Logo YouVersion
Îcone de recherche

लूक 8

8
येशूची सेवा करणार्‍या स्त्रिया
1पुढे लवकरच असे झाले की, तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता; तेव्हा त्याच्याबरोबर ते बारा प्रेषित होते;
2आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मग्दालीया म्हटलेल्या मरीयेतून सात भुते निघाली होती ती,
3आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.
पेरणी करणार्‍याचा दृष्टान्त
4तेव्हा मोठा लोकसमुदाय एकत्र जमला असता व गावोगावचेही लोक त्याच्याजवळ आले असता तो दाखला देऊन म्हणाला,
5“पेरणारा आपले बी पेरायला निघाला; आणि तो पेरत असताना काही बी वाटेवर पडले; ते तुडवले गेले व आकाशातील पाखरांनी खाऊन टाकले.
6काही खडकाळीवर पडले, ते ओलावा नसल्यामुळे उगवताच वाळून गेले.
7काही काटेरी झाडांमध्ये पडले; काटेरी झाडांनी त्याबरोबर वाढून त्याची वाढ खुंटवली.
8काही चांगल्या जमिनीत पडले; ते उगवून शंभरपट पीक आले.” असे सांगून तो मोठ्याने म्हणाला, “ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”
9तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, “ह्या दाखल्याचा अर्थ काय?”
10तो म्हणाला, “देवाच्या राज्याची रहस्ये जाणण्याची देणगी तुम्हांला दिली आहे; परंतु इतरांना ती दाखल्यांनी सांगितली आहेत; अशासाठी की, ‘त्यांना दिसत असता त्यांनी पाहू नये व ऐकत असता त्यांना समजू नये.’
11हा दाखला असा आहे : बी हे देवाचे वचन आहे.
12वाटेवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात; नंतर त्यांनी विश्वास ठेवू नये व त्यांना तारणप्राप्ती होऊ नये म्हणून सैतान येऊन त्यांच्या अंतःकरणांतून वचन काढून घेतो.
13खडकाळीवर असलेले हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने ग्रहण करतात; पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळपर्यंत विश्वास ठेवतात व परीक्षेच्या वेळी माघार घेतात.
14काटेरी झाडांमध्ये पडलेले हे आहेत की, ते ऐकतात, आणि संसाराच्या चिंता, धन व विषयसुख ह्यांत आयुष्यक्रमण करत असता त्यांची वाढ खुंटते व ते पक्‍वफळ देत नाहीत.
15चांगल्या मातीत पडलेले हे आहेत की, ते वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात.
दिव्यावरून धडा
16कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही; तर आत येणार्‍यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो.
17प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही.
18म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा; ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.”
प्रभू येशूचे नातलग
19त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना.
20तेव्हा त्याला सांगण्यात आले की, “तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत.”
21त्याने त्यांना उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत.”
येशू वादळ शांत करतो
22नंतर त्या दिवसांत एकदा असे झाले की, तो आपल्या शिष्यांसह मचव्यात गेला आणि “आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ” असे त्यांना म्हणाला; तेव्हा त्यांनी मचवा सोडला.
23नंतर ते हाकारून जात असता तो झोपी गेला; मग सरोवरात मोठे वादळ सुटून मचव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते.
24तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्याला जागे करून म्हणाले, “गुरूजी, गुरूजी, आपण बुडालो!” तेव्हा त्याने उठून वार्‍यास व पाण्याच्या कल्लोळास धमकावले, आणि ते बंद होऊन निवांत झाले.
25तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “तुमचा विश्वास कोठे आहे?” ते भयभीत होऊन विस्मित झाले व एकमेकांना म्हणाले, “हा आहे तरी कोण? कारण वारे व पाणी ह्यांनादेखील हा आज्ञा करतो व ते त्याचे ऐकतात.”
गरसेकरांच्या प्रदेशातील भूतग्रस्त
26मग ते गालीलाच्या समोरील गरसेकरांच्या प्रदेशात येऊन पोहचले.
27तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला, त्याला भुते लागली होती; बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरांतून राहत असे.
28तो येशूला पाहून ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, ‘तू मध्ये का पडतोस?’ मी तुला विनंती करतो, मला पीडा देऊ नकोस.”
29कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्याची आज्ञा करत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते; आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहार्‍यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे.
