उत्पत्ती 4
4
काईन आणि हाबेल
1मग आदामाने आपली पत्नी हव्वा हिच्याशी प्रीती संबंध केला, तेव्हा ती गर्भवती झाली आणि तिने काईन#4:1 काईन अर्थात् प्राप्त केलेले नावाच्या मुलाला जन्म दिला. ती म्हणाली, “याहवेहच्या साहाय्याने मी एका पुरुषाला प्राप्त केले आहे.” 2नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला.
हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता. 3हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले. 4हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले, 5पण काईनाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले नाही, म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला.
6याहवेहने काईनला विचारले, “तू का संतापलास? तुझ्या चेहर्यावर निराशा का दिसते? 7तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”
8एके दिवशी काईन आपला भाऊ हाबेलास म्हणाला, “चल, आपण शेतात जाऊ.” त्याप्रमाणे शेतात गेल्यावर काईनाने आपल्या भावावर हल्ला करून त्याचा वध केला.
9मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?”
“मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”
10याहवेह त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आता ऐक, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारीत आहे. 11ज्या भूमीने तुझ्या भावाचे रक्त स्वीकारण्यास आपले मुख उघडले आहे, त्या भूमीतून तुला हद्दपार करण्यात आले आहे आणि तू शापित आहेस. 12त्या भूमीवर तू कष्ट केलेस तरी ती तुला उपज देणार नाही. तू बेचैन असा पृथ्वीवर भटकशील.”
13काईन याहवेहला म्हणाला, “मला मिळालेली शिक्षा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. 14कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.”
15यावर याहवेहने त्याला उत्तर दिले, “असे होणार नाही, जर कोणी काईनाचा जीव घेईल, तर त्याला मी तुला दिलेल्या शिक्षेपेक्षा सातपट शिक्षा देईन” आणि मग त्याचा वध कोणीही करू नये, असा इशारा देणारी एक खूण याहवेहने काईनावर केली. 16मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद#4:16 म्हणजे भटकंती नावाच्या देशात वस्ती करून राहिला.
17पुढे काईनाने त्याच्या पत्नीशी वैवाहिक प्रीती संबंधात प्रवेश केला आणि ती गर्भवती झाली. तिने हनोख नावाच्या पुत्राला जन्म दिला. त्यावेळी काईन एक नगर बांधत होता, त्याने आपल्या पुत्राचे, हनोख हे नाव त्या नगराला दिले. 18हनोखपासून ईराद झाला आणि ईराद हा महूयाएलचा पिता, महूयाएल हा मथुशाएलचा पिता, मथुशाएल हा लामेखाचा पिता होता.
19लामेखाने आदाह व सिल्ला या दोन स्त्रियांशी लग्न केले. 20आदाह हिला याबाल नावाचा पुत्र झाला. तो गुरे पाळणार्या व तंबू ठोकून राहणार्या लोकांचा मूळ पुरुष झाला. 21त्याच्या भावाचे नाव युबाल असे होते. तो पहिला संगीतकार असून वीणा व बासरी ही वाद्ये वाजविणार्यांचा मूळ पुरुष झाला. 22लामेखाची दुसरी स्त्री सिल्ला हिला तुबल-काईन झाला. तो कास्य व लोखंड यांची हत्यारे बनविणार्यांचा मूळ पुरुष झाला. तुबल—काईनास नामाह नावाची बहीण होती.
23एके दिवशी लामेख आपल्या पत्नींना म्हणाला,
आदाह व सिल्ला माझे ऐका,
“लामेखाच्या पत्नींनो, माझे बोलणे ऐका.
एका तरुणाने माझ्यावर हल्ला करून मला जखमी केले.
पण त्या तरुणाला मी ठार मारले आहे.
24जर काईनाबद्दल सातपट
तर लामेखाबद्दल सत्याहत्तरपट सूड घेतला जाईल.”
25आदामाने हव्वेशी पुन्हा प्रीती संबंध केला आणि हव्वेने पुत्राला जन्म दिला. तिने त्याचे नाव शेथ#4:25 शेथ म्हणजे बक्षीस दिलेला असे ठेवले, कारण ती म्हणाली, “काईनाने ठार केलेल्या हाबेल या माझ्या पुत्राच्या जागी परमेश्वराने मला दुसरा पुत्र दिला आहे.” 26शेथ मोठा झाल्यावर त्यालाही एक पुत्र झाला, त्याचे नाव अनोश असे ठेवले.
त्याच्या हयातीत लोकांनी याहवेहच्या नावाने आराधना करण्यास प्रारंभ केला.
Actualmente seleccionado:
उत्पत्ती 4: OMRCV
Destacar
Compartir
Copiar
¿Quieres guardar tus resaltados en todos tus dispositivos? Regístrate o Inicia sesión
Biblica® मराठी समकालीन स्वतंत्र संस्करण™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc.
Biblica® Open Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2022, 2024 by Biblica, Inc.