतील; त्यांच्या नादी लागू नका.
9आणि जेव्हा तुम्ही लढाया व दंगे ह्यांविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका; कारण ह्या गोष्टी प्रथम ‘होणे अवश्य आहे’, तरी एवढ्यात शेवट होणार नाही.”
10मग त्याने त्यांना म्हटले, “‘राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल;
11मोठमोठे भूमिकंप होतील, जागोजाग मर्या येतील व दुष्काळ पडतील, आणि भयंकर उत्पात होतील व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील.
12परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील व तुमचा छळ करतील; तुम्हांला सभास्थाने व तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील, आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नावासाठी नेतील.
13ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल.
14तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा;
15कारण मी तुम्हांला अशी वाचा व बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत.
16आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हेदेखील तुम्हांला धरून देतील; आणि तुमच्यातील कित्येकांना जिवे मारतील,
17आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील;
18तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही.
19तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवाल.
20परंतु यरुशलेमेस सैन्याचा वेढा पडत आहे असे पाहाल तेव्हा ती ओसाड पडण्याची वेळ जवळ आली आहे असे समजा.
21त्या वेळेस जे यहूदीयात असतील त्यांनी डोंगरात पळून जावे, जे यरुशलेमेत असतील त्यांनी बाहेर निघून जावे व जे तिच्या शिवारात असतील त्यांनी आत येऊ नये.
22कारण शास्त्रलेखांतल्या सर्व गोष्टी पूर्ण होण्यासाठी हे ‘सूड घेण्याचे दिवस’ आहेत.
23त्या दिवसांत ज्या गरोदर व अंगावर पाजणार्या स्त्रिया असतील त्यांची केवढी दुर्दशा होणार! कारण देशावर मोठे संकट येईल व ह्या लोकांवर कोप होईल.
24ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’
25तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;
26भयाने व जगावर कोसळणार्या अरिष्टांची धास्ती घेतल्यामुळे माणसे मरणोन्मुख होतील; कारण ‘आकाशातील बळे डळमळतील.’
27आणि तेव्हा ‘मनुष्याचा पुत्र’ पराक्रमाने व मोठ्या वैभवाने ‘मेघात येताना’ लोकांच्या दृष्टीस पडेल.
28ह्या गोष्टींना आरंभ होऊ लागेल तेव्हा सरळ उभे राहा आणि आपली डोकी वर करा; कारण तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.”
जागृतीची आवश्यकता
29त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर सर्व झाडे पाहा;
30त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हीच ओळखता की, आता उन्हाळा जवळ आला आहे.
31तसेच ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की, देवाचे राज्य जवळ आले आहे.
32मी तुम्हांला खचीत सांगतो की, सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही.
33आकाश व पृथ्वी नाहीशी होतील; परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाहीत.
34तुम्ही सांभाळा, नाहीतर कदाचित अधाशीपणा, दारूबाजी व संसाराच्या चिंता ह्यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊन तो दिवस तुमच्यावर ‘पाशाप्रमाणे’ अकस्मात येईल;
35कारण तो अवघ्या ‘पृथ्वीच्या’ पाठीवर ‘राहणार्या’ सर्व ‘लोकांवर’ त्याप्रमाणे येईल.
36तुम्ही तर होणार्या ह्या सर्व गोष्टी चुकवण्यास व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.”
37तो दिवसा मंदिरात शिक्षण देत असे आणि रात्री बाहेर जाऊन ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्यावर राहत असे.
38सर्व लोक त्याचे ऐकण्यास मोठ्या पहाटेस त्याच्याकडे मंदिरात येत असत.
Actualmente seleccionado:
लूक 21: MARVBSI
Destacar
Compartir
Copiar
¿Quieres guardar tus resaltados en todos tus dispositivos? Regístrate o Inicia sesión
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.