30येशूने त्याला विचारले, “तुझे नाव काय?” त्याने म्हटले, “सैन्य”; कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भुते शिरली होती.
31ती त्याला विनंती करत होती की, ‘आम्हांला अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नकोस.’
32तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात चरत होता; ‘त्यांच्यात आम्हांला जाऊ दे’ अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यांना जाऊ दिले.
33तेव्हा भुते त्या माणसातून निघून त्या डुकरांत शिरली, आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला.
34मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतामळ्यांत जाऊन हे वर्तमान सांगितले.
35तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भुते निघाली होती तो येशूच्या पायांजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला; तेव्हा त्यांना भीती वाटली.
36ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला, हे त्यांना सांगितले.
37तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या प्रांतांतील सर्व लोकांनी त्याला आपल्या येथून निघून जाण्याची विनंती केली; कारण ते फार घाबरले होते. मग तो मचव्यात बसून परत जाण्यास निघाला.
38तेव्हा ज्या माणसातून भुते निघाली होती तो त्याच्याजवळ अशी मागणी करत होता की, मला आपणाजवळ राहू द्या; परंतु येशूने त्याला निरोप देऊन सांगितले,
39“आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्ये केली ते सांगत जा.” मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्ये केली होती त्याची गावभर घोषणा करत फिरला.
याइराची कन्या व रक्तस्रावी स्त्री
40नंतर येशू परत आला तेव्हा लोकसमुदायाने त्याचे स्वागत केले; कारण ते सर्व त्याची वाट पाहत होते.
41तेव्हा पाहा, याईर नावाचा कोणीएक मनुष्य आला; तो सभास्थानाचा अधिकारी होता; त्याने येशूच्या पाया पडून त्याला आपल्या घरी येण्याची विनंती केली.
42कारण त्याला सुमारे बारा वर्षांची एकुलती एक मुलगी होती, ती मरणास टेकली होती. मग तो जात असता लोकसमुदाय त्याच्याभोवती गर्दी करत होता.
43तेव्हा बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली (जिने आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्च केली होती) व कोणालाही बरी करता न आलेली अशी कोणीएक स्त्री
44त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवली आणि लगेच तिचा रक्तस्राव थांबला.
45पण येशू म्हणाला, “मला कोणी स्पर्श केला?” तेव्हा सर्व जण ‘मी नाही’ असे म्हणत असता पेत्र व त्याचे सोबती म्हणाले, “गुरूजी, लोकसमुदाय तुम्हांला दाटी करून चेंगरत आहेत! अन् तुम्ही म्हणता कोणी मला स्पर्श केला?”
46पण येशू म्हणाला, “कोणीतरी मला स्पर्श केलाच, कारण माझ्यातून शक्ती निघाली हे मला समजले आहे.”
47मग आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून ती स्त्री कापत कापत पुढे आली व त्याच्या पाया पडून, आपण कोणत्या कारणाकरता त्याला शिवलो व कसे तत्काळ बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या समक्ष निवेदन केले.
48तेव्हा तो तिला म्हणाला, “मुली, धीर धर, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे; शांतीने जा.”
49तो बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्‍याच्या येथून कोणी येऊन त्याला सांगितले, “तुमची मुलगी मरण पावली आहे; आता गुरूजीला श्रम देऊ नका.”
50ते ऐकून येशू म्हणाला, “भिऊ नका; विश्वास मात्र धरा म्हणजे ती बरी होईल.”
51नंतर त्या घरी आल्यावर त्याने पेत्र, योहान, याकोब व मुलीचे आईबाप ह्यांच्याशिवाय आपल्याबरोबर कोणाला आत येऊ दिले नाही.
52तिच्यासाठी सर्व जण रडत व शोक करत होते; पण तो म्हणाला, “रडू नका, कारण ती मेली नाही, झोपेत आहे.”
53तरी ती मेली हे ठाऊक असल्यामुळे ते त्याला हसू लागले.
54मग सर्वांना बाहेर घालवून त्याने तिच्या हाताला धरून, “मुली, ऊठ,” असे मोठ्याने म्हटले.
55तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती तत्काळ उठली; मग तिला खायला द्यावे म्हणून त्याने आज्ञा केली.
56तेव्हा तिचे आईबाप थक्क झाले; पण ही घडलेली गोष्ट कोणाला सांगू नका अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली.

Sélection en cours:

लूक 8: MARVBSI

Surbrillance

Partager

Copier

None

Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi