लूक 6
6
शब्बाथाचे पालन
1मग एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातांवर चोळून खाऊ लागले.
2तेव्हा परूश्यांतील कोणी म्हणाले, “शब्बाथ दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता?”
3येशूने त्यांना उत्तर दिले, “दावीद व त्याच्याबरोबरची माणसे ह्यांना भूक लागली तेव्हा त्यांनी काय केले,
4तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि ज्या ‘समर्पित भाकरी’ याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या घेऊन त्याने कशा खाल्ल्या व आपल्याबरोबरच्यांनाही कशा दिल्या, हे तुम्ही कधी वाचले नाही काय?”
5आणखी तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र शब्बाथाचा प्रभू आहे.”
6नंतर दुसर्या एका शब्बाथ दिवशी असे झाले की, तो सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला असा एक माणूस होता.
7तेव्हा शास्त्री व परूशी त्याच्यावर दोष ठेवण्यास सापडावा म्हणून तो शब्बाथ दिवशी रोग बरा करतो की काय हे पाहण्यास टपून राहिले.
8परंतु त्याने त्यांचे विचार ओळखून त्या हात वाळलेल्या माणसाला सांगितले, “ऊठ व मध्ये उभा राहा.” मग तो उठून उभा राहिला.
9तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला विचारतो, शब्बाथ दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य, जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य?”
10मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्याला सांगितले, “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात दुसर्या हातासारखाच पूर्ण बरा झाला.
11मग त्यांचे डोके फिरले व येशूचे काय करावे ह्याविषयी ते आपसांत विचार करू लागले.
बारा प्रेषित
12त्या दिवसांत असे झाले की, एकदा तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला.
13मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांना बोलावले, आणि त्यांच्यातून पुढील बारा जणांना निवडून त्यांना ‘प्रेषित’ असे नावही दिले.
14शिमोन (ह्याला त्याने पेत्र हेही नाव दिले) व त्याचा भाऊ अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय,
15मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोत म्हटलेला शिमोन,
16याकोबाचा मुलगा यहूदा आणि जो पुढे द्रोही निघाला तो यहूदा इस्कर्योत.
17येशू त्यांच्याबरोबर खाली उतरून सपाटीच्या जागेवर उभा राहिला, आणि त्याच्या शिष्यांचा मोठा समुदाय, आणि सर्व यहूदीया व यरुशलेम येथून व सोर व सीदोन ह्यांकडल्या समुद्रकिनार्यापासून त्याचे श्रवण करण्यास व आपले रोग बरे करून घेण्यास जे लोक आले होते, त्यांचा मोठा जमाव तेथे उभा होता;
18तेव्हा जे अशुद्ध आत्म्यांनी पिडलेले होते त्यांना त्याने बरे केले.
19तेव्हा सर्व समुदायांची त्याला स्पर्श करण्याची धडपड चालली होती, कारण त्याच्यातून सामर्थ्य निघून ते सर्वांना निरोगी करत होते.
धन्यवाद व दु:खोद्गार
20तेव्हा त्याने आपल्या शिष्यांकडे दृष्टी लावून म्हटले,
“अहो दीनांनो, तुम्ही धन्य;
कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
21अहो, जे तुम्ही आता भुकेले आहात
ते तुम्ही धन्य;
कारण तुम्ही तृप्त व्हाल.
अहो, जे तुम्ही आता रडता ते तुम्ही धन्य;
कारण तुम्ही हसाल.
22मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा द्वेष करतील, तुम्हांला वाळीत टाकतील, तुमची निंदा करतील आणि तुमचे नाव वाईट म्हणून टाकून देतील, तेव्हा तुम्ही धन्य.
23त्या दिवशी आनंदित होऊन उड्या मारा; कारण पाहा, स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; त्यांचे पूर्वज संदेष्ट्यांना असेच करत असत.
24परंतु तुम्हा धनवानांची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्ही आपले सांत्वन भरून पावलाच आहात.
25अहो, जे तुम्ही आता तृप्त झाला आहात
त्या तुमची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्हांला भूक लागेल.
