प्रेषित 16
16
पौल व सीलाला तीमथ्य येऊन मिळतो
1पौल दर्बे आणि नंतर लुस्त्र येथे आला, तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य राहत होता, त्याची आई यहूदी असून विश्वासणारी होती, परंतु त्याचे वडील ग्रीक होते. 2लुस्त्र व इकुन्या येथील विश्वासणारे त्याच्याबद्दल चांगली साक्ष देत होते. 3त्याला आपल्याबरोबर फेरीत सामील करावयाचे असल्यामुळे पौलाने निघण्यापूर्वी तीमथ्याची सुंता करविली, कारण त्या भागातील सर्व यहूदीयांना त्याचे वडील ग्रीक असल्याचे माहीत होते. 4गावागावातून प्रवास करीत असताना, त्यांनी यरुशलेममधील प्रेषित व वडीलजन यांनी जे निर्णय ठरविले होते त्याचे पालन लोकांनी करावे, असे सांगितले. 5म्हणून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व त्यांच्या संख्येत दररोज वाढ होत गेली.
मासेदोनियाच्या मनुष्याचा पौलाला दृष्टान्त
6त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते. 7मुसियाच्या सरहद्दीवर आल्यानंतर, ते बिथुनिया प्रांतामध्ये प्रवेश करावयास निघाले, तेव्हा येशूंच्या आत्म्याने त्यांना तशी परवानगी दिली नाही. 8म्हणून ते मुसिया प्रांतातून खाली त्रोवास येथे गेले. 9रात्रीच्या वेळी पौलाने दृष्टान्तात असे पाहिले की मासेदोनियातील मनुष्य उभा राहून गयावया होऊन विनंती करीत आहे, “मासेदोनियात या व आम्हास मदत करा.” 10पौलाने हा दृष्टान्त पाहिल्यानंतर आपल्याला परमेश्वराने यांच्यामध्ये शुभवार्ता प्रचार करावयास बोलाविले आहे, असे समजून लगेच आम्ही मासेदोनियास जाण्याची तयारी केली.
फिलिप्पै येथे लुदियाचे परिवर्तन
11आम्ही त्रोवास येथून जहाजात चढलो व सरळ समथ्राकेस पोहोचलो व दुसर्या दिवशी नियापुलीस येथे गेलो. 12तिथून आम्ही प्रवास करून फिलिप्पै, जे रोमी वसाहतीत असून मासेदोनियाच्या शहरामधील एक महत्त्वाचे नगर होते#16:12 त्या राज्याचे प्रख्यात शहर तिथे गेलो. तिथे आम्ही बरेच दिवस राहिलो.
13मग शब्बाथ दिवशी आम्ही शहराच्या द्वारातून बाहेर नदीकाठी गेलो, तिथे प्रार्थनेसाठी ठिकाण असेल अशी आमची अपेक्षा होती. आम्ही तिथे बसलो आणि ज्या स्त्रिया तिथे जमल्या होत्या, त्यांच्याबरोबर बोलण्यास सुरुवात केली. 14त्या ऐकणार्या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले. 15मग तिचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा बाप्तिस्मा झाला व तिने आम्हाला तिच्या घरी बोलाविले. ती म्हणाली, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे, असे जर तुम्ही मान्य करीत असाल तर, या आणि माझ्या घरी राहा.” तिच्या आग्रहामुळे आम्हाला ते मान्य करावे लागले.
पौल व सीला तुरुंगात
16एकदा आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असताना, आम्हाला एक गुलाम मुलगी भेटली जिच्यामध्ये अशुद्ध आत्मा असून त्याच्या साहाय्याने ती भविष्य सांगत असे. भविष्यकथन करून ती आपल्या धन्यांना खूप पैसा मिळवून देत असे. 17ती पौलाच्या आणि आमच्यामागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर परमेश्वराचे सेवक आहेत आणि तारण कसे मिळेल याचा मार्ग हे तुम्हाला सांगत आहेत.” 18असे ती पुष्कळ दिवस करत होती. शेवटी पौल अत्यंत त्रस्त झाला आणि तिच्याकडे वळून तिच्यातील आत्म्याला म्हणाला, “मी येशू ख्रिस्ताच्या नावाने तुला आज्ञा करतो की तिच्यातून बाहेर नीघ!” आणि त्या क्षणी तो आत्मा तिच्यातून निघून गेला.
