योहान 14

14
पित्याकडे जाण्याचा मार्ग
1“तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ नये; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा.
2माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत; नसत्या तर मी तुम्हांला तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो.
3आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हांला आपल्याजवळ घेईन; ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
4मी जातो तिकडचा मार्ग तुम्हांला ठाऊक आहे.”
5थोमा त्याला म्हणाला, “प्रभूजी, आपण कोठे जाता हे आम्हांला ठाऊक नाही; मग मार्ग आम्हांला कसा ठाऊक असणार?”
6येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य व जीवन मीच आहे; माझ्या द्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
7मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते; आतापासून तुम्ही त्याला ओळखता व तुम्ही त्याला पाहिलेही आहे.”
8फिलिप्प त्याला म्हणाला, “प्रभूजी, आम्हांला पिता दाखवा म्हणजे आम्हांला पुरे आहे.”
9येशूने त्याला म्हटले : “फिलिप्पा, मी इतका काळ तुमच्याजवळ असूनही तू मला ओळखत नाहीस काय? ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे; तर ‘आम्हांला पिता दाखवा’ असे तू कसे म्हणतोस?
10मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे असा विश्वास तू धरत नाहीस काय? ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगतो त्या मी आपल्या मनाच्या सांगत नाही; माझ्यामध्ये राहणारा पिता स्वतःची कार्ये करतो.
11मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे हे माझे तुम्ही खरे माना; नाहीतर माझ्या कृत्यांमुळे तरी माझे खरे माना.
12मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मी जी कृत्ये करतो, ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील, आणि त्यांपेक्षा मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.
13पुत्राच्या ठायी पित्याचा गौरव व्हावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
14तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.
पवित्र आत्मा मिळण्याबद्दल वचन
15माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
16मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हांला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल; अशासाठी की, त्याने तुमच्याबरोबर सदासर्वदा राहावे.
17जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही; तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्याबरोबर राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करील.
18मी तुम्हांला अनाथ असे सोडणार नाही, मी तुमच्याकडे येईन.
19आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही; पण तुम्ही पाहाल; मी जिवंत आहे म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.
20त्या दिवशी तुम्हांला समजेल की, मी आपल्या पित्यामध्ये आहे, व तुम्ही माझ्यामध्ये व मी तुमच्यामध्ये आहे.
21ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वत: त्याला प्रकट होईन.”
22यहूदा (इस्कर्योत नव्हे) त्याला म्हणाला, “प्रभूजी, असे काय झाले की आपण स्वत: आम्हांला प्रकट व्हाल आणि जगाला प्रकट होणार नाही?”
23येशूने त्याला उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर वस्ती करू.
24ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळत नाही; जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठवले त्याचे आहे.
25मी तुमच्याजवळ राहत असताना तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
26तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.
27मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.
28‘मी जातो आणि तुमच्याकडे येईन,’ असे जे मी तुम्हांला सांगितले ते तुम्ही ऐकले आहे. माझ्यावर तुमची प्रीती असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हांला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.
29ते होईल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा, म्हणून ते होण्यापूर्वी आता मी तुम्हांला सांगितले आहे.
30ह्यापुढे मी तुमच्याबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही;
31परंतु मी पित्यावर प्रीती करतो आणि पित्याने जशी मला आज्ञा दिली तसे करतो, हे जगाने ओळखावे म्हणून असे होते. उठा, आपण येथून जाऊ.

Tällä hetkellä valittuna:

योहान 14: MARVBSI

Korostus

Jaa

Kopioi

None

Haluatko, että korostuksesi tallennetaan kaikille laitteillesi? Rekisteröidy tai kirjaudu sisään

Video योहान 14