YouVersion logo
Ikona pretraživanja

लूक 14

14
साबाथ दिवशी आरोग्यदान
1येशू एका साबाथ दिवशी परुश्यांतील एका अधिकाऱ्याच्या घरी भोजनास गेला. काही लोक त्याच्या पाळतीवर बसले होते. 2तेव्हा पाय व हात सुजले होते असा एक माणूस त्याच्याकडे आला. 3येशूने शास्त्र्यांना व परुश्यांना विचारले, “साबाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही?”
4ते गप्प राहिले. येशूने त्या रुग्णाला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. 5नंतर येशू आजूबाजूच्या लोकांना म्हणाला, “तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला, तर तो त्याला साबाथ दिवशी तत्क्षणी बाहेर काढणार नाही काय?”
6त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना.
नम्रता व आदरातिथ्य
7आमंत्रित लोक मानाची आसने कशी निवडून घेत आहेत, हे पाहून येशू दाखला देऊन म्हणाला, 8“कोणी तुला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण दिले, तर मानाच्या आसनावर बसू नकोस. तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असण्याची शक्यता आहे. 9ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘ह्यांना जागा दे’, त्या वेळी तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील. 10उलट, तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर बस, म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, ‘मित्रा, वर येऊन बस.’ अशा प्रकारे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल; 11कारण जो कोणी स्वतःला मोठा समजेल तो नमवला जाईल व जो स्वतः नम्र राहील, त्याचा सन्मान केला जाईल.”
12त्यानंतर ज्याने त्याला आमंत्रण केले होते, त्यालादेखील येशू म्हणाला, “जेव्हा तुम्ही दुपारची किंवा संध्याकाळची जेवणावळ कराल, तेव्हा तुम्ही तुमचे मित्र, भाऊ, नातलग किंवा धनवान शेजारी ह्यांना बोलावू नका कारण तेही कदाचित तुम्हांला आमंत्रण करतील व तुमची फेड होईल. 13परंतु तुम्ही मेजवानी द्याल, तेव्हा गरीब, लुळे, लंगडे व आंधळे ह्यांना आमंत्रण द्या 14म्हणजे तुम्ही धन्य व्हाल कारण तुमची फेड करायला त्यांच्याजवळ काही नसेल. अर्थात, नीतिमानांच्या पुनरुत्थानसमयी तुमची परतफेड होईल.”
मेजवानीचा दाखला
15त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणा एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य.”
16त्याने त्याला म्हटले, “एका मनुष्याने संध्याकाळी जंगी मेजवानी द्यायचे ठरविले. पुष्कळांना आमंत्रण केले. 17जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे’, असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. 18ते सगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे. ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ 19दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत. त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ 20आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे म्हणून मला येता येणार नाही.’
21त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वृत्त सांगितले. घरधन्याला राग आला व तो रागाने आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांवर व गल्ल्यांत जा; तेथील गरीब, व्यंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’ 22दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरीदेखील अजून जागा आहे.’ 23धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व वाटांवर जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. 24मी तुम्हांला सांगतो, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.’”
खरे शिष्य कोण?
25एकदा येशूबरोबर पुष्कळ लोक चालले होते, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, 26“जो कोणी माझ्याकडे येतो पण आपले वडील, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांच्यापेक्षा आणि आपल्या स्वतःपेक्षाही माझ्यावर अधिक प्रीती करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. 27जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही.
28तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधायची इच्छा असता, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज घेऊन आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही, हे पाहत नाही? 29अन्यथा पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, 30‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’
31अथवा असा कोण राजा आहे की, तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजारांचे सैन्य घेऊन माझ्यावर चाल करून येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? 32जर जाता येत नसेल, तर तो दूर आहे तोच तो प्रतिनिधींना पाठवून सलोख्याचे बोलणे करील. 33त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
34मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? 35ते जमिनीकरता किंवा खताकरता उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकायला कान आहेत त्याने हे ऐकावे.”

Trenutno odabrano:

लूक 14: MACLBSI

Istaknuto

Podijeli

Kopiraj

None

Želiš li svoje istaknute stihove spremiti na sve svoje uređaje? Prijavi se ili registriraj