Logo YouVersion
Îcone de recherche

मार्क 8

8
चार हजार लोकांना भोजन
1त्या दिवसांत पुन्हा एकदा लोकांचा मोठा समुदाय जमला होता व त्यांच्याजवळ खायला काही नव्हते, म्हणून येशूने आपल्या शिष्यांना बोलावून त्यांना म्हटले,
2“मला ह्या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत व त्यांच्याजवळ खायला काही नाही;
3मी त्यांना उपाशी घरी लावून दिले तर ते वाटेने कासावीस होतील; त्यांच्यातील कित्येक तर दुरून आलेले आहेत.”
4त्याच्या शिष्यांनी त्याला उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?”
5त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.”
6नंतर त्याने लोकांना जमिनीवर बसण्यास सांगितले. त्या सात भाकरी घेतल्या व उपकारस्तुती करून त्या मोडल्या व वाढण्याकरता आपल्या शिष्यांजवळ दिल्या; आणि त्यांनी त्या लोकांना वाढल्या.
7त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते; त्यांवर त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढण्यास सांगितले.
8ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या.
9तेथे सुमारे चार हजार लोक होते. मग त्याने त्यांना निरोप दिला.
10नंतर लगेच तो आपल्या शिष्यांसह मचव्यात बसून दल्मनुथा प्रांतात आला.
असमंजसपणाबद्दल शिष्यांचा निषेध
11मग परूशी येऊन त्याच्याशी वाद घालू लागले आणि त्याची परीक्षा पाहण्याकरता त्यांनी त्याच्याजवळ आकाशातून चिन्ह मागितले.
12तेव्हा तो आपल्या आत्म्यात विव्हळ होऊन म्हणाला, “ही पिढी चिन्ह का मागते? मी तुम्हांला खचीत सांगतो की ह्या पिढीला चिन्ह मुळीच दिले जाणार नाही.”
13नंतर तो त्यांना सोडून पुन्हा मचव्यात बसून पलीकडे गेला.
14ते भाकरी घेण्यास विसरले होते; आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकर होती.
15मग त्याने त्यांना निक्षून सांगितले की, “सांभाळा, परूश्यांचे खमीर व हेरोदाचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.”
16तेव्हा ‘आपल्याजवळ भाकरी नाहीत’ अशी ते आपसांत चर्चा करू लागले.
17हे जाणून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही व समजतही नाही काय? तुमचे अंतःकरण कठीण झाले आहे काय?
18डोळे असून तुम्हांला दिसत नाही काय? कान असून तुम्हांला ऐकू येत नाही काय? तुम्हांला आठवत नाही काय?
19मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या?” ते त्याला म्हणाले, “बारा.”
20“तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?” ते म्हणाले, “सात.”
21तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अजून तुम्हांला समजत नाही काय?”
येशू बेथसैदा येथील आंधळ्याला दृष्टी देतो
22मग ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व ‘आपण त्याला स्पर्श करावा’ अशी त्याला विनंती केली.
23तेव्हा त्याने त्या आंधळ्याचा हात धरून त्याला गावाबाहेर नेले व त्याच्या डोळ्यांत थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्याला विचारले, “तुला काही दिसते काय?”
24तो वर पाहून म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते, कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीपण ती चालत आहेत.”
25नंतर त्याने त्याच्या डोळ्यांवर पुन्हा हात ठेवले; तेव्हा त्याने निरखून पाहिले, आणि तो बरा झाला व सर्वकाही त्याला स्पष्ट दिसू लागले.
26मग त्याला त्याच्या घरी पाठवताना त्याने सांगितले की, “ह्या गावात पाऊलसुद्धा टाकू नकोस.”
येशू हा ख्रिस्त आहे अशी पेत्राने दिलेली कबुली
27नंतर येशू व त्याचे शिष्य फिलिप्पाच्या कैसरियाच्या आसपासच्या खेड्यापाड्यांत जाण्यास निघाले; तेव्हा वाटेत त्याने आपल्या शिष्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात?”
28त्यांनी त्याला उत्तर दिले, “बाप्तिस्मा करणारा योहान; कित्येक एलीया; कित्येक संदेष्ट्यांपैकी एक असे म्हणतात.”
29तेव्हा त्याने त्यांना विचारले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” पेत्राने त्याला उत्तर दिले, “आपण ख्रिस्त आहात.”
30तेव्हा ‘माझ्याविषयी कोणाला सांगू नका’ अशी त्याने त्यांना ताकीद दिली.
स्वत:चे मरण व पुनरुत्थान ह्यांविषयी येशूचे भविष्य
31तो त्यांना असे शिक्षण देऊ लागला की, ‘मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे.’
32ही गोष्ट तो उघड बोलत होता तेव्हा पेत्र त्याला बाजूला घेऊन त्याला दटावू लागला.
33तेव्हा त्याने वळून आपल्या शिष्यांकडे पाहिले व तो पेत्राला दटावून म्हणाला, “सैताना, माझ्यापुढून चालता हो; कारण तुझा दृष्टिकोन देवाचा नव्हे तर मनुष्यांचा आहे.”
आत्मत्यागाचे आमंत्रण
34मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, “जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे.
35कारण जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो त्याला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरता व सुवार्तेकरता आपल्या जिवाला मुकेल तो त्याला वाचवील.
36कारण मनुष्याने सर्व जग मिळवले आणि आपल्या जिवाचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ?
37किंवा मनुष्य आपल्या जिवाबद्दल काय मोबदला देऊ शकेल?
38ह्या व्यभिचारी व पापी पिढीमध्ये ज्या कोणाला माझी व माझ्या वचनांची लाज वाटेल, त्याची लाज मनुष्याचा पुत्र पवित्र देवदूतांसहित आपल्या पित्याच्या गौरवाने येईल तेव्हा त्यालाही वाटेल.”

Sélection en cours:

मार्क 8: MARVBSI

Surbrillance

Partager

Copier

None

Tu souhaites voir tes moments forts enregistrés sur tous tes appareils? Inscris-toi ou connecte-toi