योहान 9
9
जन्मांधाला दृष्टीलाभ
1येशू जात असताना, त्यांनी एका जन्मांध मनुष्यास पाहिले, 2तेव्हा त्यांच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “गुरुजी, कोणी पाप केले, या मनुष्याने की त्याच्या आईवडिलांनी, ज्यामुळे हा आंधळा जन्मला?”
3येशूंनी उत्तर दिले, “त्याने किंवा त्याच्या आईवडिलांनी पाप केले नाही, परंतु हे यासाठी झाले की परमेश्वराची कृत्ये त्याच्यामध्ये प्रकट व्हावी. 4जोपर्यंत दिवस आहे, तोपर्यंत ज्याने मला पाठविले त्यांची कार्ये आपल्याला केली पाहिजेत. रात्र येत आहे, तेव्हा कोणी काही करू शकत नाही. 5मी या जगात आहे, तेव्हापर्यंत मी या जगाचा प्रकाश आहे.”
6असे बोलून, ते जमिनीवर थुंकले व थुंकीने चिखल करून त्याचा लेप त्यांनी त्या माणसाच्या डोळ्यांवर लावला. 7“जा, ते त्याला म्हणाले, शिलोआम तळ्यात डोळे धू.” (शिलोआम म्हणजे पाठविलेला.) तेव्हा तो मनुष्य गेला व त्याने डोळे धुतले आणि डोळस होऊन घरी गेला.
8त्याचे शेजारी आणि इतर लोक त्याला एक भिकारी म्हणून ओळखत होते, ते एकमेकांना विचारू लागले “बसून भीक मागणारा तो हाच मनुष्य नाही काय?” 9काहीजण म्हणाले, “होय, हाच तो.”
पण इतर म्हणाले, “नाही, तो फक्त त्याच्यासारखा दिसतो.”
तो भिकारी आग्रहपूर्वक म्हणाला, “मी तोच मनुष्य आहे!”
10“मग तुझे डोळे कसे उघडले?” त्यांनी त्याला विचारले.
11तेव्हा त्याने सांगितले, “येशू नावाच्या एका मनुष्याने चिखल केला आणि माझ्या डोळ्यांवर लावला. मग मला शिलोआमाच्या तळ्यावर जाऊन चिखल धुण्यास सांगितले. त्याप्रमाणे मी जाऊन धुतले व मला दृष्टी प्राप्त झाली.”
12त्यांनी विचारले, “तो मनुष्य कुठे आहे?”
तो म्हणाला, “मला माहीत नाही.”
आंधळा बरा झाल्याची परूशी चौकशी करतात
13तेव्हा त्यांनी जो मनुष्य आंधळा होता त्याला परूश्यांकडे आणले, 14आता येशूंनी चिखल तयार करून त्या माणसाचे डोळे उघडले तो शब्बाथवार होता. 15यास्तव परूश्यांनीही त्याला दृष्टी कशी आली हे विचारले. तेव्हा तो मनुष्य उत्तरला, “त्यांनी माझ्या डोळ्यांवर चिखल लावला आणि मी तो धुऊन टाकला आणि आता मी पाहू शकतो.”
16त्यांच्यापैकी काही परूशी म्हणाले, “हा मनुष्य परमेश्वरापासून आलेला नाही, कारण तो शब्बाथ पाळत नाही.”
परंतु इतरांनी विचारले, “पण पातकी मनुष्याला अशी चिन्हे करता येतील का?” यावरून त्यांच्यामध्ये फूट पडली.
17शेवटी परूशी पुन्हा आंधळ्या मनुष्याकडे वळले व त्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्यांच्याविषयी तुला काय म्हणावयाचे आहे?”
यावर तो मनुष्य उत्तरला, “तो परमेश्वराचा संदेष्टा आहे.”
18यहूदी पुढार्यांनी दृष्टी प्राप्त झालेल्या त्या माणसाच्या आईवडिलांस बोलावून आणेपर्यंत, तो आंधळा होता आणि आता त्याला दिसते, यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. 19त्यांना विचारले, “हा तुमचा मुलगा आहे काय? तुम्ही म्हणता तो हाच आहे का जो आंधळा जन्मला होता? तर मग त्याला आता दृष्टी कशी आली?”
