प्रेषित 11
11
पेत्र आपल्या कृतीचे स्पष्टीकरण करतो
1गैरयहूदी लोकांनीही परमेश्वराचे वचन ग्रहण केले हे प्रेषितांच्या आणि यहूदीया प्रांतातील विश्वासणार्यांच्या कानी गेले. 2मग पेत्र वर यरुशलेमला गेला, त्यावेळी सुंता झालेल्या विश्वासणार्यांनी त्याच्यावर टीका केली 3ते म्हणाले, “तू असुंती लोकांच्या घरी गेलास आणि त्यांच्याबरोबर भोजन केले.”
4त्यावर पेत्राने सुरुवातीपासून, सर्वगोष्टी सविस्तर सांगितल्या: 5तो म्हणाला, “मी योप्पा शहरात प्रार्थना करीत असताना, माझे देहभान सुटले तेव्हा मी दृष्टान्त पाहिला. त्यामध्ये मोठ्या चादरी सारखे काहीतरी चारही कोपरे धरून आकाशातून खाली सोडले जात आहे आणि मी जिथे होतो तिथे ते खाली आले. 6मी त्यामध्ये डोकावून पाहिले मला पृथ्वीवरील चतुष्पाद प्राणी, श्वापदे, सरपटणारे जीवजंतू व आकाशातील पाखरे दिसली. 7तेव्हा एक वाणी माझ्याशी बोलताना मी ऐकली, ‘पेत्रा, ऊठ व मारून खा.’
8“मी उत्तर दिले, ‘प्रभू खात्रीने नाही! कारण अस्वच्छ व अशुद्ध असे कधीही माझ्या तोंडात गेलेले नाही.’
9“स्वर्गातून दुसर्या वेळेस वाणी ऐकू आली, ‘परमेश्वराने जे शुद्ध केले आहे, ते अशुद्ध असे म्हणू नकोस.’ 10असे तीन वेळा झाले आणि ते सर्व परत स्वर्गाकडे घेतले गेले.
11“नेमक्या याच वेळी कैसरीयाहून मजकडे पाठविलेली तीन माणसे मी राहत होतो त्या घराच्या समोर येऊन उभी राहिली. 12तेव्हा आत्मा मला म्हणाला त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको. मजबरोबर सहा बंधूही सोबतीला होते आणि आम्ही त्या मनुष्याच्या घरी प्रवेश केला. 13त्याने आम्हाला सांगितले की परमेश्वराचा दूत त्याच्या घरात प्रकट झाला आणि म्हणाला, ‘योप्पा येथे शिमोन ज्याला पेत्र म्हणतात त्याला बोलावून घे. 14तो तुला संदेश सांगेल त्याद्वारे तुझे आणि तुझ्या सर्व घराण्याचे तारण होईल.’
15“मी बोलण्यास सुरुवात केली, तेव्हाच पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरला, जसा तो सुरुवातीला आपल्यावर उतरला होता. 16तेव्हा मला आठवण झाली की, प्रभू येशूंनी काय सांगितले होते: ‘योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला, परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल.’ 17म्हणून जर परमेश्वराने तेच दान त्यांना दिले, जे आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा आपल्याला मिळाले, तर परमेश्वराला विरोध करणारा मी कोण?”
18त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांच्याकडे आणखी काही प्रश्न राहिले नाहीत आणि ते परमेश्वराची स्तुती करू लागले व म्हणाले, “तर आता परमेश्वराने गैरयहूदीयांनाही पश्चात्ताप करण्याची संधी दिली आहे ज्यामुळे त्यांना जीवन प्राप्त होईल.”
अंत्युखिया येथील मंडळी
19स्तेफनाचा वध झाल्यानंतर छळामुळे जे इतरत्र पांगले होते ते प्रवास करीत फेनिके, सायप्रस व अंत्युखिया येथे गेले व त्यांनी केवळ यहूदीयांनाच वचन सांगितले. 20तरी, सायप्रस व कुरेने, येथून अंत्युखिया येथे गेलेल्या काही लोकांनी प्रभू येशूंविषयीची शुभवार्ता ग्रीक लोकांनाही सांगितली. 21तेव्हा प्रभूचे सामर्थ्य त्यांच्यावर होते, म्हणून लोकांनी मोठ्या संख्येने विश्वास ठेवला आणि ते प्रभूकडे वळले.
22यरुशलेम येथे असलेल्या मंडळीने जेव्हा ही बातमी ऐकली, तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठविले. 23जेव्हा तो तिथे आला आणि परमेश्वराच्या कृपेमुळे जे काही झाले होते ते पाहून तो आनंदित झाला आणि त्या सर्वांनी पूर्ण मनाने प्रभूबरोबर एकनिष्ठ राहावे असे त्याने त्या सर्वांना उत्तेजन दिले. 24बर्णबा एक चांगला मनुष्य होता, तो पवित्र आत्म्याने भरलेला आणि विश्वासात परिपूर्ण असा होता आणि फार मोठ्या संख्येने लोकांना प्रभूकडे आणले.
25त्यानंतर शौलाचा शोध घेण्यासाठी बर्णबा पुढे तार्ससला गेला, 26जेव्हा तो त्याला भेटला, त्याने त्याला अंत्युखिया येथे आणले. बर्णबा व शौल दोघेही वर्षभर मंडळ्यांमध्ये अनेक लोकांना भेटून शिक्षण देत राहिले. अंत्युखिया मध्येच शिष्यांना ख्रिस्ती हे नाव प्रथम मिळाले.
27याकाळात काही संदेष्टे यरुशलेमकडून खाली अंत्युखियास आले. 28त्यांच्यामधील अगब नावाचा एकजण उभा राहिला आणि आत्म्याच्या साहाय्याने त्याने असे भविष्य सांगितले की, सर्व रोमी साम्राज्यात मोठा दुष्काळ पडणार आहे. (क्लौडियसच्या कारकिर्दीत हे झाले.) 29तेव्हा शिष्यांनी असे ठरविले की, प्रत्येकांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे यहूदीयामध्ये राहणार्या बंधू भगिनींना मदत करावी. 30त्याप्रमाणे त्यांनी केले, त्यांच्या देणग्या तेथील वडीलमंडळींना पाठविण्यासाठी त्यांनी शौल व बर्णबाच्या स्वाधीन केल्या.
Jelenleg kiválasztva:
प्रेषित 11: MRCV
Kiemelés
Megosztás
Másolás
Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.