प्रेषित 18

18
पौल करिंथमध्ये
1यानंतर, पौलाने ॲथेन्स सोडले व तो करिंथ येथे गेला. 2तिथे त्याला पोनतस गावाचा अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची पत्नी प्रिस्किल्लाला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तिथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला, 3जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले. 4प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहात यहूदी आणि ग्रीक यांची खात्री करून देण्यासाठी तो प्रयत्न करीत असे.
5जेव्हा मासेदोनियाहून सीला व तीमथ्य आले, तेव्हा येशू हेच ख्रिस्त आहेत असा प्रचार आणि साक्ष केवळ यहूदीयांनाच सांगण्यासाठी पौलाने स्वतःचे समर्पण केले होते. 6परंतु जेव्हा ते पौलाला विरोध करून शिवीगाळ करू लागले, तेव्हा पौलाने याच्या निषेधार्थ त्याचे वस्त्र झटकून टाकले आणि म्हणाला, “तुमच्या विनाशासाठी तुम्हीच जबाबदार आहात! मी निर्दोष आहे. येथून पुढे मी गैरयहूदीयांकडे जाईन.”
7नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे. 8त्या सभागृहाचा प्रमुख क्रिस्प आणि त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि करिंथमधील अनेकांनी पौलाचे ऐकून विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला.
9एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टान्तात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस. 10मी तुझ्याबरोबर आहे आणि कोणीही तुझ्यावर हल्ला वा तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे अनेक लोक आहेत.” 11तेव्हा पौल त्यांना करिंथ येथे दीड वर्ष परमेश्वराचे वचन शिकवीत राहिला.
12गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल झाला, तेव्हा पौलाला तिथून घालवून द्यावे म्हणून करिंथ येथील यहूद्यांनी एकजूट होऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला न्यायालयात आणले. 13त्यांनी पौलावर असा आरोप केला, “हा मनुष्य, आमच्या नियमशास्त्राविरुद्ध परमेश्वराची उपासना करण्यासाठी लोकांची मने वळवित आहे.”
14पौल आता बोलणार होता इतक्यातच, गल्लियो त्यांना म्हणाला, “जर तुम्ही यहूदी गंभीर गुन्हा किंवा दुराचाराची तक्रार करीत असाल, तर तुमचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी काहीतरी कारण असते. 15परंतु ज्याअर्थी हा वाद निव्वळ शब्दांचा आणि नावांचा आणि तुमच्या नियमशास्त्राबद्दलचा आहे, त्याअर्थी तुम्हीच हे प्रकरण मिटवा. अशा प्रकारच्या वादांचा न्यायनिवाडा करण्याचे मी साफ नाकारतो.” 16असे म्हणून त्याने त्यांना न्यायालयासमोरून घालवून दिले. 17त्यानंतर जमावाने सोस्थनेस या सभागृहाच्या पुढार्‍यास पकडले आणि न्यायालयासमोरच त्याला मार दिला; परंतु गल्लियोने तिकडे अजिबात लक्ष दिले नाही.
प्रिस्किल्ला, अक्विला आणि अपुल्लोस
18पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्‍या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता. 19इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला. 20जेव्हा त्यांनी पौलाला विनंती केली की, त्याने त्यांच्याबरोबर अधिक वेळ घालवावा, परंतु पौलाने ते नाकारले. 21परंतु निघताना मात्र त्याने त्यांना वचन दिले, “परमेश्वराची इच्छा असेल, तर मी पुन्हा येईन.” मग इफिस सोडून जलमार्गाने तो निघाला. 22जेव्हा तो कैसरीया येथे पोहोचला, तेव्हा तिथून तो वर यरुशलेमकडे आला आणि तेथील मंडळीला अभिवादन करून तो अंत्युखियास गेला.
23अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तिथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले.
24त्याचवेळी आलेक्सांद्रियाचा रहिवासी, अपुल्लोस नावाचा यहूदी इफिस येथे आला होता. तो एक विद्वान मनुष्य होता आणि त्याला शास्त्रलेखाचे सखोल ज्ञान होते. 25प्रभूच्या मार्गाचे शिक्षण त्याला देण्यात आलेले होते आणि तो आवेशाने बोलत होता, जरी त्याला फक्त योहानाच्या बाप्तिस्म्याबद्दल माहिती होती, तरी येशूंबद्दल अचूक शिक्षण देत होता. 26तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.
27जेव्हा अपुल्लोसला अखया येथे जायचे होते, तेव्हा बंधू व भगिनींनी त्याला उत्तेजन दिले व अखया येथील शिष्यांनी त्याचे स्वागत करावे असे विनंती पत्र त्याच्या हाती देऊन त्याचा निरोप घेतला. जेव्हा तो तिथे आला, तेव्हा कृपेद्वारे ज्यांनी विश्वास ठेवला होता त्यांना त्याची फार मोठी मदत झाली. 28कारण सार्वजनिक वाद करून त्याने अतिशय सशक्तपणे यहूदीयांच्या सर्व वादांचे खंडन केले आणि शास्त्राच्या आधाराने त्यांच्या निदर्शनास आणून दिले की, येशू हेच ख्रिस्त आहेत.

Jelenleg kiválasztva:

प्रेषित 18: MRCV

Kiemelés

Megosztás

Másolás

None

Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be