20तेव्हा त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला होता हे आम्हास ठाऊक आहे. 21तरी त्याला आता कसे दिसते किंवा त्याला कोणी दृष्टी दिली, हे आम्हास माहीत नाही. तो प्रौढ आहे. त्यालाच विचारा.” 22त्याचे आईवडील यहूदी पुढार्यांच्या भीतीमुळे असे म्हणाले, कारण त्यांनी आधी ठरविले होते की जे कोणी, येशू हा ख्रिस्त आहे, असे कबूल करतील, त्यांना सभागृहामधून बाहेर टाकण्यात यावे. 23यामुळे त्याच्या आईवडिलांनी म्हटले, “तो प्रौढ आहे; त्याला विचारा.”
24तेव्हा जो मनुष्य पूर्वी आंधळा होता, त्याला त्यांनी पुन्हा दुसर्यांदा बोलावून सांगितले, “सत्य सांगून परमेश्वराचे गौरव कर, हा मनुष्य पापी आहे, हे आम्हाला माहीत आहे.”
25त्यावर तो म्हणाला, “तो पापी आहे की नाही, हे मला ठाऊक नाही. परंतु मला एक गोष्ट माहीत आहे. मी पूर्वी आंधळा होतो आणि आता मला दिसते!”
26त्यांनी त्याला विचारले, “त्याने तुला काय केले? त्याने तुझे डोळे कसे उघडले?”
27तेव्हा त्याने उत्तर दिले, “मी या आधीच तुम्हाला सांगितले; पण तुम्ही ऐकले नाही. ते पुन्हा का ऐकता? त्यांचे शिष्य व्हावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
28त्यावर त्यांनी त्याची निंदा केली व ते म्हणाले, “तूच त्याचा शिष्य आहेस! आम्ही तर मोशेचे शिष्य आहोत! 29आम्हाला माहीत आहे की परमेश्वर मोशेशी बोलले, परंतु याच्याबद्दल म्हणशील, तर तो कुठला आहे हे आम्हास ठाऊक देखील नाही.”
30तेव्हा त्याने उत्तर दिले, “हे केवढे आश्चर्य आहे! त्याने माझे डोळे उघडले आणि तो मात्र कुठून आला याबद्दल तुम्हाला काहीही माहिती नाही! 31आपल्याला ठाऊक आहे की परमेश्वर पापी लोकांचे ऐकत नाही. तर जे कोणी परमेश्वर भक्त असून त्यांच्या इच्छेप्रमाणे वर्ततो त्यांचेच ते ऐकतात. 32कोणी जन्माधांचे डोळे उघडले, असे कधीच ऐकण्यात आले नाही. 33ही व्यक्ती परमेश्वरापासून नसती, तर हे करू शकली नसती.”
34तेव्हा यहूदी पुढारी म्हणाले, “तू जन्मापासून पापात बुडलेला आहेस आणि आम्हाला शिकवितोस?” आणि त्यांनी त्याला बाहेर घालविले.
आध्यात्मिक अंधत्व
35त्यांनी त्याला बाहेर घालविले, हे येशूंनी ऐकले आणि तो त्यांना भेटल्यावर, येशूंनी त्याला विचारले, “तुझा मानवपुत्रावर विश्वास आहे का?”
36तो म्हणाला, “प्रभू, ते कोण हे मला सांगा म्हणजे मी त्यांच्यावर विश्वास ठेवेन.”
37येशू म्हणाले, “आता तू त्याला पाहिले आहेस आणि खरेतर तो तुझ्याशी बोलत आहे.”
38“होय प्रभूजी,” तो म्हणाला, “मी विश्वास धरतो!” आणि त्याने त्यांची उपासना केली.
39मग येशू म्हणाले, “मी न्याय करण्यासाठी या जगात आलो आहे, यासाठी की आंधळ्यांना दिसावे आणि जे पाहतात त्यांनी आंधळे व्हावे.”
40जे परूशी तिथे होते त्यांनी जे बोलले ते ऐकले आणि विचारले, “आम्ही आंधळे आहोत काय?”
41येशू म्हणाले, “तुम्ही आंधळे असता, तर तुम्ही पापी नसता; परंतु तुम्हाला दिसते असे तुम्ही म्हणता, म्हणून तुमचा दोष तसाच राहतो.”
Jelenleg kiválasztva:
योहान 9: MRCV
Kiemelés
Megosztás
Másolás
Szeretnéd, hogy a kiemeléseid minden eszközödön megjelenjenek? Regisztrálj vagy jelentkezz be
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.