अहो, जे तुम्ही आता हसता
त्या तुमची केवढी दुर्दशा होणार!
कारण तुम्ही शोक कराल व रडाल.
26जेव्हा सर्व लोक तुम्हांला बरे म्हणतील तेव्हा तुमची केवढी दुर्दशा होणार! त्यांचे पूर्वज खोट्या संदेष्ट्यांना असेच म्हणत असत.
शत्रूंवर प्रेम
27परंतु तुम्हा ऐकणार्यांस मी सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा; जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा;
28जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या; जे तुमची निर्भर्त्सना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
29जो तुझ्या एका गालावर मारतो त्याच्यापुढे दुसराही कर; आणि जो तुझा अंगरखा हिरावून घेतो त्याला तुझी बंडीही घेऊन जाण्यास विरोध करू नकोस.
30जो कोणी तुझ्याजवळ मागतो त्याला दे आणि जो तुझे काही हिरावून घेतो त्याच्याकडे ते परत मागू नकोस.
31लोकांनी तुमच्याशी जसे वर्तन करावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वर्तन करा.
32जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर त्यात तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपल्यावर प्रीती करणार्यांवर प्रीती करतात.
33जे तुमचे बरे करतात त्यांचे तुम्ही बरे केले तर त्यात तुमचा उपकार तो काय? पापी लोकही तसेच करतात.
34ज्यांच्यापासून परत मिळण्याची आशा आहे त्यांना तुम्ही उसने दिले तर त्यात तुमचा उपकार तो काय? जितके दिले तितके परत मिळण्याच्या आशेने पापी लोकही पापी लोकांना उसने देतात.
35तुम्ही तर आपल्या वैर्यांवर प्रीती करा, त्यांचे बरे करा, निराश न होता उसने द्या, म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल आणि तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल; कारण तो कृतघ्न व दुर्जन ह्यांच्यावरही उपकार करणारा आहे.
36जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.
इतरांचे दोष काढण्याबाबत
37तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही; कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही; क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल;
38द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल; चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील; कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”
39त्याने त्यांना दाखलाही दिला की, “आंधळा आंधळ्याला वाट दाखवून नेऊ शकतो काय? दोघेही खाचेत पडतील की नाही?
40शिष्य गुरूपेक्षा श्रेष्ठ नाही; पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.
41तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?
42अथवा तू आपल्या डोळ्यातले मुसळ न पाहता आपल्या भावाला कसे म्हणशील की, ‘भाऊ, तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे?’ अरे ढोंग्या, पहिल्याने स्वतःच्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे तुझ्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल.
43ज्याला वाईट फळ येईल असे कोणतेही चांगले झाड नाही; तसेच ज्याला चांगले फळ येईल असे कोणतेही वाईट झाड नाही.
44प्रत्येक झाड त्याच्या फळावरून ओळखू येते. काटेरी झाडावरून कोणी अंजीर काढत नाहीत, आणि रूद्राक्षाच्या झाडांवरून कोणी द्राक्षाचा घड काढत नाहीत.
45चांगला मनुष्य आपल्या अंत:करणातील चांगल्या भांडारातून चांगले ते काढतो, तसेच वाईट मनुष्य वाइटातून वाईट काढतो; कारण अंतःकरणात जे भरले आहे तेच मुखावाटे निघणार.
ऐकणे आणि करणे
46तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू’ म्हणता, पण मी जे सांगतो ते का करत नाही?
47जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करतो तो कोणासारखा आहे, हे मी तुम्हांला दाखवतो.
48तो कोणाएका घर बांधणार्या माणसासारखा आहे. त्याने खोल खणून खडकावर पाया घातला; मग पूर आला, तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला तरी त्यामुळे ते हालले नाही; कारण ते मजबूत बांधले होते.
49परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणार्या माणसासारखा आहे; त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लगेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला.”
Sélection en cours:
लूक 6: MARVBSI
Surbrillance
Partager
Copier
Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.