19आपल्याला जे धन मिळत होते ते आता मिळणार नाही असे पाहून तिच्या धन्यांनी, पौल व सीलाला पकडून अधिकार्यांना तोंड देण्याकरिता बाजारपेठेत ओढत नेले. 20त्यांनी त्यांना न्यायाधीशापुढे आणले व ते म्हणाले, “ही यहूदी माणसे आमच्या शहरात गोंधळ माजवीत आहेत 21आम्ही रोमी लोकांनी जे नियम स्वीकारणे व आचरणे योग्य नाहीत, अशा नियमांची ते वकिली करत आहेत.”
22मग पौल व सीलावर हल्ला करण्यात लोकसमूह सामील झाला, तेव्हा न्यायाधीशांनी त्यांचे कपडे काढून त्यांना फटके मारण्याचा हुकूम दिला. 23त्यांना निष्ठुरपणे पुष्कळ फटके मारल्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले आणि तुरुंगाच्या पहारेकर्याला त्यांच्यावर बंदोबस्ताने पहारा ठेवण्याचा हुकूम देण्यात आला. 24असा हुकूम मिळाल्यावर त्यांना आतील कोठडीत ठेऊन त्यांचे पाय लाकडी खोड्यांत अडकविण्यात आले.
25मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत असताना आणि परमेश्वराचे गीत गात असताना इतर कैदी ते ऐकत होते. 26अचानक तीव्र भूकंपाने तुरुंगाचा पाया डळमळला. एकाएकी तुरुंगाचे सर्व दरवाजे उघडले गेले आणि सर्व कैद्यांचे साखळदंड मोकळे झाले. 27तुरुंगाचा नायक झोपेतून जागा झाला आणि तुरुंगाचे सर्व दरवाजे सताड उघडे पाहून, सर्व कैदी पळून गेलेले असावेत असे समजून तो तलवार उपसून स्वतःला ठार करणार होता. 28परंतु पौल ओरडून म्हणाला, “तू स्वतःला इजा करू नकोस! आम्ही सर्व येथेच आहोत!”
29तुरुंगाच्या नायकाने दिवे मागविले व तो धावत आला आणि पौल आणि सीला यांच्यापुढे थरथर कापत पालथा पडला. 30त्याने त्यांना बाहेर आणले आणि विचारले, “महाराज, माझे तारण व्हावे, म्हणून मी काय करावे?”
31त्यांनी सांगितले, “प्रभू येशूंवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” 32तेव्हा त्यांनी त्याला व त्याच्या घराण्यातील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. 33मग रात्रीच्या त्याच घटकेस तुरुंगाच्या नायकाने त्यांच्या जखमा धुतल्या आणि लगेच त्याने व त्याच्या सर्व कुटुंबाने बाप्तिस्मा घेतला. 34त्या नायकाने त्यांना आपल्या घरी आणले व त्यांच्यापुढे भोजन वाढले; तो व त्याच्या कुटुंबातील सर्व लोक परमेश्वरावरील विश्वासात आल्यामुळे अत्यंत आनंदित झाले होते.
35पहाट झाल्यानंतर, न्यायाधीशांनी त्यांच्या अधिकार्यांना त्या तुरुंगाच्या नायकाकडे पाठवून त्यांना हुकूम दिला: “त्या माणसांना सोडून द्या.” 36तेव्हा तुरुंगाच्या नायकाने पौलाला सांगितले, “न्यायाधीशांनी हुकूम दिला आहे की, पौल व सीला यांना जाऊ द्यावे, आता तुम्ही जाऊ शकता. शांतीने जा.”
37परंतु पौल अधिकार्यांना म्हणाला: “त्यांनी आमची चौकशी न करता आम्हाला जाहीरपणे फटके मारले आणि आम्ही रोमी नागरिक असतानाही आम्हास तुरुंगात डांबले. आता आम्ही गुपचूप निघून जावे, अशी त्यांची इच्छा आहे काय? त्यांनी स्वतः येऊन आम्हास मुक्त करावे.”
38अधिकार्यांनी जाऊन हे शब्द न्यायाधीशांना कळविले, पौल व सीला हे रोमी नागरिक आहेत, हे त्यांना समजले तेव्हा ते घाबरले. 39आणि त्यांना शांत करण्यासाठी ते स्वतः तुरुंगात आले आणि तुरुंगाच्या बाहेर आणून, ते शहर सोडून जावे अशी त्यांना विनंती केली. 40तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पौल व सीला हे लुदियेच्या घरी गेले आणि बंधू भगिनींना भेटून त्यांना उत्तेजित केले. नंतर ते तिथून निघाले.
Jelenleg kiválasztva:
प्रेषित 16: MRCV
Kiemelés
Megosztás
Másolás
Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.